मडगावात हायस्कूलच्या प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांला जबर मारहाण

0
151

>> विद्यार्थी इस्पितळात दाखल ः तक्रार नोंद

येथील लॉयोला हायस्कूलमध्ये आठवीत शिकणार्‍या फ्रेनेल फर्नांडिस या १३ वर्षीय विद्यार्थ्याला हायस्कूलच्या प्राचार्यांनीच बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याने त्याच्यावर हॉस्पिसियु हॉस्पिटलात उपचार करण्याची पाळी आली आहे. त्या मुलाचे वडील फेलिक्स फर्नांडिस यांनी हायस्कूलचे प्राचार्य बाझील वेगो यांच्या विरोधात मडगाव पोलीस स्टेशनवर तक्रार केली आहे.

मारहाणीची घटना दि. २७ जानेवारी रोजी घडली. त्यादिवशी फ्रेनल व अन्य दोन मुलांना वर्ग शिक्षिकेने वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा केली. त्यावेळी प्राचार्य वेगो यांनी तेथे येवून फ्रेनेलला ढकलले व त्याच्या तोंडावर ठोशांनी मारहाण केली. चेहरा, डोळे, डोके व शरीराच्या खालच्या भागावरही मारहाण केली. या मारहाणीने त्याच्या नाकातून व तोंडातून रक्त वाहू लागले. तसेच त्याच्या केसांना पकडून भिंतीला आपटले असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर रक्त वाहून घेरी येण्याची पाळी त्याच्यावर आली. घरी आल्यानंतर शारीरिक दुखण्याचा त्रास होत होता तो फ्रेनेलने घाबरून सांगितले नाही. जेव्हा दुखणे असह्य झाले तेव्हा फ्रेनलने त्याच्या आईला सांगितले. दुसर्‍या दिवशी शाळेत विचारपूस करण्यासाठी गेले असता संबंधिताने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याविरोधात फेलिक्स यांनी गोवा बाल कायद्याखालील ३२३ व ५०६ कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. तसेच न्यायालयात, गोवा शालान्त मंडळ, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.