मंत्रिमंडळात आज फेरबदल शक्य

0
126

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत आज गोवा भाजपशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
कॉंग्रेस पक्षापासून फारकत घेत वेगळा विधिमंडळ गट स्थापन करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात काल भेट घेऊन भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांची भेट लांबल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांना गुरूवारी दिल्लीत राहावे लागले आहे. त्यामुळे गुरुवारचा राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, महामंत्री सतीश धोंड व इतरांची उपस्थिती होती.

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले १० आमदार भेट घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी गोव्यात परतणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल, आघाडीतील घटक पक्ष आणि इतर विषयाबाबत दिल्लीतील बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांचे स्वागत केले. भाजपच्या नवीन आमदारांना राज्याच्या हितार्थ कार्य करण्याचा सूचना त्यांनी केली आहे.
चार मंत्र्यांना मिळणार डच्चू?
कॉंग्रेसच्या १० आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे आघाडी सरकारमधील चार मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री आणि अपक्ष मंत्र्याला वगळण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. तथापि, मंत्रिमंडळातून कुणाला वगळण्यात येणार याबाबत अद्यापर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही.

वेट अँड वॉच : विजय
कॉंग्रेसच्या १० आमदारांना भाजपमध्ये प्रवेश कशासाठी देण्यात आला हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. वेट अँड वॉच अशी आता आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

न्यायपालिकेने स्वेच्छा
दखल घ्यावी : दीपक
सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही वाचविण्यासाठी कॉंग्रेसच्या १० आमदारांच्या भाजप प्रवेश प्रकरणाची स्वेच्छा दखल घ्यावी. पक्षांतरबंदी कायदा आणखीन कडक करण्यासाठी केंद्रावर दबाव आणावा, अशी मागणी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल केली.