मंतरलेल्या काळात घेऊन जाणारी पाठ्यपुस्तके

0
299

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

आपल्या विद्यामंदिरांतून जोपर्यंत मातृभाषेची प्रतिष्ठापना शिक्षणाचे माध्यम म्हणून होत नाही, तोपर्यंत आत्मिक उद्धाराची दिशा भारतीय समाजाला लाभणार नाही. असे होत राहिले तर सकस सृजनात्मकतेची आशाच मावळेल. स्वभाषेशिवाय आत्मप्रकटीकरणाचा प्रभावी आविष्कार होणे अशक्य.

मुलांच्या संवेदनक्षम वयात सृजनात्मक शक्तींचा विकास होण्यासाठी आणि वाङ्‌मयीन अभिरुची निर्माण होण्यासाठी पाठ्यपुस्तके मोलाचा हातभार लावत असतात. भोवतालची परिस्थिती पाहता याची वानवा दिसते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ज्या पोटतिडकेने या प्रश्‍नाकडे पाहायला हवे होते तसे पाहिले गेले नाही. नियोजनबद्धतेचा आणि शैक्षणिक मानसशास्त्र समजून घेण्याचा अभाव दिसतो. या पार्श्‍वभूमीवर भूतकाळात जे काही अभिनव प्रयोग केले गेले, त्यांच्याकडे लक्ष वेधले जाते. मुलांनी केवळ कठीण शब्दसंग्रह शिकायचा नाही, भाषेच्या द्वारे केवळ उपयुक्त ज्ञान मिळवायचे नाही, तर तिच्यातील उत्तम व विविधांगी वाङ्‌मयाचा लाभ मुलांना करून द्यायचा हे उद्दिष्ट मानले गेले. ‘नवयुगवाचनमाले’ची रचना याच प्रेरणेतून झाली. आचार्य अत्रे आणि वि. द. घाटे यांनी मराठी चौथी इयत्तेपर्यंतची- बालवाचन- धरून पाच पाठ्यपुस्तके तयार केली. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी शिक्षणशास्त्रातील उच्च पदवी प्राप्त केली होती. पुढचे ‘साहित्य-परिचय’ या पाठ्यपुस्तकाचे तीन भाग प्रो. श्री. बा. रानडे आणि गं. दे. खानोलकर यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध झाले. त्यांची पहिली आवृत्ती १९३५ मध्ये प्रसिद्ध झाली. पुढे त्यांचे पुनर्मुद्रण होत राहिले. अत्रे-घाटे वाचनमालेने एका पिढीची मने घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, तेच पुढे रानडे-खानोलकर यांच्या ‘साहित्य-परिचय’ या मालेने केले. उत्तमोत्तम वेचे निवडून तत्कालीन संस्कारक्षम पिढीमध्ये भाषा आणि वाङ्‌मय यांविषयी गोडी निर्माण केली.
‘नवयुग वाचनमाले’तील ‘साहित्य-परिचय’- भाग पहिला आणि भाग दुसरा पाहिला. हे दोन्ही भाग न्याहाळून पाहताना संपादकांनी किती नियोजनपूर्वक हे कार्य केलेले आहे हे लक्षात आले. मराठी वाङ्‌मयातील दिग्गजांचा आणि त्यांच्या साहित्यकृतींचा येथे अंशात्मक परिचय होतो. या सरोवरात यथेच्छ डुंबल्यावर विशाल सागरात अवगाहन करण्याची आकांक्षा वाढीस लागावी, वाङ्‌मयाशिवाय जीवन समृद्ध करणार्‍या अन्य कलांची संलग्नता कळावी आणि आपला भविष्यकाळ तेजोमय व्हावा ही धारणा या संपादनकौशल्यातून दिसून आली. माझ्या पिढीला या पाठ्यपुस्तकांचा लाभ झाला नाही. तरी तत्पूर्वीच्या पिढीने