मंगलदिन आला…

0
450

भारताचे ‘मंगलयान’  मंगळाच्या कक्षेत; पहिल्याच प्रयत्नात झगमगते यश
अवकाश संशोधनाच्या इतिहासात काल भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. भारताचे ‘मंगलयान’ यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत जाऊन पोचले. आजवर केवळ अमेरिका, रशिया आणि युरोपची अंतराळयाने मंगळापर्यंत पोहोचली आहेत. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत जाणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ‘अनेक संकटे होती, पण आम्ही टिकलो’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या पाठीवर प्रशंसेची थाप दिली.
भारताचे मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) असलेले ‘मंगलयान’ नऊ महिन्यांपूर्वी अवकाशात झेपावले होते. पृथ्वी ते मंगळाच्या कक्षेपर्यंतचे ६५ कोटी किलोमीटर अंतर पार करून हे अवकाशयान काल सकाळी आपल्या निर्धारित ठिकाणापर्यंत पोचले. मंगळाच्या कक्षेत त्याचा प्रवेश करविणे फार जिकिरीचे होते, परंतु अगदी पूर्वनियोजनानुसार काल दि. २४ रोजी सकाळी ७.५५ वा. ते मंगळाच्या कक्षेत प्रवेशकर्ते झाले. ते आता मंगळाच्या पृष्ठभागापासून ५१५ किलोमीटरवर आहे.
भारताचे मंगलयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत सुखरूप पोचल्याची पुष्टी अमेरिकेच्या गोल्डस्टोन येथील, स्पेनमधील माद्रीद व ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील ‘नासा’च्या केंद्रांनी दिली. भारताच्या बेंगळुरूनजीकच्या बायलालू येथील स्पेस नेटवर्क केंद्रात रेडिओ सिग्नलद्वारा तसा संदेश मिळाला.
हे मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करताना त्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भल्या सकाळी इस्त्रोच्या बंगळुरू येथील केंद्रात उपस्थित होते. त्यांनी यशस्वी मंगळयान मोहिमेबद्दल इस्त्रो वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. ही आता ‘पुढचे आव्हान पेलण्यासाठीची सुरुवात व्हावी’ अशा शब्दांत मोदींनी त्यांना सदीच्छा दिल्या. ‘असाध्य ते साध्य करून दाखवले’ अशा शब्दांत त्यांनी त्यांचे कौतुक केले. ‘हा इतिहासातील मैलाचा दगड ठरेल.’ असे ते म्हणाले. ‘भारत एक राष्ट्र म्हणून काय करू शकतो, हे या यशस्वी मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. हे यान भारताने संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित केले आहे, हे सुद्धा विशेष आहे’ असे त्यांनी नमूद केले.
मंगळयान मंगळाच्या कक्षेत सुखरूप दाखल होण्याच्या कालच्या ऐतिहासिक घटनेनंतर इस्त्रो जगातील अशा प्रकारची मोहीम सफल करणार्‍या अन्य केवळ तीन अवकाश संस्थांच्या पंक्तीत मानाने बसली आहे. यापूर्वी मोहीम फत्ते करणार्‍यांत अमेरिकेची ‘नासा’, रशियाची ‘रशियन फेडरल स्पेस एजन्सी’ व युरोपीय महासंघाची ‘युरोपीयन स्पेस एजन्सी’ यांचा समावेश आहे. अमेरिका, रशिया व युरोपची मंगळयात्रा यशस्वी ठरली असली तरी त्यासाठी त्यांना अनेकदा प्रयत्न करावा लागला होता. चीन आणि जपानलाही मंगळ मोहीमेत अपयश पदरी पडले आहे.
२०११ साली चीनने मंगळ ग्रहावर ‘यिंघोऊ – १’ यान पाठवले होते, मात्र वाटेतच त्यात बिघाड निर्माण होऊन मोहीम अयशस्वी ठरली होती. त्याआधी १९९८ साली जपानने मंगळावर यान सोडले होते, मात्र वाटेतच इंधन संपून ते यान भरकटले होते.
रोमांचकारी क्षण
मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्याचा शेवटचा महत्त्वपूर्ण टप्पा बुधवारी पहाटे ४.१७ वा. सुरू झाला. यावेळी यान मध्यम गतीच्या अँटेनाद्वारे रेडिओ सिग्नल स्वीकारण्यास सुरुवात करणार होते. त्यानंतर पहाटे ६.५७ वा. यानाने आपली दिशा निश्‍चित केली. ७.१७ वा. यानाचे मुख्य इंजिन सुरू करण्यात आले. विशिष्ट गती राखून त्यानंतर यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मंगळयान ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत असतानाच सकाळी ७.१२ वा. मंगळावर सूर्यग्रहण होत होते. मंगलयानचे मुख्य इंजिन ७.३० वा. प्रत्यक्ष सुरू झाले व यानाला मंगळ कक्षेत घेऊन गेले. कक्षेत प्रवेश करतेवेळी यानाची गती २२.२ कि. मी प्रति सेकंद वरून २.१४ मीटर प्रति सेकंद अशी कमी करण्यात आली होती.
पाच उपकरणांद्वारे मंगळाचा अभ्यास
४७५ किलो वजनाच्या या यानावर एकूण पाच वैज्ञानिक उपकरणे बसवलेली आहेत. ती मंगळ ग्रहाचा अभ्यास करतील. मंगळाचा पृष्ठभाग, तेथील खनिज रचना यांचा, तसेच तेथील हवेत जीवसृष्टीला पोषक घटक व मिथेन वायूची उपस्थिती आहे का याचा शोध हे यान घेणार आहे. हे मंगळयान गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर २०१३ रोजी चेन्नईपासून ८० कि.मी. वर बंगाल उपसागरात स्थित असलेल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे आकाशात झेपावले होते.
‘‘जब काम मंगल होता है
इरादे मंगल होते है
तो मंगलकी यात्राभी
मंगल होती है…’’   
भारताची महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक ‘मंगळ मोहीम’ पहिल्या प्रयत्नातच फत्ते झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः ‘इस्रो’च्या मार्स मिशन कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होते. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचे कौतुक करताना इस्रोच्या शास्त्रज्ञांविषयी प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ‘मॉम’ (मार्स ऑर्बिटर मिशन) आणि मंगळाचे काल मनोमीलन झाल्याचेे उद्गार यावेळी पंतप्रधानांनी काढले.
मोदी म्हणाले, ‘‘मिशनचा शॉर्टङ्गॉर्म जेव्हा ‘मॉम’ असा तयार झाला तेव्हाच मला ही मोहीम यशस्वी होणार याबाबत दृढ विश्‍वास होता. ‘मॉम’ कधी निराशा करत नाही. जेव्हा आपला क्रिकेट संघ स्पर्धा जिंकून मायदेशी परततो, तेव्हा संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा होतो. शास्त्रज्ञांची आजची कामगिरी क्रिकेटच्या त्या विजयापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. आजचा दिवस संपूर्ण देशात ‘आनंदोत्सव’ साजरा झाला पाहिजे. शाळा – महाविद्यालयांनी हे यश साजरे करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. अत्यंत कमी सुविधा असूनही एवढे मोठे यश मिळवणे, ही भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाची पावती आहे.’’

