मंदिरे आणि पुतळे

0
112

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्याचा एका तथाकथित ‘भक्ता’ चा प्रयत्न स्वतः मोदी यांनीच ट्वीटरवर तीव्र नापसंती व्यक्त करून हाणून पाडला हे योग्य झाले. एखाद्या व्यक्तीप्रति, विशेषतः सिने तारे तारकांप्रतीची आपली भक्तीभावना व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची मंदिरे उभारण्याचे हे फॅड दक्षिण भारतात पूर्वी पाहायला मिळायचे. आता दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून मिळणार्‍या फुकटच्या प्रसिद्धीपोटी देशभरात असे माथेफिरू निर्माण होऊ लागले आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांची अशी मंदिरे त्यांच्या चाहत्यांनी उभारलेली आहेत. दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतची अनेक मंदिरे दक्षिण भारतात दिसतील. आंध्र प्रदेशामध्ये सोनिया गांधींचे एक मंदिर आहे, जे शंकर राव नामक एका आमदारानेच उभारलेले आहे. त्यामध्ये सोनियांना थेट देवीच्या रूपात दाखवले आहे. जयललिता यांच्याविषयीचे तामिळी जनतेमधील प्रेम नेहमी किती उतू जात असते हे तर आपण पाहतोच. त्यांच्या एका भक्ताने स्वतःच्या रक्तापासून जयललिताबाईंची मूर्ती बनवून आपली निष्ठा व्यक्त केली होती. जवळजवळ अकरा लीटर गोठवलेल्या रक्तापासून बनलेली ही मूर्ती पाहून स्वतः जयललितांना चक्कर यायचीच बाकी होती. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना मध्यंतरी एका समर्थकाने अन्नपूर्णादेवीच्या रूपात एका पोस्टरवर साकारले होते. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना तर स्वतःचे पुतळे बनवण्याचे किती वेड आहे हे सर्वज्ञात आहेच. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता असताना त्या, गॉडफादर काशिराम आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले हत्ती यांचे पुतळे सरकारी पैशांनी ठायीठायी निर्माण केले गेले होते. लालूप्रसाद यादव यांच्यावर त्यांच्या एका भक्ताने ‘रामचरितमानसा’ प्रमाणे ‘लालूचरितमानस’रचले होते. लालूप्रसाद हे यादव असल्याने कृष्णावतार आहेत असे त्याने त्यातून सुचवले होते. त्यांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी आणि आजचे मित्र नितीशकुमार यांच्यावर हनुमान चालिसाच्या धर्तीवर ‘नितीश चालिसा’ रचली गेली आहे. राजकारण्यांची स्तुतीस्तोत्रे, पुतळे, मंदिरे हे सगळे उथळपण मानसिकतेचे प्रतीक तर आहेच, शिवाय सत्तेपुढील लाचारी, मिंधेपणा याचेही निदर्शक आहे. गुळाला मुंगळे चिकटावेत तशी राजकारण्यांना मतलबी माणसे चिकटलेली असतात. आपण किती निष्ठावान आहोत हे त्या नेत्याच्या मनावर ठसवण्यासाठी मग आपल्या या भक्तिभावाचे अतिरेकी प्रदर्शन ते सतत करू पाहतात. या वेडेपणापोटीच अशी मंदिरे साकारतात, भजने आळवली जातात. राजकोटमधील कोठरिया गावी असेच हे नरेंद्र मोदींची मंदिर उभे राहिले होते. मोदींचे मंदिर म्हटल्यावर प्रसिद्धी ओघाने आलीच. सवंग प्रसिद्धीच्या या खटाटोपामध्ये आपण त्या नेत्याची मानही शरमेेेने खाली घालतो आहोत याचे भान अशा भगतगणांना राहत नाही. आणखी एक प्रकार हल्ली सर्रास दिसतो तो म्हणजे एखाद्या प्रसंगाचे निमित्त करून केल्या जाणार्‍या पूजापाठ आणि यज्ञयागांचा. आता आजपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. भारताचा सामना असला की देशभरात खेळाडूंच्या नावे पूजापाठ आणि यज्ञयाग सुरू होतील आणि बातम्यांना वखवखलेली प्रसिद्धी माध्यमे हे तमाशे दाखवत राहतील. आज देशात प्रसिद्धी फार स्वस्त झालेली आहे. त्यामुळेच हे असे खटाटोप चालतात. अशा गोष्टींना किती महत्त्व द्यायचे याचे तारतम्यही माध्यमांनी बाळगण्याची वेळ आलेली आहे. वैचित्र्याच्या सोसापोटी अशा बातम्या लक्षवेधी ठरतात खर्‍या, परंतु त्यातून जगभरात भारतीयांचे हसे होत आले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये केवळ आदर्शांची पूजा होत आली आहे. मानवी जीवनासमोर ज्यांनी अजोड असे आदर्श निर्माण केले, त्या राष्ट्रपुरुषांपासून समाजाने प्रेरणा घ्यावी हा त्यामागील उद्देश असे. परंतु अशा राष्ट्रपुरुषांचा वारसा कालौघात शतकानुशतके टिकून राहतो, तो त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या बळावर. केवळ मूर्ती वा मंदिरांच्या उभारणीवर नव्हे. आक्रमकांनी या देशात सहस्त्रावधी मंदिरे फोडली, मूर्तींवर घण घातले, साम्राज्ये नष्ट केली, परंतु या राष्ट्रपुरुषांचे कार्यकर्तृत्व आणि आदर्श या सर्वांना पुरून उरले. पिढ्यांमागून पिढ्या त्या आदर्शांचे गुणगान करीत राहिल्या. ज्यांचे कार्य असे मौलिक असेल, तेच कालौघात टिकतील. त्यासाठी मंदिरांची, पुतळ्यांची गरज नाही.