मंदसौरमध्ये राहुल गांधींना अटक

0
101

>> चार तासांनंतर सुटका; पंतप्रधानांवर घणाघाती टीका

मध्यप्रदेशमधील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मंदसौरला जाऊ पाहणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काल राजस्थान-मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर अटक करण्यात आली. नंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आले. त्यांच्यासह कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह, कमलनाथ तसेच जदयूचे नेते शरद यादव यांनाही अटक करण्यात आली होती. जामीनावर सोडण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप केला.
निमचच्या सीमेवर राहुल गांधी यांनी पत्रकार व शेतकरी यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकर्‍यांना कर्ज माफि द्यायची नाही. उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्जे ते माफ करतात. मात्र शेतकर्‍यांना त्यांना गोळ्या घालायच्या आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.
गेल्या मंगळवारी मंदसौरमधील आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर गोळीबार करण्यात आला. ही बाब चुकीची व हुकुमशाहीची असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता नाही. देशात कोठेही जाण्याचे स्वातंत्र्य मला असताना मला का अडवण्यात आले असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानमधील शेतकरी आज चिंताग्रस्त आहेत. परंतु मोदी सरकार त्यांना मदत करण्यास इच्छुक नाही. उलट त्यांचा छळ केला जात आहे असे ते म्हणाले. सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत असंवेदनशील असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांनी त्यानंतर गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला व न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

राहुल गांधींमागे पोलिसांची धावपळ
राजस्थान-मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर राहुल गांधी यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अडथळे घातले होते. तेथे गाडीतून उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी पोलिसांना ढकलून ते एका मोटरसायकलवर बसून पुढे गेले. नंतर ती बदलून ते दुसर्‍या मोटरसायकलवर बसले. नंतर त्यावरून उतरून त्यांनी नजीकच्या शेतांमधून धावण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही वेळ पत्रकार, कॉंग्रेसजन व पोलिसांनाही पळापळ करावी लागली. अखेर राहुलना पोलिसांनी नजीकच्या विश्रामगृहात अटकेखाली ठेवले. तेथून चार तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.