 हाऊडी आणि नमस्ते!

६७० दशलक्ष किलोमीटरचा ३०० दिवसांचा प्रवास करून भारताचे मंगलयान मंगळाच्या कक्षेत पोहोचले, तेव्हा अमेरिकेच्या मंगळ मोहिमेवरील ‘क्युरिओसिटी’ ने ‘नमस्ते, मार्स ऑर्बिटर! अभिनंदन’ असे ट्वीट करून त्याचे स्वागत केले. त्यावर ‘‘हाऊडी, मार्स क्युरिओसिटी? कीप इन टच. आय विल बी अराउंड’’ अशा शब्दांत मंगलयानने ‘नासा’ च्या ‘क्युरिओसिटी’ ची खबरबात घेतली. ‘क्युरिओसिटी’ ने ‘इस्रो’चेही अभिनंदन केले! ट्वीटरवरच्या या ‘मार्स ऑर्बिटर’ खात्यातील हा संवाद सुरू होताच दोन तासांच्या आत २२ हजार फॉलोअर्सनी या संवादाचा पाठपुरावा सुरू केला आणि बघता बघता त्यात वाढ होत गेली. ‘व्हॉट इज रेड, इज अ प्लॅनेट अँड इज द फोकस ऑफ माय ऑर्बिट?’ ही ट्वीट सहा हजार वेळा पुन्हा ट्वीट झाली आणि ‘आय विल बी बॅक आफ्टर ब्रेकफास्ट.’ ने त्याला उत्तर मिळाले. ‘ट्वीटर’वर काल भारतात मंगलयान हा ट्रेंडिंग विषय राहिला.
सर्वांत स्वस्त मोहीम
मंगलयान मोहिमेवरील खर्चापेक्षा ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलिवूडपटाला अधिक खर्च आला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल ‘इस्रो’च्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. खरोखरच अत्यंत कमी खर्चात व कमी वेळेत ही मोहीम राबवण्यात ‘इस्रो’ला यश आले आहे. २०१० साली या मोहिमेची आखणी सुरू झाली. २०१२ साली तिला मंजुरी मिळाली. २०१३ मध्ये मंगलयान प्रक्षेपित केले गेले आणि २०१४ मध्ये ते मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचले. पंधरा महिन्यांच्या विक्रमी काळामध्ये या मंगलयानाची उभारणी झाली.
मंगळ लाल का?
आपल्या सूर्यमालेेतील दुसरा सर्वांत लहान ग्रह मंगळ हा सूर्यापासून चौथा ग्रह आहे. ग्रहाच्या पृष्ठभागात लोह भस्म (आयर्न ऑक्साइड) भरपूर प्रमाणात असल्याने ग्रहावरून लाल रंग परावर्तित होतो. त्यामुळे मंगळाला लाल ग्रह (‘रेड प्लॅनेट’) म्हणण्याचा प्रघात आहे. रोममधील युद्धाच्या देवतेला अनुसरून या ग्रहाला ‘मार्स’ हे नाव पडले असे मानले जाते. पृथ्वी व मंगळ अक्षाभोवती एकाच गतीने फिरतात. पृथ्वीला स्वत:च्या अक्षाभोवती फिरण्यास २४ तास लागतात, तर मंगळाला २४ तास ३७ मिनिटे लागतात. सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीला ३६५ दिवस तर मंगळला ६८७ दिवस लागतात.

