भीषण अपघात

0
109

रायबंदर येथील भीषण अपघातात चौघांचा अंत होण्याची दुर्घटना कोणाच्याही ह्रदयाला पाझर फोडणारी आहे. मात्र, अशा दुर्घटनांपासून बोध घेऊन गोमंतकीय वाहनचालक आपल्या बेशिस्त व बेदरकार गाडी चालवण्याला पायबंद घालणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. देशातील सर्वाधिक बेशिस्त वाहतूक असलेल्या राज्यांपैकी गोवा हे एक आहे हे आधी आपल्याला मान्य करावे लागेल. मद्यपान करून वाहने चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, वेगमर्यादेचे पालन न करणे या गोष्टी गोव्यात सर्रास दिसतात. प्रस्तुत अपघातात सर्व वाहने अत्यंत भरधाव चालली होती, हे दुर्घटनेनंतर त्यांची झालेली स्थिती दर्शवते. वेगामुळेच कारगाडी थेट नदीपात्रात जाऊन उलटली आणि दुचाकीवरील माणसेही उसळून पाण्यात पडली. अपघाताची भीषणता ही वेगामुळे वाढत असते. ‘अति घाई, संकटात नेई’ हे केवळ घोषवाक्य नाही, तर ती वस्तुस्थिती आहे, हे हा अपघात सांगून गेला आहे. या अपघातामध्ये कोणाची चूक होती हे नीट स्पष्ट होऊ शकलेले नाही, परंतु सर्वच वाहने भरधाव असल्याने एका क्षणी त्यांची एकमेकांना धडक बसली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सध्या गोव्यातील सर्व रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत आहेत आणि दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढतच चालली आहे. सध्या पर्यटक हंगाम असल्याने पर्यटकांच्या वाहनांची दाटी सर्व रस्त्यांवर दिसते. परराज्यांतून आपल्या वाहनाने येणार्‍या वा स्थानिक दुचाक्या भाड्याने घेऊन भटकणार्‍या या पर्यटकांना गोव्यातील रस्त्यांची नीट माहिती नसल्याने वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन चालते. दुर्दैवाने आपल्या वाहतूक पोलिसांचा भर केवळ शहरामध्ये या वाहनचालकांकडून राज्याच्या आणि अनेक वेळा स्वतःच्या तिजोरीत भर घालण्यावर असल्याने बाकी वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला असतो. सध्या पर्यटक वाहनांची संख्या आणि सेंट झेवियरचे नुकतेच संपलेले शवदर्शन आदींमुळे खासगी सुरक्षारक्षकांचीदेखील मदत घेण्यात आलेली आहे. मात्र, ही व्यवस्था वरवरची असते. गोव्यातील काही ठिकाणे अपघातांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानली जातात. आगशी बायपास, बांबोळीची चढण अशा काही ठिकाणी हमखास अपघात घडतात. अशा ठिकाणी सातत्याने अपघात घडतच आलेले आहेत. पणजी – रायबंदर रस्ता हेही असेच एक सतत अपघात घडणारे ठिकाण आहे. वर्षे उलटली, तरी रायबंदरच्या रस्त्यांची स्थिती काही बदलू शकलेली नाही. या परिसरात दाटीवाटीने घरे असल्याने रस्ता रुंदीकरण शक्य नाही. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीतून सुटल्यावर ही वाहने भरधाव सुसाटत निघतात. मुळातच अरूंद रस्ता आणि हा वेग यातून अपघाताला निमंत्रण मिळाल्याखेरीज राहत नाही. अशा दुर्घटना सातत्याने गोव्यात घडत असूनही त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही, कारण केवळ वाहतूक खात्याच्या धडक कारवाईने अशा प्रकारचे अपघात थांबू शकणार नाहीत. त्यासाठी वाहनचालकांनीच स्वयंशिस्त पाळणे अत्यावश्यक असेल. वाहनचालकांमध्ये ही स्वयंशिस्त राबवण्यासाठी ‘मार्ग’ सारखी संस्था निष्ठेेने गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आली आहे. नुकताच त्यांनी हा रस्ता संस्कृतीचा विचार गोव्याबाहेर बेळगावात नेला. बेळगावातील मंडळींनी ‘मार्ग’ चे अधिवेशन भरवले आणि संस्थेचे उपक्रम तेथेही राबवायला सुरूवात केली आहे. गोव्यात मात्र अशा प्रयत्नांची जेवढ्या प्रमाणात दखल घेतली जायला हवी तेवढी घेतली जाताना दिसत नाही. वाहन चालवण्याचा परवाना मिळाला म्हणजे सर्व रस्ता आपल्याला आंदण मिळाला अशा थाटात वाहने हाकली जातात. अपघातांना त्यातूनच आमंत्रण मिळते. त्यात रस्त्यांवरील अतिक्रमणे, मनमानी उंचीचे गतिरोधक, त्यावरील गायब झालेले झेब्रा पट्टे, धोकादायक वळणे हे सगळे अशा अपघातांत भरच टाकत असते. गोव्याच्या रस्त्यांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने खरे तर अभ्यास होणे आवश्यक आहे. केवळ रस्ता रुंदीकरण हा रस्ते अपघात कमी करण्याचा उपाय नव्हे. जेवढा रस्ता रुंद तेवढी वाहनांची गतीही वाढत असते. त्यामुळे उलट ते अधिक धोकादायक ठरत असते. योग्य त्या लेनमधून वाहने चालवणे गोव्यात नावालाही दिसत नाही. या सर्वांची परिणती म्हणून असे भीषण अपघात घडतात. कोणाचा आधार हरवतो, कोणाच्या घरचा दिवा विझतो!