मगो पक्ष आजही बहुजनांच्या ह्रदयात…

0
220
  • देवेश कडकडे (डिचोली)

मगो पक्ष ही बहुजन समाजासाठी एक छोटीशी खिडकी होती. त्यातून डोकावून अनेकांना आपल्या स्वाभिमानाचा, उत्कर्षाचा मार्ग गवसला. कॉंग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षानेही ज्या पक्षाचा एकेकाळी धसका घेतला होता तो पक्ष अनेकदा आपल्या अस्तित्वासाठी झगडला. ज्यांना या पक्षाने मान-सन्मान दिला, ज्यांनी राष्ट्रीय राजकारणातही प्रसिद्धी मिळवली त्यांनीही या पक्षाकडे पडत्या काळात पाठ फिरवली…

दि. २६/१२ च्या ‘आधी विश्वासार्हता जपा’ या अग्रलेखातून आपण मगो पक्षाच्या सध्याच्या वाटचालीचे समर्पक विश्‍लेषण केले आहे. मगोच्या नेत्यांनी चाळीसही मतदारसंघात पक्षाचा विस्तार करण्याची घोषणा केली. ही घोषणा भाजपाला डिवचण्यासाठी केली आहे की त्याला अन्य कारणे आहेत हे भविष्यात उघड होईलच.
‘मगो पक्ष हा एखाद्या राष्ट्रीय पक्षात विलीन होणार’ अशा अफवा मध्यंतरी उठल्या व पुढे त्या विरल्याही. ८० च्या दशकात कॉंग्रेस पक्ष आणि नंतर भाजप सदैव मगो पक्षाच्या नरडीचा घोट घेण्यास तत्पर राहिले. अर्थात मोठा मासा छोट्या माशाला गिळंकृत करून आपले स्थान बळकट करतो, हा सृष्टीचा नियमच आहे,
ढवळीकर बंधू सोडले तर मगोत क्रियाशील नेते दिसत नाहीत.

पक्षाचे अन्य नेते केवळ पक्षाला घटनात्मक स्वरुप देण्यासाठी सदस्य म्हणून कागदोपत्री दिसतात. अन्यथा त्यांचे पक्षात काय स्थान आहे हे उघड आहे. मगोला संघटनात्मक कार्यात अथवा बांधणीत रस नाही, त्यासाठी सकारात्मक उपाययोजना ढवळीकर बंधूंकडून अपेक्षित नाही, अशी मते राजकीय निरीक्षक मांडत असतात. मगो पक्षाला फोंडा तालुक्यातून बाहेर काढण्यासाठी ढवळीकरांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत प्रयत्न केले. भाजपशी युती असताना पक्षाच्या विस्ताराला मर्यादा येत असल्यामुळे विविध ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले. भाजपाशी ऐनवेळी युती तोडण्याचे धाडस करून पंगा घेतला. त्यामुळे ढवळीकर बंधू हे फोंड्याच्या बाहेर पक्षाच्या विस्ताराला महत्त्व देत नाहीत हा समज चुकीचा आहे. मात्र पक्षावर त्यांचे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे ते आपल्या कल्पनेनुसार मगोचा वापर करतात यात निश्‍चितच तथ्य आहे.

१९९९ साली निवडणुकीत मगोची जी मोठी पडझड झाली आणि भाजपाने ४ वरून आपल्या आमदारांचे संख्याबळ १० पर्यंत वाढवले तेव्हा सुदिन ढवळीकरांनी मडकई मतदारसंघात श्रीपाद नाईक यांचा धक्कादायक पराभव करून भाजपाच्या स्वाधीन केलेला मडकई मतदारसंघ आपल्याकडे परत खेचून घेतला. ‘मडकई’ हा मतदारसंघ १९९४ साली भाजप वगळता मगो पक्षाकडेच राहिला आहे. १९८० च्या दरम्यान गोव्यातील राजकीय क्षेत्रातील चाणक्य बाबू नायक यांनी काळाची पावले ओळखून युगो पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन करण्यासाठी पुढाकार घेतला. ही राजकीय खेळी मगो पक्षाच्या पिछेहाटीस कारणीभूत ठरली. अर्थात सतत १७ वर्षे राज्य केल्याने निर्माण झालेले प्रतिकूल वातावरण पक्षात माजलेली बजबजपुरी ही इतर कारणेही साथीला होती. नंतर गोव्यात कॉंग्रेस आणि कालांतराने भाजपची घोडदौड सुरू झाली. त्याची सर्वांत जास्त झळ ही गाफील आणि फितुरीची लागण झालेल्या मगो या प्रादेशिक पक्षाला बसली.

