मगोप – गोसुमं – शिवसेना युतीची अधिकृत घोषणा उद्या

0
132

मगो, शिवसेना व गोवा सुरक्षा मंच यांच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या १० जानेवारी रोजी अधिकृतरित्या करण्यात येणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नारायण सावंत व सरचिटणीस तथा पक्षाचे आमदार लवू मामलेदार उपस्थित होते. दरम्यान, सांत आंद्रेचे सरपंच जगदीश भोबे यांच्यासह सत्यविजय नाईक, विजय गावकर व दिलीप सगुण नाईक यांनी काल मगो पक्षात प्रवेश केला.

वरील चारही जण हे पक्षाचे संभाव्य उमेदवार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. जगदीश भोबे यांच्याबरोबर यावेळी गोवा वेल्हा येथील ३०० कार्यकर्त्यांनी मगो पक्षात प्रवेश केला. सत्यविजय नाईक हे नावेली, विजय गावकर हे वाळपई, दिलीप सगुण नाईक हे फातोर्डा व जगदीश भोबे हे सांत आंद्रे मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
मंचला सात जागा
मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, उद्या पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक होणार असून तीत गोवा सुरक्षा मंच व शिवसेना या पक्षाबरोबर युतीला अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय होईल. युतीचा निर्णय पूर्वीच झाला असून केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. गोवा सुरक्षा मंचशी युती असल्याने त्यांना मगोने सात जागा सोडल्या आहेत. त्यात पणजी, कुडचडे, साखळी, ताळगाव, पर्वरी, हळदोणे व वेळ्‌ळी या मतदारसंघांचा समावेश असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मगो, गोवा सुरक्षा मंच व शिवसेनेचे नेत्यांची उद्या होणार्‍या संयुक्त बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सावळ यांचा आज प्रवेश
नरेश सावळ हे सोमवार (आज) मगो पक्षात प्रवेश करणार असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, प्रियोळ मतदारसंघात भाजपने कुणालाही उमेदवारी दिली तरी तेथे आपलाच विजय होणार असल्याचा दावा ढवळीकर यांनी यावेळी केला.

पार्सेकरांविरोधात मगोचा उमेदवार
मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पाडाव करण्यासाठी मगोचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचे दीपक ढवळीकर यांनी सांगितले. जागा वाटपावेळी मांद्रे मतदारसंघ मगोला मिळणार आहे. हा मतदारसंघ पूर्वी मगोचा बालेकिल्ला होता. तो आम्ही नक्की परत मिळवू असा विश्‍वास ढवळीकर यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपूर्वी मतभेदांमुळे मगोने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर युती संपुष्टात आल्याचे मगो नेत्यांनी अधिकृतपणे जाहीर केले होते.