मगोला जवळ घेण्याची गरज भासणार नाही : पर्रीकर

0
142

प्रचाराचा अंतिम टप्पा पूर्ण होईपर्यंत आपण ३६ मतदारसंघांचा दौरा केला असून भाजपने गेल्या पाच वर्षांच्या काळात दिलेल्या स्थिर सरकारची पावती म्हणून उद्याच्या निवडणुकीत पक्षाला दोन तृतियांश बहुमत मिळेल. त्यामुळे मगोला जवळ घेण्याची गरजच भासणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणूक अधिकार्‍यांनी आपल्या एका वक्तव्यावर पाठविलेली नोटीस आपण वकिलाकडे दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. निवडणूक आयोगाला वरील नोटीस संकेतस्थळावर घालण्याची गरज काय होती, असा प्रश्‍न त्यांनी केला. कॉंग्रेस पक्षाने आपल्यावर फार उशिरा आरोप केले, त्याचा त्यांना काहीही फायदा होणार नाही, असे ते म्हणाले.
आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आत जमिनीच्या ‘म्युटेशन’ची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. आपल्या बाबतीत ७ दिवस लागले, असे पर्रीकर यांनी कॉंग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना सांगितले.
पणजी मतदारसंघ हा आपल्यासाठीच नव्हे तर पणजीकरांसाठीही प्रतिष्ठेचा असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते.