मकर संक्रांतीचे पुण्यपर्व

0
668

– सौ. पौर्णिमा केरकर

हृदय व बुद्धी यांची पूजा करणारी आपली संस्कृती आहे. भावना, संवेदना, निर्मळ ज्ञान, समाजभान, ज्ञानविज्ञान यांची जोड देऊन केलेली कृती ही सर्वांगसुंदर अशीच असते. विरोधातून विकास, विकारातून विवेकशील आचरणाकडे मार्गक्रमण करणे त्यामुळेच साध्य होते. अशा काही नैतिक मूल्यांसाठी, चांगल्या वर्तणुकीसाठी व एकमेकांप्रतीची आत्मीयता, स्नेहभावना वाढीस लागावी यासाठी काही व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा, सण-समारंभ, उत्सव यांची रचना समाजमनाने पूर्वीपासूनच केलेली आहे. ती प्रवाहित होऊन आजच्या युगातही त्यातील बदलांना सामोरे जात त्यांच्याप्रतीची ओढ ही अधिकाधिक वाढत जाताना दिसते आहे. बारकाईने अभ्यास केल्यास हे सारेच सण-उत्सव बदलत्या ऋतुचक्रानुसार ठरवण्यात आलेले होते. चैत्रातील गुढी उभारून नवतेचा संदेश सर्वांना देणारा निसर्ग फाल्गुन मासापर्यंत अविरत बदलत राहतो. या परिघातील प्रत्येक महिना हा वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. मालनी पुनवेचे चांदणे पौष मासाला घेऊन धालो मांडावर अवतीर्ण होते. मग अवघ्या काही दिवसातच सूर्याचा मकर राशीत प्रवेश होऊन स्नेह-सौख्याचा सण मकर संक्रांत उभा ठाकतो तो ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ हा संदेश देण्यासाठीच!!मकर संक्रांतीच्या सणाला देशभरात वैविध्यपूर्ण स्थान आहे. सण व पूण्यपर्व म्हणून या दिवसाला महत्त्व असून स्त्रियांसाठी तर हा दिवस म्हणण्यापेक्षा हा सण म्हणजे आनंदोत्सवच असतो. तीळ-तांदळाबरोबरीने सुगड दान देण्याची परंपरा ‘हळदी-कुंकू’ बनून गोव्यात ठिकठिकाणी अलीकडच्या वर्षांत मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. त्यातूनच जुनी भांडणे, किल्मिषे सारी नष्ट करून आपापसात प्रेमभावना वृद्धिंगत करण्याचे वचन एकमेकांना दिले जाते. प्रदेशापरत्वे या सणाच्या साजरीकरणात फरक आढळतो. गोव्यात समुद्रस्नानासाठी संक्रांत हा पूण्यदिवस मानला जातो. त्यातही स्त्रियांसाठी तर हा सण नटण्यामुरडण्या बरोबरच शेजारणीशी हितगुज करण्यासाठीचा म्हणूनही उत्साही राहिलेला आहे.
हा प्राचीन सण असून त्याविषयी सांगितले जाते की ध्रुवप्रदेशात सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असायचा. प्रदीर्घ रात्र संपून जेव्हा सूर्याचे दर्शन व्हायचे त्याच वेळी शिशिराची चाहूल लागायची. याच काळात मकर संक्रांती अवतीर्ण व्हायची. ती देवी असून तिने संकरासूर दैत्याला ठार मारलेले आहे. एकूणच मकर संक्रांतीमागच्या सर्वच घटनाक्रमाचा विचार केला असता त्यातून प्राप्त होणारे पूण्यफळ आरोग्यदायी व स्नेह वाढविणारे आहे, असे मानले जाते. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने तिळगुळाची चव चाखत एकमेकांच्या घरी जाऊन, आपला स्नेह व्यक्त करण्याची पद्धत पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक वेगाने चालू असलेली दिसते. संक्रांतीच्या दिवसात सर्वांगाला गारठवून टाकणारी थंडी पूर्वी असायची. वैश्‍विक तापमानामुळे संपूर्ण वातावरणात होत असलेल्या बदलाला सामोरे जात जे काही चांगले आहे ते स्वीकारायचे व वाईट आणि विरोधी आहे ते सोडून द्यायचे. आज जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की माणसे खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांशी जोडली गेली आहेत. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इंटरनेटसारख्या माध्यमांतून प्रदेशाचे, देशाअंतर्गत अंतर कमी झालेले आहे. संदेश देण्याघेण्याचे काम खूप वेगाने घडते आहे. त्याचबरोबर दुसरीकडे जिवंत संवाद हरवले जात आहेत. घरातील आपल्या माणसांशी चार घटका निवांतपणे बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. मोबाईलवर मात्र तासन्‌तास बोलण्यात घालवतो आम्ही! या पार्श्‍वभूमीवर मकर संक्रांतीचा विचार केला तर नव्या युगाशी सुसंगत असा नवा विचार समाजमनात रुजविण्याचा संकल्प महिलांनी करायला हरकत नाही.
पूर्वी उंबरठ्याबाहेर महिलांना पडताच येत नव्हते, परंतु हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाता यायचे. सुखदुःखाचा संवाद साधला जायचा त्यामुळे मन हलके व्हायचे. आज मनमोकळे बोलण्यासाठीची साधने खूप आहेत त्यामुळेच की काय हा सण प्रतिष्ठेच्या वलयात गुरफटला गेलेला दिसतो. हळद-कुंकवाच्या सोबतीने एकमेकींना भेटी देण्यासाठीच्या ‘वायन किंवा वाण’रुपी भेटवस्तूची चलती झाली आहे. प्रत्येक स्त्री स्वतःच्या ऐपतीनुसार जरी यात सहभागी होत असली तरी आपापसातील स्पर्धा वाढीस लागली. त्यातही प्लॅस्टिकच्या छोट्या-मोठ्या वस्तूंच्या भेटी वाढत गेल्या, ज्यांचा फक्त संग्रहच होऊ शकतो. नाहीतरी त्या फेकूनच द्याव्या लागतात. मग अशा निरर्थक वस्तूंनी घरात मात्र कचरा वाढत गेला. लोकमानसाची अशी श्रद्धा आहे की संक्रांतीचे प्रत्येक वर्षीचे वाहन, आयुध, तिलक, ज्योती, वय, अवस्था, भूषण, भक्षण, भोजनपात्र व तिचे स्वतःचे नावसुद्धा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असते. ती कोठून तरी येते व कुणीकडे जाते, ती जिथून येते तिथे समृद्धी तर जिथे जाते तिथे उत्पात घडतो असे लोकमत मानीत आलेले आहे. या वाक्यांतील प्रतिकात्मकता अधोरेखित करून जर आजच्या काळात मकर संक्रांत साजरी करण्याचा मथितार्थ लक्षात घेतला तर आपण उत्पाताच्या दिशेने चालत आहोत काय?… हा प्रश्‍न मनाला पडल्यावाचून राहणार नाही.