या समृद्धीचा पुरेपूर लाभ घेतला. ते पाथेय आमच्यापर्यंत आले हेही नसे थोडके. जे जुने असते ते सगळेच सोने असते असे म्हणण्याचा उद्देश येथे नाही. पण तत्कालीन पिढीचा शिक्षणक्षेत्रातील द्रष्टेपणा आणि सर्वसमावेशकता अधोरेखित करावीशी वाटते. केवळ उत्कृष्ट कविता आणि गद्य उतारे मुलांसमोर सादर करून भागत नाही, तर त्यांतील वाङ्‌मयीन गुणांचा सम्यक आस्वाद घेता आला पाहिजे. त्यांतील अलंकार, ध्वनी, नादमाधुर्य, नर्मविनोद, वृत्तिगांभीर्य, कल्पनावैभव आणि वृत्तविशेष यांची जाणीव करून दिली पाहिजे. समुचित अवतरणे देण्याची व श्रुतयोजनकौशल्याची संथा या वयापासून प्राप्त व्हायला हवी असा दृष्टिकोन येथे दिसून येतो. ‘साहित्य-परिचय’च्या पहिल्या भागात ३९ वेचे आहेत. जुन्या काव्याचा त्यात समावेश आहे. आधुनिक कालखंडातील ना. वा. टिळक, गोपीनाथ तळवलकर, दत्त, भा. रा. तांबे, आचार्य अत्रे, यशवंत, अनिल, गिरीश, वि. द. घाटे या महत्त्वाच्या कवींच्या कविता यात आहेत. संतपरंपरेपासून आधुनिक कवितेपर्यंतच्या समृद्ध काव्यधारेचे संक्षिप्त दर्शन येथे घडते. इतिहासाची तोंडओळख आहे. त्यातून आपला समृद्ध वारसा कळावा ही जाणीव बाळगली आहे. संतश्रेष्ठ तुकारामांवरील भा. वि. वरेरकर यांचे आकाशनाट्य आहे. ‘शुक्रवारची कहाणी’मधून आपली मौखिक परंपरा समजून येते. ‘पंत मेले राव चढले’ ही दिवाकरांची बहुचर्चित नाट्यछटा येथे समाविष्ट केली आहे. ‘मनु आणि महापूर’ ही वि. कृ. श्रोत्रीय यांनी लिहिलेली ‘प्राक्कथा’ यात आलेली आहे.
‘खेड्यातील सायंकाळ’ या चित्रकार विनायक मसोनी यांच्या नवचित्रकलेला जवळच्या असणार्‍या सायंदृश्यावरील गं. दे. खानोलकर यांचा रसग्रहणात्मक लेख आहे. त्याचप्रमाणे ‘पोरकी पोर’ या पुतळ्यासंबंधीचा रसग्रहण करणारा लेख या पाठ्यपुस्तकात आहे. प्रा. श्री. बा. रानडे यांनी ‘मं मं’ या लेखात करून दिलेला मूर्तिपरिचय उल्लेखनीय वाटतो. साहित्यकलेला इतर कलांची जोड हवी हा दृष्टिकोन येथे आढळतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा ‘माझे गाण्याचे शिक्षण’ हा उत्कृष्ट विनोदी लेख यात आहे. मराठी विनोदाच्या गंगोत्रीचे हे आल्हाददायी दर्शन आहे. तेथूनच पुढे मराठी विनोदी वाङ्‌मयाचा गंगाप्रवाह झालेला आहे. वि. स. खांडेकर यांचा हरी नारायण आपटे यांच्यावरील चरित्रात्मक लेख अत्यंत उद्बोधक आहे. ‘आम्ही तर जंगलाचीं पांखरें’ (पांडुरंग श्रावण गोरे) या कवितेतून व ‘वनस्पतींचा जादूगार’ (ज. नी. कर्वे) व ‘असंतुष्ट खार’ या वेच्यांतून पर्यावरणविषयक जागरूकतेचे दर्शन घडते.
या पुस्तकातील अभ्यास आणि पुरवणीवाचनामधून विद्यार्थ्यांची जिज्ञासा कशी वाढीला लागेल याचा पुरेपूर विचार केलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा झालेला समावेशही उल्लेखनीय वाटतो.
