मगोचे लोढणे

0
105

मगो पक्षाशी असलेली युती संपुष्टात आणावी अशी मागणी जोर धरत असूनही तूर्त तशा प्रकारचे निर्णायक पाऊल टाकावे की नाही याबाबत भाजपमध्ये दुमत दिसते. पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक तोंडावर आली आहे, जिल्हा पंचायत निवडणूक व्हायची आहे, अशा वेळी ही आतापावेतो सुखरूप चाललेली युती तोडणे व्यवहार्य ठरणार नाही या विचाराचे पारडे सध्या तरी खाली झुकलेले दिसते. त्यामुळे युती अभंग असेल अशी ग्वाही भाजपचे स्थानिक श्रेष्ठी देत राहिले आहेत. पण कोणी कितीही सांगितले तरी ढवळीकर बंधू भाजपला डोईजड झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यातूनच दीपक ढवळीकर यांचे सहकार खाते काढून घेऊन त्यांना सूचक इशारा नवे मुख्यमंत्री सत्तारूढ होत असताना देण्यात आला. मगोबाबतची ही नाराजी अनेक कारणांसाठी आहे. एक महत्त्वाचे कारण म्हणजे मगो हळूहळू काही मतदारसंघांमध्ये आपले हात पाय पसरू पाहात आहे आणि त्याची भाजपच्या काही आमदारांना धास्ती वाटते. फोंड्याचे तीन मतदारसंघ गेल्या निवडणुकीत मगोने पादाक्रांत केले आणि २०१७ च्या निवडणुकीपर्यंत आणखी काही मतदारसंघांमध्ये आपले प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न मगो नेतृत्वाने जाणीवपूर्वक चालवलेला आहे. दुसरे म्हणजे ज्येष्ठ ढवळीकरांच्या हाती असलेल्या साबांखाकडून आपल्या मतदारसंघातील कामे होत नाहीत अशी तक्रार काही आमदार व कार्यकर्ते खासगीत करताना दिसतात. आपली ही अडवणूक जाणीवपूर्वक होते आहे असे त्यांना वाटते. त्यातूनही नाराजीला खतपाणी घातले गेले आहे. भाजप आमदारांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत या विषयाला तोंड फुटले आणि काही आमदारांनी मगोचे उच्चाटन करावे असा आग्रह धरला. देशात सध्या सर्वत्र मोदींचे वारे वाहत असताना मगोचे लोढणे ढकलून देण्याची हीच नामी संधी आहे असे त्यांना वाटले. देशभरात भाजपने विस्तारवादी धोरण स्वीकारले आहे. छोट्या प्रादेशिक पक्षांशी आधी हातमिळवणी करायची आणि नंतर पद्धतशीरपणे त्यांना नामोहरम करून आपले हातपाय पसरायचे अशी ही चतुर नीती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षापाशीही भाजपने हाच खेळ करून पाहिला. त्यामुळे मगोच्या साथीने गेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केले, तरी नंतर मगोची गरज संपली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हे लोढणे कितपत ओढत न्यायचे असा सूर व्यक्त झाला त्यात नवल नाही. मगो पक्षनेत्यांनाही भाजपमधील या धुसफुशीची जाणीव आहे. त्यामुळे जर भाजपने हात झटकला, तर स्वबळावर पुढे जाण्याची तयारी पक्षाने ठेवलेली आहे. मगोची अलीकडच्या काळातील पावले पाहिली, तर त्यामागील धोरण स्पष्ट दिसते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची जोरदार धडपड मगोने सध्या चालवलेली आहे. आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये मगोने आधी पक्षाच्या नावातील ‘महाराष्ट्रवादा’ ला तिलांजली दिली. तशी घटनादुरुस्ती केली गेली. त्यामुळे तो आता नुसता ‘मगो पक्ष’ राहिलेला आहे. नंतर पक्षाची पायाभूत भूमिका राहिलेल्या मराठी राजभाषेच्या मुद्द्यापासून फारकत घेणारे वक्तव्य दीपक ढवळीकरांनी केले. सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेष दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने एका इंग्रजी साप्ताहिकाची खास पुरवणी मगोसारख्या आजवर हिंदू बहुजनसमाजाचा कैवारी मानल्या गेलेल्या पक्षाने प्रायोजित केली, मगो नेते प्रत्यक्ष त्या सोहळ्यालाही उपस्थित राहिले, त्याच्या छब्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या, तेव्हा आम जनतेच्या भुवया उंचावल्या. ख्रिस्ती मतदारांना आकृष्ट करण्याची ही धडपड आहे असा त्याचा अर्थ स्वाभाविकपणे निघाला. त्यामुळे याचीही नोंद भाजपने घेतलेली आहे. फक्त त्यांना निष्कारण राजकीय अस्थैर्याला निमंत्रण द्यायचे नाही, म्हणूनच मगोला सध्या दूर लोटण्यास नेते कचरत आहेत. शिवाय ढवळीकर बंधूंनी उघडपणे भाजप सरकारला कधीही उपद्रव केलेला नाही. सुदिन ढवळीकर यांची वक्तव्येही नेहमी अत्यंत सुसंस्कृतपणाची आणि संयमित असतात. त्यामुळे जेवढे होईल तोवर मगोला सोबत ठेवावे, कारण लुईझिन फालेरोंच्या नेतृत्वाखाली पुन्हा सक्रिय झालेली कॉंग्रेस, भाजप सरकारच्या पायात पाय टाकण्यास सदैव उतावीळ असलेले अपक्ष आणि दुखावलेले मगो नेते एकत्र येऊ नयेत याची खबरदारी सध्या भाजपकडून पुरेपूर घेतली जाताना दिसते आहे. अर्थात, राजकारणात काहीही शाश्‍वत नसतेच म्हणा!