भीषण व अमानुष

0
199

ईजिप्तमधील उत्तरी सिनाई प्रांतातील मशिदीवर झालेला हल्ला हा जगातील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक म्हणावा लागेल. शुक्रवारच्या प्रार्थनेवेळी बॉम्बस्फोट करून आणि नंतर बाहेर पडणार्‍या भाविकांवर अंदाधुंद गोळीबार करून हे मृत्यूचे तांडव घालणारे सैतान आयसिसचेच दहशतवादी असल्याचे दिसते आहे. इराक आणि सीरियामधून एकेका शहराचा ताबा गमावलेली आयसिस आता अशा भीषण दहशतवादी हल्ल्यांद्वारे जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यांत डोके वर काढण्याची शक्यता आहे. ईजिप्तमधील हल्ला हा अशाच प्रकारचा आयसिसच्या स्थानिक सहयोग्यांनी घडवला आहे. नुकतेच आपल्या काश्मीरमध्येही आयसिसने डोके वर काढले आहे. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी आयसिसच्या झेंड्याखाली वेगवेगळे घटक आपले अस्तित्व दाखवून देऊ पाहात आहेत. काहींमध्ये तर आयसिसच्या नेतृत्वासाठीही अंतर्गत संघर्ष आहे आणि म्हणूनच अत्यंत भयावह दहशतवादी हल्ल्याद्वारे आपली दहशत निर्माण करून खिलाफत गमावलेल्या आयसिसचे नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा काही गटांचा प्रयत्न आहे. ईजिप्तमधील ताजा हल्ला हा सुन्नींच्या मशिदीवरच, परंतु सुफी तत्त्वज्ञान मानणार्‍यांवर झाला आहे. गेली चार वर्षे ईजिप्तमध्ये दहशतवादी कारवायांनी उचल खाल्ली आहे, परंतु आजवर लष्कर, पोलीस आणि ख्रिस्ती चर्चवर दहशतवादी हल्ले होत आले होते. प्रथमच एका मशिदीवर आणि तोही एवढ्या भीषण स्वरूपात हा हल्ला चढवला गेला आहे. उदारमतवादी सुफी तत्त्वज्ञान हे कट्टरपंथियांचे नेहमीच लक्ष्य ठरत आले आहे. मृत संतांना पुजणार्‍या सुफींना कडवे सलाफी पापी मानतात. साहजिकच आयसिसचे ते लक्ष्य बनले आहेत. ठिकठिकाणी यापूर्वी अशा प्रकारचे हल्ले सुफींवर आयसिसने केले आहेत. उत्तर आफ्रिकेपासून इराकपर्यंत असे हल्ले झाले आहेत. त्यात या हल्ल्याला आणखीही काही अंगे आहेत. ईजिप्तचे मुस्लीम ब्रदरहूडचे महंमद मुरसी यांचे लोकशाही सरकार उलथून टाकून सत्ता पटकावलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी मुरसींना कैदेत टाकून त्यांच्या समर्थकांविरुद्ध कडवा संघर्ष अवलंबिला आहे. यापूर्वी कैरोतील मुरसी समर्थकांच्या छावण्यांत घुसून त्यांची कत्तल करण्यात आली होती. मुस्लीम ब्रदरहूड आणि विद्यमान लष्करशहा यांच्यातील संघर्ष तीव्र बनलेला आहे. सिसी राजवटीने गेली दोन वर्षे मुस्लीम ब्रदरहूडविरोधात जोरदार मोहीम राबवलेली आहे. अनेक प्रांतांमध्ये यादवीसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे वा होण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी काही स्थानिक टोळ्या विद्यमान लष्करशहाला पाठिंबा देत आहेत. स्थानिक बेदोईनी सीमेपलीकडून होणार्‍या शस्त्रास्त्र तस्करीला थोपवण्यासाठी सरकारला मदत करीत असतात. त्याचा रागही या हल्ल्यात काढला गेला आहे. आयसिसच्या नावाखाली हा हल्ला झाला असला तरी जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आयसिसच्या नावे दहशतवादी कारवाया करणार्‍या मंडळींमध्ये समन्वय असेलच असे नाही. त्या कडव्या विचारधारेने प्रभावित झालेले वेगवेगळे गट स्वतंत्रपणे असे हल्ले चढवत असतात. त्यांना पैसाही वेगवेगळ्या स्त्रोतांकडून उपलब्ध होत असतो. ईजिप्तमधील अन्सार बायत अल मकदीस ही संघटना अल कायदाची समर्थक होती. दोन – तीन वर्षांपूर्वी ती अल कायदापासून फुटून निघाली आणि आता स्वतःला आयसिसची हस्तक म्हणवत आहे. अशा प्रकारच्या आयसिसच्या घटकांकडून हे हल्ले घडविले जात असतात. हल्ला जेवढा भीषण तेवढी त्या संघटनेची पत वाढते. त्यामुळे खिलाफत गमावलेल्या आयसिसच्या घटक असलेल्या अशा संघटना भीषण दहशतवादी हल्ले चढवण्यामागे लागलेल्या आहेत. ईजिप्तमध्ये दुर्दैवाने त्यांना यश आले. दोनशेहून अधिक माणसे त्यात बळी गेली. आता हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत राष्ट्राध्यक्ष सिसींनी दिले आहेत. ते स्वतः एक लष्करशहा असल्याने या हल्ल्याच्या निमित्ताने एखादी रक्तरंजित मोहीम ईजिप्तमध्ये ते राबवू शकतात. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्वीटरवरील आपल्या प्रतिक्रियेत ‘टफर अँड स्मार्टर’ प्रत्युत्तराची भाषा केलेली आहे. म्हणजेच आयसिसविरुद्ध अधिक कठोर आणि अधिक चतुर प्रत्युत्तर देण्याची मोहीम अमेरिका राबवील असा त्याचा अर्थ आहे. आता ईजिप्तमध्ये इराकप्रमाणे अमेरिका प्रत्यक्ष मोहीम राबवणार का, तेथील लष्कराला प्रशिक्षण व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे का हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु ते स्वस्थ बसणार नाहीत हे निश्‍चित.आयसिस हा शेवटी संपूर्ण जगासाठी धोका असल्याने त्याचा नायनाट ही मानवतेवर विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी प्राथमिक जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. भारतामध्येही मोठा घातपात घडवण्यासाठी आयसिस उतावीळ आहे. ईजिप्तमधील हल्ला हा आपल्यासाठीही धोक्याचा इशाराच आहे.