गोव्यात त्यानंतर अनेक प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. यातील काहींची नावेही आठवत नाहीत. यात गोव्यातील राजकीय क्षेत्रातील भीष्माचार्य स्व. विल्फ्रेड डिसोझा अग्रेसर होते. हीच परंपरा पुढे त्यांचे शिष्य चर्चिल आलेमावांनी चालवली. हल्लीच २०१७ च्या निवडणुकाआधी गोव्याचे ‘गोंयकारपण’ जपण्यासाठी कॉंग्रेसच्या भ्रष्ट, सुस्त आणि धरसोड वृत्तीच्या कारभाराला कंटाळून त्यातील नाराज गटाने ‘गोवा फॉरवर्ड’ या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. या पक्षाने पदार्पणातच ७५% नेत्रदीपक यश मिळवून ३ जागा पटकावण्याचा चमत्कार केला खरा, पण आपल्या पक्षाची घोषित विचारसरणी धाब्यावर बसवून सत्तेसाठी त्यांनी ज्या तडजोडी केल्या त्यामुळे त्यांना ज्या प्रकारे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, ते पाहिल्यास भविष्यात हा पक्ष कितपत तग धरू शकेल हाही एक प्रश्‍नच आहे.

मगो पक्ष हा कोणत्या संकल्पनेमुळे स्थापन झाला या पक्षाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती आजच्या पिढीला तशी कमीच आहे. ज्यांनी मगोची कारकीर्द जवळून पाहिली आहे त्यांना या उद्देशाची जाणीव होती. मगो पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष म्हणून ओळखला गेला. तरी त्यांनी उच्च समाजाच्या द्वेषाची भलावण केली नाही. स्वातंत्र्यानंतर गोव्यात भारतीय संस्कृतीचा पाया घट्ट रोवण्यासाठी मगो पक्षाने महाराष्ट्रवादाची संकल्पना मांडली. आज ‘महाराष्ट्रवाद’ हा मुद्दा अनेकांना पचायला जड वाटतो. मात्र त्यावेळी ती काळाची आवश्यकता होती. स्वातंत्र्यपूर्व काळात गोव्यातील बहुजनांतील काही लोकांनी मुंबई गाठली. तिथे अनेकांना मुंबईने उच्च शिक्षणाच्या सुविधा दिल्या. आर्थिक विकासाची संधी दिली. सामाजिक प्रतिष्ठा दिली आणि त्यामुळे तिथे जागृतीचे लोण पसरून ते गोव्यापर्यंत पोचले. तत्पूर्वी जमीन, मंदिरे आणि चर्च यांच्या माध्यमातून उच्च समाजाने बहुजन समाजावर वर्चस्व ठेवले होते. १८८६ सालच्या महाजन कायद्याने मंदिरे ही महाजनांनी स्थापन केलेली असून ती त्यांची खाजगी मालमत्ता आहे. त्यामुळे मंदिरे महाजन आणि गावकर्‍यांच्या ताब्यात आली, याला पोर्तुगीजांचा पाठिंबा होता. जमिनीचा मुद्दा हा बहुजन समाजावर वर्चस्व राखण्याचे एक हत्यार होते. मगो पक्षाने आपल्या राजकीय जीवनात अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला तो या कायद्यात बदल करून भाटकारांवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजातील मुंडकारांना न्याय मिळवून देण्याचा, तसेच त्यांच्यावर असलेल्या वर्तस्वालाही लगाम घातला गेला. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसातले पंधरा- पंधरा तास मरेस्तोवर भाटात राबणार्‍या बहुजन समाजातील कष्टकर्‍यांना त्यात भागिदारी मिळवून दिली आणि त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या हातात अधिकार आले आणि परंपरागत जुलमापासून संरक्षण मिळाले. आर्थिक आणि सामाजिक बदलाचे वारे निर्माण झाले. देशातील इतर राज्यांत जमिनीविषयक कायदे असूनही खालच्या वर्गाच्या हिताच्या दृष्टीने त्यांची अंमलबजावणी होत नव्हती.