‘साहित्य-परिचय’च्या दुसर्‍या भागात याच संपादकांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धिविकासाचे तत्त्व लक्षात घेऊन पाठ आणि कविता यांची रचना केलेली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच येथेही जुन्या काव्यपरंपरेतील मोरोपंताच्या ‘संशयरत्नमाले’तील रचना आहे. ‘न्यायदक्ष माधवराव पेशवे’ हा सोहनीकृत पेशव्यांच्या बखरीतून उतारा घेतलेला आहे. कृष्णदयार्णव, वामनपंडित, पां. व्यं. चिंतामणी पेठकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, चंद्रशेखर यांच्या काव्यरचना आहेत. त्याचप्रमाणे दत्त, भवानीशंकर पंडित, अज्ञातवासी, यशवंत, गिरीश, वि. द. घाटे, मनोरमाबाई रानडे, वा. भा. पाठक, भा. रा. तांबे आणि ह. स. गोखले या आधुनिक कवींना या पाठ्यपुस्तकात स्थान मिळालेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात चित्ररसग्रहणे आहेत. मूर्तिपरिचय आहे. चंद्रशेखरांची ‘हिंदवंदना’ ही कविता प्रारंभीच आहे. मुलांमध्ये राष्ट्रप्रेम रुजावे ही प्रेरणा त्यामागे आहे. नाट्याभिनयाची आवड निर्माण व्हावी म्हणून जेरोम के. जेरोम यांच्या विनोदी कथेवर बेतलेले सौ. शालिनीबाई रानडे यांचे ‘लागली एकदाची तसबीर’ या नाटकातील नाट्यसंवाद आहे. ‘एका दिवसाची दैनंदिनी’ हा मनोरंजक पाठ आहे. दैनंदिनी लिहिणार्‍या माणसांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर येथे प्रकाश टाकलेला आहे.
विष्णुशास्त्री चिपळूणकर (वि. कों. ओक) आणि गोपाळ गणेश आगरकर (देव न मानणारा देवमाणूस- वि. स. खांडेकर) या प्रज्ञावंतांचा परिचय करून देणारे दोन चरित्रात्मक लेख या पाठ्यपुस्तकात आहेत. मुलांचे चारित्र्य घडविणे आणि भाषाकौशल्याचे संस्कार करणे ही उद्दिष्टे या पाठांमागे आहेत. चिपळूणकर आणि आगरकर यांचे समाजप्रबोधनाच्या कार्याबरोबरच मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. तत्कालीन पिढीच्या मनाची मशागत व्हायला हे पाठ किती फलदायी ठरले असतील! ‘मुंबईंतील तात्यापंतोजींची शाळा’ हा दादोबा पांडुरंग यांच्या आत्मचरित्रातील उतारा आहे. यातील भाषेचे वळण जरी जुने वाटत असले तरी हा पाठ उद्बोधक वाटतो. तो गतकाळातील शिक्षणपद्धतीवर प्रकाश टाकणारा आहे. त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती कशी होती हे त्यातून कळून येते. माणसाला उपजतच भूतकाळाविषयी एकप्रकारचे आकर्षण वाटत असते. अशा बाबींतून खूप काही शिकता येते. स्मरणरंजनात्मक लेखन करणे अनेकांना आवडते. त्यांना हा लेख मार्गदर्शक ठरणारा आहे.
‘व्हिक्टोरिआवाला’ हे जिवंत आणि रसरशीत व्यक्तिचित्र या पुस्तकात आहे. प्रसिद्ध लेखक आणि वाङ्‌मयीन नियतकालिकांचे प्रथितयश संपादक कुमार रघुवीर (रघुवीर ज. सामंत) यांनी ते लिहिले आहे. वास्तव अनुभूतीवर ते आधारलेले आहे. त्यातील घटना, प्रसंग आणि वातावरणनिर्मिती पाहता ते एकीकडे कथेशी नाते जुळविणारे आहे; तर आत्मानुभवामुळे ललित निबंधाशीही जवळीक साधणारे आहे. मुलांना अवतीभोवतीची माणसे टिपण्याची आणि त्यांच्या मनातील कुतूहल जागे करण्याची सवय अशा पाठामुळे लागते. गोपीनाथ तळवलकर यांचे ‘उषा’ हे शब्दचित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती एक आदर्श मुलगी आहे. ‘सवदा अंगावर आला’ (विनीत), ‘गरिबाची अधेली’ (प्रा. रा. भि. जोशी), ‘रेनकोटाची साहसे’ (कॅप्टन लिमये) या कथा या पुस्तकात आहेत. त्या मन रिझविणार्‍या आहेत आणि जीवन कसे जगावे हे शिकविणार्‍याही आहेत. कुमारवयाला साजेशा अशाच त्या आहेत. मुलांच्या भावनाप्रधानतेला आणि खेळकर वृत्तीला अशा प्रकारचे साहित्य हवे.
