मगोपच्या सांतआंद्रे गट समितीची पक्षाला सोडचिठ्ठी

0
140

>> गटाध्यक्षांसह समिती पदाधिकार्‍यांचे राजीनामे

>> जगदीश भोबे यांची ढवळीकर बंधूंवर टीका

सांतआंद्रे मतदारसंघातील मगोपच्या गट समितीचे अध्यक्ष जगदीश भोबे आणि पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा काल दिला. मगोपच्या केंद्रीय समितीकडून निर्णय प्रक्रियेत विश्‍वासात घेतले जात नसल्याने आ पण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती गट अध्यक्ष जगदीश भोबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मगोप हा बहुजन समाजाचा पक्ष राहिलेला नाही. मगोप पक्ष हा ढवळीकर बंधूंची खासगी मालमत्ता बनला आहे, असा आरोप भोबे यांनी केला.

मगो पक्षात बहुजन समाजातील नेत्यांना कोणतेही स्थान नाही. मगोपचे माजी सरचिटणीस लवू मामलेदार यांची पक्षातून करण्यात आलेली हकालपट्टी योग्य नाही. मामलेदार यांच्याप्रमाणे आमचीही हकालपट्टी होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही भोबे यांनी सांगितले. मगोपची केंद्रीय समिती बहुजन समाजातील नेत्यांना घेऊन पुढे जात नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मागील दोन वर्षांत मगोपच्या केंद्रीय समितीने सांतआंद्रे गट समितीची कोणतीही विचारपूस केली नाही. गट समितीला वार्‍यावर सोडले होते, असा आरोप भोबे यांनी केला.

मगोवर परिणाम नाही : दीपक
सांतआंद्रे मतदारसंघातील मगोपच्या गट समितीच्या राजीनाम्याचा सांतआंद्रे मतदारसंघातील मगोपच्या कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही. सांतआंद्रे मतदारसंघात नवीन गट समितीची स्थापन करण्याचे काम महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये नवीन समितीची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली. गट अध्यक्ष जगदीश भोबे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारीसाठी मगोपमध्ये प्रवेश केला होता. भोबे यांना मगोपने उमेदवारी देऊन लोकांसमोर आणल्याचा विसर पडला आहे. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.