भ्रमनिरास

0
101

आम आदमी पक्षातील अंतर्गत संघर्षाने आता टोक गाठले आहे. अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदियांसह पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे दिल्ली निवडणुकीवेळी पक्षाच्या विरोधात वावरत होते हा केलेला जाहीर आरोप, गेल्या वेळी आपल्या सरकारला सहा कॉंग्रेस आमदारांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न केजरीवालांनी चालवला होता हा पक्षाच्या आणखी एका नेत्याने ध्वनिमुद्रित पुराव्यासह केलेला आरोप, अंजली दमानिया यांनी या सार्‍या प्रकाराने व्यथित होऊन पक्षाला दुसर्‍यांदा ठोकलेला रामराम या सगळ्यांतून आम आदमी पक्षाविषयी जो ‘वेगळेपणा’ चा फुगा फुगवण्यात आलेला होता, तो पार फुटून गेला आहे. या पक्षामध्ये वेगळेपण नावालाही राहिलेले नाही. जे इतर राजकीय पक्षांमध्ये चालते, तेच जर येथेही चालत असेल, तर मग त्याचे वेगळेपण राहिलेच कोठे? प्रशांत भूषण आणि योेगेंद्र यादव यांना आपल्या ‘दिल्ली गँग’च्या जोरावर पक्षाबाहेर काढण्याचा चंगच अरविंद केजरीवाल यांनी बांधलेला दिसतो. स्वतः पूर्ण नामानिराळे राहून आपल्या बगलबच्च्यांमार्फत त्यांनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पक्षाबाहेर काढण्याची सारी तयारी केलेली आहे. पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाची प्रतिमा कलंकित करणारी माहिती माध्यमांना पुरवणे, केजरीवाल यांची प्रतिमा मलीन करणे असे गंभीर ठपके त्यांच्याविरुद्ध ठेवण्यात आलेले आहेत. खरे तर आम आदमी पक्षाच्या एकूण कार्यपद्धतीसंदर्भातील आपली नाराजी या नेत्यांनी लिखित स्वरूपात व्यक्त केलेली आहे आणि त्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, लोकशाहीची बात सांगणारे केजरीवाल त्या मुद्द्यांवर तोंड उघडायलाही तयार नाहीत. उलट पक्षाच्या नवनिर्वाचित ६७ आमदारांच्या एका दोन पानी पत्रावर जबरदस्तीने सह्या घेऊन त्यांना प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्याविरुद्ध भूमिका घेण्यास भाग पाडले जाऊ लागल्याच्या बातम्या आहेत. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये उमेदवारांच्या निवडीची पद्धत, पक्षासाठी निधी गोळा करण्याची पद्धत, पक्षाचा पैसा खर्च करण्याची पद्धत या सगळ्याविषयी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, परंतु त्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारणार्‍यांनाच पक्षद्रोही ठरवून बाहेरची वाट दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केजरीवाल यांच्या टोळीने चालवलेला आहे. पक्षाचे अंतर्गत लोकपाल ऍडमिरल रामदास यांनीही पत्र लिहून पक्षात जे चालले आहे, त्याबाबतची आपली नाराजी व्यक्त केली आहे, परंतु त्यांनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत. स्वतःचे सरकार टिकवण्यासाठी गेल्या वेळी कॉंग्रेसच्या सहा आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला होता असा आरोप पक्षाच्या एका नेत्याने केला आहे आणि आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ध्वनिमुद्रणही सादर केलेले आहे. म्हणजे इतर राजकीय पक्ष जसा घोडेबाजार करतात, तसा आम आदमी पक्षही करू पाहात होता असा त्याचा अर्थ होतो. मग कसला राजकीय ‘पर्याय’ हा पक्ष आजवर सांगत होता? योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत राजकीय सल्लागार समितीतून बाहेर हाकलण्यात आले. आता मनीष सिसोदिया प्रभृतींनी केलेले आरोप पाहता, त्यांना पक्षाबाहेर हाकलण्याचेच प्रयत्न या मंडळींनी चालविलेले दिसतात. येत्या २८ मार्च रोजी पक्षाची आमसभा भरणार आहे. त्या आमसभेमध्ये पक्षाचे केवळ दिल्लीचे नेते नव्हेत, तर देश – विदेशातील शाखांचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे तिथे केजरीवाल कंपूला शह देण्याचा प्रयत्न प्रशांत भूषण व यादव करणार आहेत. ‘पूर्ण सत्य लवकरच बाहेर येईल’ हा भूषण यांचा इशारा तेच सुचवतो आहे. अर्थात, तत्पूर्वी पक्षातूनच त्यांच्या हकालपट्टीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आमदारांची सह्यांची मोहीम राबवली जात आहे असे दिसते. म्हणजे आम आदमी पक्षामध्ये जो कोणी केजरीवाल यांच्याकडे बोटे दाखवील, त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जाईल अशी एकंदर स्थिती आहे. ज्या लोकशाहीचा घोष हे लोक करीत आले, ती पक्षात राहिली आहे कोठे? खांद्याला खांदा लावून पक्ष उभारणार्‍यांनीच उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याची ज्यांची तयारी नाही, त्यांनी लोकशाहीवर बोलूच नये!