‘तृणाची थोरवी’ (साने गुरुजी), ‘विरोळ्याने काय शिकविले?’ (प्रो. वा. ब. पटवर्धन), ‘अज्ञानाचा आनंद’ (अनंत कणेकर), ‘पांडुतात्यांची झोंप’ (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर) आणि ‘चिंगी महिन्याची झाली नाहीं तोंच’ (दिवाकर) या वेच्यांमुळे उत्तम साहित्याची मेजवानीच कुमारवयीन विद्यार्थ्यांना लाभलेली आहे. हे सगळे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. शैलीकार आहेत. समर्पित भावनेने त्यांनी मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी स्वतःला वाहून घेतले होते.
जीवनाच्या विविधांगांना स्पर्श करणार्‍या ‘नवयुग वाचनमाले’च्या या पाठ्यपुस्तकांनी त्या पिढीचे पारतंत्र्यकालातदेखील योग्य दिशेने पोषण केले. मातृभाषेच्या विकासासाठी ती सक्षम झाली.
***********
८१ वर्षांपूर्वीच्या या पाठ्यपुस्तकांचे स्वरूप आणि अंतरंग पाहताना मनात काही तरंग उमटले. या पाठ्यपुस्तकात संपादकीय दृष्टी आढळते. ही पाठ्यपुस्तके आहेत याची त्यांना निश्‍चित कल्पना आहे. म्हणून आवर्जून त्यांनी अधोरेखनदेखील केलेले आहे. पण तात्कालिक लाभापेक्षा आपण भावी पिढ्यांसाठी अक्रोडाचे झाड लावीत आहोत ही मर्मदृष्टी त्यांनी मनाशी बाळगली आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने मुलांच्या मूलगामी प्रेरणांचा, प्रज्ञेचा, प्रतिभेचा आणि कल्पनाशक्तीचा क्रमवार संगतीने विकास होत जातो. सुलभतेकडून काठिण्यपातळीपर्यंत नेऊन मुलांच्या शब्दसंपत्तीची वाढ करायची असते. शब्दसंपत्ती निराळी आणि शब्दकळेचे सौंदर्य निराळे. रुक्षता टाकून भाषिक वारशातील विचारवैभव आणि विचारसौंदर्य यांची ओळख करून द्यायची असते. यातून नव्या पिढीला सशक्त जीवनानुभवांची अभिव्यक्ती करता येते. या पाणपोईतील पाणी तहानलेल्या पिढीला देण्यात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
एकच प्रश्‍नचिन्ह डोळ्यांसमोर उभे राहते आणि ते क्रमाक्रमाने मोठे होत जाते. भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली. शिक्षणाची गंगा जनसामान्यांच्या अंगणापर्यंत आली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात साहित्याची वाढ सर्वांगांनी होत राहिली. विश्‍वकोशनिर्मिती झाली. संस्कृतिकोशनिर्मिती झाली. विश्‍वचरित्रकोश झाले. माहिती युगाच्या एका उच्चबिंदूपर्यंत आलो. पण या ज्ञानात्मक साठ्याचे प्रतिबिंब आपल्या आजच्या पाठ्यपुस्तकात का पडत नाही? आपल्या पाल्यांना परभाषेतून शिक्षण द्यावे असे पालकांना का वाटायला लागले आहे? आपण इतके पश्‍चिमाभिमुख का झालो? केजीपासून पीजीपर्यंत परभाषेच्या ओंजळीतून पाणी पाजून अनेक पिढ्यांच्या भवितव्याच्या वाटा आपण रोखू का पाहतो? भौतिक समृद्धीचे मोहजाल आपल्या डोळ्यांवर कोणी ओढले? आपणच ना?
आपल्या विद्यामंदिरांतून जोपर्यंत मातृभाषेची प्रतिष्ठापना शिक्षणाचे माध्यम म्हणून होत नाही, तोपर्यंत आत्मिक उद्धाराची दिशा भारतीय समाजाला लाभणार नाही. असे होत राहिले तर सकस सृजनात्मकतेची आशाच मावळेल. स्वभाषेशिवाय आत्मप्रकटीकरणाचा प्रभावी आविष्कार होणे अशक्य. यासंदर्भात रवींद्रनाथांच्या विचारधारेची पुनः पुन्हा आठवण होते.