मतदार ओळखपत्रांत जीईएलकडून होणार्‍या चुकांमुळे नागरिकांत संताप

0
105

राज्य निवडणूक कार्यालयाकडून दिल्या जाणार्‍या मतदार ओळखपत्रांमधील चुकांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रातील वाढत्या तक्रारीबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्य निवडणूक कार्यालयाकडून गोवा इलेेक्ट्रॉनिक्स (जीईएल) या कंपनीकडून मतदार ओळखपत्र तयार करून मतदारांना दिली जातात. एक मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी कंपनीला चाळीस रूपये दिले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी दखल घेणार असल्याचे संयुक्त निवडणूक आयुक्त नारायण नावती यांनी सांगितले.

नागरिकांकडून बीएलओच्यामार्फत मतदार यादीत नावाचा समावेश, मतदार ओळखपत्रात दुरूस्तीसाठी अर्ज सादर केला जातो. बीएलओकडून या अर्जाची योग्य तपासणी करून मामलेदार कार्यालयाच्या माध्यमातून ओळखपत्र तयार करण्यासाठी राज्य निवडणूक कार्यालयाकडे पाठविले जातात. निवडणूक कार्यालयाकडून कंपनीकडून अर्ज पाठवून ओळखपत्र तयार करून संबंधितांना दिले जाते.
निवडणूक कार्यालयाने दिलेल्या ओळखपत्रात चुका असल्याचे नागरिकांना आढळून येत आहे. नागरिकांकडून अर्जामध्ये अचूक माहिती दिली जाते. तरीही नाव, आडनाव, पत्ता यामध्ये चुका केल्या जात असल्याची तक्रार आहे. अनेक मतदारांनी चुका असलेली ओळखपत्रे बीएलओकडून स्वीकारण्यास नकार दिला.

बीएलओना चुका असलेली ओळखपत्रे वितरीत करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे चुका असलेली ओळखपत्रे मतदारांना दिली जात आहेत. ओळखपत्रातील चुकांच्या दुरूस्तीसाठी पुन्हा फॉर्म ८ भरण्याची सूचना अधिकार्‍याकडून केली जात आहे. मतदार ओळखपत्रातील चुकांच्या अनेकांच्या तक्रारी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक ओळखपत्रातील चुका जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. राज्य निवडणूक कार्यालयाने ओळखपत्रातील चुकांची गंभीर दखल घेऊन चुका करून मतदारांना मनस्ताप देणार्‍यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. निवडणूक कार्यालयाकडे ओळखपत्रातील चुकंाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. मतदार ओळखपत्रातील चुकांची योग्य दखल घेतली जाणार आहे, अशी माहिती संयुक्त निवडणूक आयुक्त नारायण नावती यांनी दिली.