जेव्हा देशात औद्योगिकीकरणाला वेग आला, तेव्हा गोव्यात मानवी हक्काच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत होते. गावागावात सर्वत्र शाळा, स्त्रियांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली. गोवा राज्य मानवी विकासात सदैव अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा इथे आरोग्य सुविधांचा दर्जाही उत्तम आहे. गोव्यात मतदानाचा टक्काही सर्वाधिक असतो. मात्र क्षेत्रफळ आणि लोकसंख्या अल्प असल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.

गोव्याची पहिली निवडणूक ही तशी ऐतिहासिक होती. मगोचे सरकार हे त्यावेळी देशात दुसरे बिगर कॉंग्रेस सरकार होते. पहिले केरळमधील कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते. भाऊसाहेब बांदोडकर हे सर्वांत लोकप्रिय नेते होते. त्यांची जनतेशी थेट संवाद साधण्याची कला, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे कसब होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मगोचे अगदी सामान्य शेतकरी चहा विक्रेता असलेल्या उमेदवारांनी कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिक, प्रस्थापित भाटकार आणि खाणमालकांना धूळ चारली. निवडणुकांचा निकाल हा कॉंग्रेसच्या इतिहासातील सर्वांत मानहानीकारक पराभव होता. कॉंग्रेसने पक्षाच्या चाळीस हजार सदस्यांचा दावा केला होता, परंतु त्यांना ३५ हजारांवर मतांचा पल्ला गाठता आला नव्हता. संकुचित विचारांच्या स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी हा विजय म्हणजे सांप्रदायिकतेचा विजय असल्याचे घोषित केले.

मगोमुळे दुर्लक्षित घटकांना शिक्षण, अधिकार मिळून त्यांना संघटित होण्याचे बळ मिळाले. त्यांचे मनोधैर्य वाढून त्यातून या समाजाला नवीन दिशा मिळाली. गोव्यातील पहिली निवडणूक देशातील प्रथम लोकशाहीप्रणित क्रांती असल्याचे या घटनेला सामाजिक जाणकारांनी संबोधले आणि त्याचे प्रणेते भाऊसाहेब बांदोडकर होते. निवडून येताच त्यांनी जनतेमध्ये विश्‍वास निर्माण केला. त्यांचे अविश्रांत परिश्रम आणि तळागाळातील व्यवस्थापन कौशल्य यामुळे गोव्यात उत्तम प्रशासनाचे पर्व सुरू झाले. मगो पक्ष ही बहुजन समाजासाठी एक छोटीशी खिडकी होती. त्यातून डोकावून अनेकांना आपल्या स्वाभिमानाचा, उत्कर्षाचा मार्ग गवसला. कॉंग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षानेही ज्या पक्षाचा एकेकाळी धसका घेतला होता तो पक्ष अनेकदा आपल्या अस्तित्वासाठी झगडला. ज्यांना या पक्षाने मान-सन्मान दिला, ज्यांनी राष्ट्रीय राजकारणातही प्रसिद्धी मिळवली त्यांनीही या पक्षाकडे पडत्या काळात पाठ फिरवली. अर्थात हा त्यांचा दोष नसून राष्ट्रीय पक्षांची दादागिरी, राजकारणातील बदलते वारे अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. मात्र मगोला ऐतिहासिकदृष्ट्या गोमंतकीयांच्या हृदयात स्थान आणि महत्त्व आहे हे विसरून चालणार नाही.