मतदानास गोवा सज्ज

0
116

या निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये –

>> मतदानयंत्रांवर उमेदवाराचे नाव व चिन्हासोबत छायाचित्र.
>> वोटर व्हेरिफाएबल पेपर ट्रेल (व्हीव्हीपॅट) चा प्रथमच वापर.
>> मतदानकेंद्रांमध्ये मतदारांसाठी व दिव्यांगांसाठी सुविधा.
>> आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी.
>> संपूर्णतः महिला कर्मचार्‍यांद्वारा संचालित ‘पिंक बूथ’

आज होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून निवडणूक अधिकारी मतदानाच्या सामुग्रीसह काल रात्रीच राज्यातील १६४२ मतदान केंद्रांवर रवाना झाले. सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ होणार असून ते संध्याकाळी पाच पर्यंत चालेल. या निवडणुकीत प्रथमच काही मतदान केंद्रांचे संचालन संपूर्णतः महिला कर्मचार्‍यांकडून होणार असून त्यांना ‘पिंक बूथ’ संबोधण्यात आले आहे. वोटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) चा वापर यंदा प्रथमच गोव्यात सर्वच्या सर्व मतदान केंद्रांवर होणार आहे. या निवडणुकीत १८ ते १९ या वयोगटातील ३२,३५४ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील मतदानकेंद्रांतील मतदारांची सरासरी संख्या ६७६ असून वास्को येथील ३८ क्रमांकाच्या मतदारकेंद्रात सर्वाधिक १२६६ मतदार आहेत, तर सर्वांत कमी मतदार सांगे मतदारसंघातील केंद्र क्रमांक ४३ मध्ये असून त्यांची संख्या केवळ १०३ आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात दिव्यांग व अतिवृद्ध असे २७५७ मतदार असून त्यांच्या नेण्या आणण्याची सोय करण्यात येणार असल्याचेही कुणाल यांनी स्पष्ट केले. पणजीतील एका मतदानकेंद्राची जबाबदारी दिव्यांग व्यक्तीकडे देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
८० भरारी पथके
मतदानाच्या वेळी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी ८० भरारी पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व तपासणी नाके व महत्त्वाच्या रस्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी २१ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी निमलष्करी दलांच्या ९५ तुकड्या आणल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत राज्यात एक कोटी ८४ लाख ७० हजार ८६५ रुपये जप्त करण्यात आले असून त्यापैकी १ कोटी ६१ लाख ७ हजार ४०० रुपये एटीएमसाठी आणल्याचे व कायदेशीर असल्याचे आढळून आल्याने परत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात ७३ हजार लीटर दारू जप्त करण्यात आली असून तिची किंमत ८७ लाख ९६ हजार असल्याची माहिती त्यांनी दिली. ३३ लाखांचे अमलीपदार्थही या काळात जप्त करण्यात आले आहेत. ५५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
सकाळी ६ वाजता चाचणी मतदान
सर्व मतदान केंद्रांवर आज सकाळी ६ वाजता मतदानाची चाचणी घेण्यात येणार असून ते शंभर मतांचे असेल, असे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले. हे चाचणी मतदान घेण्यासाठी सर्व निवडणूक अधिकार्‍यांना ६ वा. मतदान केंद्रांवर बोलावण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
मतदार ज्या उमेदवाराला आपले मत देतो त्यालाच मत मिळते की नाही, ते मत गुप्त राहते की नाही आदी बाबी तपासून पाहण्यासाठी हे चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नावती यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रत्येक मतदान केंद्रावर हे चाचणी मतदान घेणे हे सक्तीचे करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. १०० मतांसाठीच्या या चाचणी मतदानासाठी अवधी २० मिनिटे लागणार असल्याचे नावती यांनी माहिती देताना सांगितले. चाचणी मतदानामुळे एखादे मतदानयंत्र चुकीच्या पद्धतीने काम करीत आहे की काय तेही कळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानोत्तर पाहण्यांस मनाई
राज्यात मतदानोत्तर पाहण्या करण्यास मनाई असल्याचे सहायक मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले. त्यासंदर्भात काहींनी विचारणा केली होती, परंतु निवडणूक आयोगाने कलम १२७ अ खाली अधिसूचना जारी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर राज्यांत निवडणुका व्हायच्या असल्याने ४ फेब्रुवारी पासून आठ मार्चपर्यंत अशा मतदानोत्तर पाहण्यांना बंदी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘व्हीव्हीपॅट’ युक्त मतदानयंत्रे
या निवडणुकीत प्रथमच मतदानयंत्रांवर उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्हाबरोबरच उमेदवाराचे छायाचित्रही असेल. शिवाय यावेळी प्रथमच वोटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल किंवा व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर होत आहे, ज्यामुळे आपले मत कोणाला दिले गेले त्याची पावती मतदानयंत्राशेजारील मुद्रकावर पाहण्याची संधी मतदारांना लाभणार आहे. ही पावती केवळ सात सेकंद दिसेल, परंतु ती घरी नेता येणार नाही, तर तेथील ड्रॉपबॉक्समध्ये पडेल. या नव्या सोयीचा मतदानाच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येते.

संवेदनशील मतदारसंघ
कळंगुट, सांताक्रुझ, कुठ्ठाळी व वेळ्ळी हे मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत, तर पर्वरी, मुरगाव व सांत आंद्रे मतदारसंघांतील काही भाग संवेदनशील मानून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.