मच्छिमारी बोटींसाठी पेट्रोल अनुदान नियम झाले कडक

0
137

विदेशात नोकरी करणार्‍या मच्छीमारांच्या बोटींसाठी पेट्रोल अनुदान न देण्याचा निर्णय मच्छिमारी खात्याने घेतला आहे.

मच्छिमारी खात्याकडून मच्छीमारांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी पेट्रोल अनुदान दिले जाते मच्छीमारी बोटीसाठी दिल्या जाणार्‍या पेट्रोल अनुदानाचे नियम आणखी कडक केले आहेत. या संबंधीची सूचना मच्छीमारी खात्याचे संचालक तथा सचिव गोविंद जैस्वाल यांनी जारी केली आहे.

मच्छिमार बोटीचा मालक विदेशात नोकरी करीत असेल आणि आपल्या बोटीच्या वापराबाबत दुसर्‍या व्यक्तीला पॉवर ऑफ ऍटर्नी दिली असेल तर त्याच्या बोटींना पेट्रोल अनुदान दिले जाणार नाही. मच्छीमाराच्या केवळ दोन बोटींना पेट्रोल अनुदान दिले जाणार आहे.

मच्छिमारी पेट्रोल ओबोएमचा वापर करणारे अनुदानासाठी पात्र आहेत. पेट्रोलसाठी प्रतिलीटर तीस रुपये अनुदान दिले जाणार आहे. मच्छीमाराला वर्षाला जास्तीत जास्त १७०० लीटर पेट्रोलसाठी अनुदान दिले जाणार आहे. १ डिसेंबर २०१६ पासूनच्या दाव्यासाठी हा नियम लागू होणार आहे. मच्छीमारी बोटीचा वॉटर स्पोटर्‌‌ससाठी वापर करणार्‍यांना पेट्रोल अनुदान दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मच्छिमारी बोटीची मर्चंट शिपिंग ऍक्ट १९५८ खाली नोंदणी आवश्यक आहे. पेट्रोल अनुदान घेणारी व्यक्ती फिशिंग को.-ऑप. संस्था, असोसिएशन किंवा वैयक्तिक असू शकते. मच्छीमारीसाठी आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. अर्जदाराने पेट्रोलच्या वापराबाबत अधिकृत विक्रेत्याकडील बिल सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराने स्वतः किंवा फिशरमन को.-ऑप. संस्था, असोसिएशनचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.