पूर्वी स्त्रियांना या सणाची गरज होती. थंडीचे दिवस. शरीरमनाला स्निग्धता प्रदान करण्यासाठी मग तीळ आणि गूळ खाणे व्हायचे. गोड बोलून, गोड वागून एकमेकांप्रतीचा आदर, स्नेहभाव वाढवत राहायचे ही संक्रांतीची परंपरा अशी समृद्ध करणारी होती. आजच्या काळातील बदललेले संदर्भ अनुभवता त्यातील वरवरचा भाव विचारी मनाला सतावत राहतो. माणूस जसजसा पुस्तकी ज्ञान आत्मसात करतो, चार पैसे त्याच्या गाठीला काय येतात त्याच्यातील बाह्यांगात झालेले बदल इतरांना आकर्षित करतात. वैचारीकतेतील बदल हे अंतरंगावर अवलंबून असतात. स्वामी विवेकानंद या युगपुरुषाचा जन्म मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर झालेला आहे. अशा खूपशा गोष्टी, नवविचार कृतिशीलतेने हळदी-कुंकवाच्या निमित्ताने स्त्रीसमूहात रुजवता येतात. त्यासाठी एखाद्या चांगल्या वक्त्याचे व्याख्यान ऐकणे, वाणरूपी भेट देताना पुस्तके, रोपे, कापडी पिशव्या वगैरेंचा वापर करता येणे सहज शक्य आहे. दिलीप कुळकर्णी यांचे ‘घरोघरी पर्यावरण’ यासारख्या छोटेखानी पुस्तकातील साध्या सोप्या भाषेतील टीप्स संवेदनशील मनाला ज्ञानसंपन्न करणार्‍या ठरतील. तीळगुळाच्या नावावर येणार्‍या-जाणार्‍यांच्या हातावर साखरच ठेवली जाते जी आरोग्याला हानिकारक तर असतेच शिवाय तो चिकट साखरेचा पदार्थ उमेदीने कुणी खायला सुद्धा बघत नाही. परिणामी तो विकत घेतल्याचा खर्च वाया जातो. ‘आपल्याला वेळ नाही’ या सबबीखाली सगळ्या गोष्टींचा कंटाळा करीत फक्त एक उपचार म्हणून सण साजरा केला जातो. मनात इच्छा धरली व स्नेहवर्धनाच्या या सणातील स्नेह व आत्मीयता वाढीस लावण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवीत उकड्या तांदळाचे पीठ व गूळ एकत्र करून केलेले लाडू, पांढर्‍या-काळ्या तिळाचे लाडू, गूळ व शेंगदाणे पोळी, तिळाची पोळी, इतर कडधान्यांपासून तयार करण्यात येणारे पदार्थ या निमित्ताने केले तर त्याद्वारे आरोग्याची वृद्धी तर होतेच, शिवाय आपल्या पारंपरिक, दुर्मीळ खाद्यपदार्थांची चवसुद्धा बर्‍याच जणींना घेता येते. चव घेतलेल्यांपैकी एकीला मग याच्यातील पदार्थ करण्याचा विचारसुद्धा स्फुरू शकतो, जी परिवर्तनाची सुरुवात असते. एरवी जे स्वस्त पडते ते द्यायचे असा विचार करून दिलेली एखादी वस्तू वापरली जातच नाही, ते तेथेच पडून राहते. त्यापेक्षा ती न दिलेली चांगली असते.
परंपरेला ज्ञानाची, आधुनिक विचारांची जोड असणे गरजेचे आहे. अंधपणाने परंपरांचे पालन करून त्यांचा उदोउदो करत जाणे हे एकविसाव्या शतकातील स्त्रीमनाच्या अज्ञानीपणाचेच प्रतीक ठरणार आहे. अनेक प्रश्‍न, अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. त्या सर्वांतून पार पडण्यासाठीच्या मार्गाचा अवलंब करताना विचारपूर्वक कृती करणे गरजेचे आहे. नुसतीच फक्त नटण्यासजण्याची हौस आहे म्हणून मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचे दिवस हळदी-कुंकवासाठी गावात एकमेकींच्या घरी फिरायचे, उणीदुणी काढायची, दिलेल्या वस्तूंवर निरर्थक चर्चा करीत राहण्यापेक्षा असे काही विचार समोर यायला हवेत ज्यामधून आपले कुटुंब, समाजाला नवी दिशा गवसेल. या कालावधीत असे विचार मंथन व्हायला हवे की जिथे जातीपातीची बंधने गळून पडतील. डोळस श्रद्धा आत्मसात करून आम्ही सख्या-सहचारिणी आहोत. एकमेकींच्या जोडीने आपल्याला मोठे व्हायचे, विचाराने सशक्त व्हायचे. त्यासाठी आत्मशक्ती हवी. ती प्राप्त होईल एकमेकींच्या सौहार्दाच्या वागणुकीतून! निरामय प्रेम, स्नेह, जिव्हाळ्याची मकर संक्रांत सर्वांसाठी फलदायी ठरो!!