‘मंगळयान’चे मोहिमेचे शिलेदार

• १. के. राधाकृष्णन, अध्यक्ष, इस्रो
• २. एम. अन्नादुराई
• ३. एस. रामकृष्णन
• ४. एस. के. शिवकुमार
• ५. पी. कुन्हीकृष्णन
• ६. चंद्रदत्तन
• ७. ए. एस. किरणकुमार
• ८. एम. वाय. एस. प्रसाद
• ९. एस. अरुनन
• १०. बी. जयकुमार.
• ११. एम. एस. पन्नीरसेल्वम
• १२. एस. अरुनन
• १३. व्ही. केशव राजू
‘इस्रो’चा चढता आलेख
* १५ ऑगस्ट, १९६९ : विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची स्थापना.
* १९७१ : उपग्रह दळणवळण तळ श्रीहरीकोटा कार्यान्वित.
* १ जून, १९७२ : अंतराळ विभागाची स्थापना.
* १९७२ : इस्रो सॅटलाइट सेंटर, बेंगळुरूची स्थापना.
* १९ एप्रिल, १९७५ : पहिला भारतीय उपग्रह ‘आर्यभट्ट’चे प्रक्षेपण.
* ७ जून, १९७९ : ‘भास्कर’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
* १० ऑगस्ट, १९७९ : एसएलव्ही – ३ उपग्रहाचे प्रक्षेपण.
* ३० ऑगस्ट, १९८३ : भारतीय राष्ट्रीय उपग्रह ‘इन्सॅट’चे प्रक्षेपण.
* ३४ मार्च, १९८७ : एएसएलव्ही व आधुनिक एसएलव्ही-३ चे प्रक्षेपण.
* १२ जून, १९९० : इन्सॅट-१-डी उपग्रह अंतराळात दाखल.
* २९ ऑगस्ट, १९९१ : इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट प्रक्षेपित.
* १८ एप्रिल, २००१ : जीएसएटी-१ दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण.
* २२ ऑक्टोबर, २००८ : चांद्रयान मोहीम यशस्वी.
* २४ नोव्हेंबर, २०१४ : मंगळयानाचा मंगळाच्या कक्षेत प्रवेश.
मंगळ मोहिमेविषयी…
* सोव्हिएत रशिया, अमेरिका आणि युरोपनंतर मंगळाच्या कक्षेत आपले यान यशस्वीरीत्या पाठविण्याचा बहुमान भारताने प्राप्त केला आहे.

* मंगळावरील आजवरच्या ५१ मोहिमांपैकी फक्त २१ मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.

* आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.

* मंगळावरील पहिली मोहीम ‘नासा’ ने १९७१ मध्ये ‘मरीनर – ९’ द्वारे यशस्वी केली.

* चीन आणि जपानच्या मंगळ मोहिमाही फसल्या आहेत. चीनचे ‘यिंघुव-१’ २०११ मध्ये असफल ठरले.

* मंगलयानाचा आकार टाटांच्या नॅनो कारएवढा आहे.

* इस्रोच्या या मंगळ मोहिमेवर ६७ दशलक्ष डॉलर म्हणजे साडे चारशे कोटी रुपये खर्च आला आहे.

* मंगळयानावर लिमॅन अल्फा फोटोमीटर (एलएपी), मिथेन सेन्सर फॉर मार्स (एमएसएम), मार्स एक्झोस्फेरिक न्यूट्रल कंपोझिशन ऍनलायझर (एमईएनसीए), मार्स कलर कॅमेरा (एमसीसी) व थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेट्रोमीटर (टीआयएस) ही सौर ऊर्जेवर चालणारी पाच उपकरणे आहेत.

* मंगळाच्या कक्षेत भ्रमण करणार असणारे मंगलयान मंगळ ग्रहापासून कमीत कमी ३६५ कि. मी वरून व जास्तीत जास्त ८० हजार कि. मी. वरून प्रवास करील.