मतदानयंत्रे ठेवलेल्या इमारतीजवळ मडगावात आग ः स्ट्रॉंग रूम सुरक्षित

0
171

बोर्डा, मडगाव येथील मल्टिपर्पज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान प्रयोग शाळेत काल फ्रीजला दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ माजली. या इमारतीच्या विस्तारित इमारतीत लोकसभा व शिरोडा विधानसभा निवडणुकीतील मतदान यंत्रे सीलबंद असल्याने राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, स्ट्रॉंग रुमला आगीचा फटका बसला नाही. सुदैवाने आग त्या खोलीपर्यंत पोचली नाही.
बोर्डा सरकारी मल्टिपर्पजच्या जुन्या शैक्षणिक इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ‘जीवशास्त्र’ या विज्ञान प्रयोगशाळेतून दुपारी दोन वाजता धूर येऊ लागला. तो तेथे सुरक्षेसाठी तैनात केलेल्या नीम लष्करी दलाच्या जवानांंनी पाहिला व वरिष्ठांना कळविले. लगेच जिल्हाधिकार्‍यांनी जे निवडणूक अधिकारी आहेत अजित रॉय, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक, पोलीस अधीक्षक अरविंद गावस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. लगेच अग्निशामक दलाने दोन पाण्याचे बंब वापरून आग विझविण्यास सुरुवात केली. प्रयोग शाळा बंद असल्याने कुलूपे तोडून आत प्रवेश करून आग विझवावी लागली. ती विझविण्यासाठी दोन पाण्याचे बंब लागले. तोपर्यंत सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, शेकडो लोक तेथे जमा झाले होते. पण कोणालाच जिल्हाधिकार्‍यांनी आत जाण्यास मज्जाव केला. आगीत प्रयोग शाळेची लाखो रुपयांची हानी झाली.

नवीन बांधलेल्या इमारतीत मतपेट्या ठेवलेल्या असल्या तरी आग लागलेल्या जागेपासून शंभर मिटरपेक्षा कमी अंतर आहे. ही जुनी इमारत मोडकळीस आली असून त्यातील वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. वीज खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याचा गलथान कारभार व जिल्हाधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे आगीचा प्रकार घडला, असे तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सांगितले, की प्रयोगशाळेच्या फ्रीजला आग लागल्याने आगीची घटना घडली. पण स्ट्रॉंग रुमला कोणतीच बाधा पोचली नसून तो सुरक्षित आहे. येथे सुरक्षा रक्षक व अग्नीशामक दलाचे जवान रात्रंदिवस तैनात असतात.
आगीची घटना घडताच आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, दक्षिण गोवा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ज्यो डायस, आम आदमीचे सिद्धार्थ कारापूरकर यांनी भेट दिली. सायंकाळी उशिरा पत्रकारांना आगीची घटना घडली तेथे जाण्यास परवानगी दिली. पण मतपेट्या ठेवलेल्या जागेला परवानगी नाकारण्यात आली.

गेल्या आठ दिवसांमागे आल्तिनो येथील स्ट्रॉंग रुमातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले होते. काल दक्षिण गोव्यातील मतपेट्या ठेवलेल्या इमारतीलगत असलेल्या जुन्या इमारतीला आग लागल्याने निवडणूक यंत्रणा व त्या अधिकार्‍यांच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.