मतदान शांततेत : उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त

0
172

>> लोकसभेसाठी सुमारे ७४.६% मतदान : ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांची गैरसोय; १२८ यंत्रे बदलली

राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी सुमारे ७४.६ टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात ७३.९२ टक्के तर दक्षिण गोव्यात ७०.१५ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघात ८१.६१ टक्के, शिरोड्यात ८२.९९ टक्के आणि म्हापसा मतदारसंघात ७५.१७ टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले. मतदानाच्या सुरुवातीला विविध ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक दोषाच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. मतदानापूर्वी प्रात्यक्षिक आणि मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली मिळून एकूण १२८ यंत्रे बदलण्यात आली आहेत. मार्ली काणकोण येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. लोकसभेच्या १२ आणि विधानसभा पोट निवडणुकीतील १६ मिळून २८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात सीलबध्द झाले आहे. भाजप, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.

लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन जागा आणि विधानसभेच्या शिरोडा, मांद्रे आणि म्हापसा या तीन पोट निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजता प्रारंभ करण्यात आला. मतदानापूर्वी प्रात्यक्षिक घेताना काही यंत्रात दोष आढळून आला तर, काही ठिकाणी मतदान सुरू असताना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दोष आढळून आल्याने बर्‍याच ठिकाणी मतदानाला तास ते दीड तास उशिरा प्रारंभ झाला.

अनेक ठिकाणी इव्हीएम यंत्रांत बिघाड
खोर्ली-तिसवाडी, नेरूल, गावकारवाडा – मये, सांन्ताक्रुझ, दोनापावल, शिवोली, पार्से, मांद्रे, हरमल, केरी, मधला मांद्रे, कळंगुट, कोपरवाडा-कुर्टी, तळेभाट -कुंकळ्ळी, गोवा वेल्हा, आंबावली, नुवे, वेर्णा, बेतुल, म्हापसा, हरवळे आदी भागातील मतदान केंद्रातील ईव्हीएम यंत्रामध्ये दोष किंवा सुरू होत नसल्याचे आढळून आले. सदर ठिकाणची ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्यानंतर मतदानाला सुरुवात करण्यात आली. मतदानापूर्वी उमेदवारांच्या एजंटासमोर घेण्यात येणार्‍या प्रात्यक्षिकाच्या वेळी १४ बॅलेट युनिट, २५ कन्ट्रोल युनिट आणि ४० व्हीव्हीपॅट बदलण्यात आली. तर, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी १० बॅलेट युनिट, १० कंन्ट्रोल युनिट आणि २९ व्हीव्हीपॅट बदलण्यात आली आहेत.

राज्यात सकाळी मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. सकाळी ९ वाजता लोकसभा आणि पोट निवडणुसाठी साधारण १३ टक्के मतदान झाले होते. अकरा वाजता २६ टक्के मतदान तर दुपारी १ वाजता ४५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. पोट निवडणुकीसाठी सुध्दा ४५ टक्केच्या आसपास मतदान झाले होते. लोकसभेसाठी संध्याकाळी ५ वाजता ७०.९० टक्के मतदान झाले होते. यात उत्तर गोव्यात ७२ टक्के आणि दक्षिण गोव्यात ६८ टक्के मतदान झाले. तर पोट निवडणुकीसाठी मांद्रे, शिरोडा, म्हापसा या तीनही मतदारसंघात ७५ टक्के मतदान झाले होते.

ईव्हीएमसाठी पणजी मडगावात स्ट्रॉंग रूम
मतदान झालेली यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी पणजी आणि मडगाव येथे दोन स्ट्रॉग रूम तयार करण्यात आले आहेत. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. मतदान यंत्रांना दुहेरी सुरक्षा कवच पुरविण्यात येणार आहे. यंत्राची आतील सुरक्षेचे काम केंद्रीय सुरक्षा दलाकडे तर बाहेरील सुरक्षेचे काम स्थानिक पोलिसाकडे सोपविण्यात आले आहे. स्ट्रॉग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. राजकीय पक्षाचे नेते या सुरक्षेवर लक्ष ठेवू शकतात, असे कुणाल यांनी सांगितले.

मतदारांचा भरघोस प्रतिसाद : श्रीपाद
उत्तर गोवा मतदारसंघातून विजय निश्‍चित आहे. गत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. निवडणूक प्रचाराच्या वेळी सर्वच मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या प्रतिसादाचे मतदानात रूपांतर होईल, असा दावा भाजपचे उमेदवार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मतदान केंद्रानंतर पत्रकारांशी बोलताना केला.

उत्तर गोव्यात बदल निश्‍चित : गिरीश
उत्तर गोवा मतदारसंघात बदल निश्‍चित आहे, असा दावा कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीबाबत मतदारांनी व्यक्त केलेली नाराजी मतदानात रूपांतर होईल, असा दावा चोडणकर यांनी केला.

म्हापशात दारू वाटपामुळे
एकास ताब्यात
भरारी पथकाने म्हापसा येथील एका मतदान केंद्राच्या जवळ दारू वाटप प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतला. सदर व्यक्तीचे दारूचे दुकान असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू आहे, अशी माहिती कुणाल यांनी दिली.