मटका तपासासाठी एसआयटीची स्थापना

0
171

>> न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारचा निर्णय

राज्य सरकारच्या गृह खात्याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार मटका प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. उच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीवेळी सरकारने ही माहिती दिली. या संबंधीचा आदेश १७ ऑक्टोबर २०१७ रोजी जारी करण्यात आला होता.

राज्यातील मटका व्यवसायाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी या विशेष पथकाची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली होती. या विशेष पथकाच्या प्रमुखपदी पोलीस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी, पोलीस उपनिरीक्षक अक्षय गावकर आणि उपनिरीक्षक वामन नाईक यांचा समावेश आहे.

मटका प्रकरणाच्या तपासासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. लवंदे विशेष पथकाला मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काशिनाथ शेट्ये यांनी मटका प्रकरणी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केलेली आहे. काशिनाथ शेट्ये यांनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. एसीबीने सील केलेल्या केपे येथील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या भावाच्या घरात मोठ्या प्रमाणात मटका स्लिप्स सापडल्या होत्या. या प्रकरणी क्राईम ब्रँचकडून तपास केला जात आहे. आता मटका प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून केली जाणार आहे. न्यायालयात मटका प्रकरणी याचिका सादर करण्यात आल्याने पोलिसांकडून मटका अड्‌ड्यांवर छापे घातले जातात.