भिन्न विचारसरणी ः यशाचे गमक

0
233
–   प्रा. प्रदीप मसुरकर
(मुख्याध्यापक, जीएसएच नामोशी-गिरी)
सध्या कोरोनामुळे मुलं आपल्या घरी असतील. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांच्या विचारांना चालना द्या, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा व प्रश्‍न विचारा म्हणजे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून नवीन विचारांना चालना मिळेल व त्यात ती आपल्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनतील. 
प्रत्येक व्यक्ती ही काहीना काही विचार करीत असते. मनात अनेक विचारांचा घोळ असतो. त्यातील असे काही विचार आपले जीवन बदलून टाकतात. काही विचार आपल्या जीवनातील प्रश्‍न सोडवण्यासाठी मदत करतात. काही विचार निष्फळ व कुचकामी व आमच्या जीवनाची गती बदलण्याएवढी समस्या निर्माण करतात.
विचारात प्रचंड शक्ती (क्षमता) दडलेली असते. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकात हे विचारचक्र चालूच असते. काहींच्या विचारात ‘चेतक (स्टिम्युलस)’ पाहिल्यानंतर भर पडते. कोणतीही सभोवतालची वस्तू चेतक म्हणून कार्य करते. काहींच्या विचारात आपल्या मनामधील असलेल्या सुप्तातून म्हणजेच मनातील चेतकातून /स्टिम्युलसमधून उत्घृत होतात.
आपल्या मुलांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास त्यांचे विश्व निराळे असते. त्यांच्याही मनामध्ये वेगवेगळ्या ‘कल्पना’ येत असतात. कळत नकळत आपल्या कृतीतून ते साकारत असतात.
ः भिन्न विचारसरणी ः
सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी)चा मूळ पायाच विचार… ते पण ‘डायव्हर्जंट थिंकिंग’…‘भिन्न विचारसरणी’ असणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्ती इतर दुसर्‍या व्यक्तीपेक्षा भिन्न असते. अगदी जुळी मुलेसुद्धा एखादेवेळेस ती दिसायला सारखीच दिसतात पण बारकाईने पाहिल्यास त्यांच्या सवयी, विचार, आवड, बुद्धिमत्ता अशा बर्‍याचशा बाबतीत भिन्न असतात.
सध्या आम्हा पालकांची मुख्य जबाबदारी कर्तव्य आहे ते म्हणजे आमच्या मुलांमध्ये चांगले विचार, भिन्न विचारसरणी यांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना मदत करणे. बुद्धिमत्ता (इन्टेलिजन्स) ही अनुवंशिकता असून एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे येत असते. आईवडील हुशार असतील तर मुलेही हुशार होण्याची शक्यता दाट असते. उंची, रंग, केसांचा रंग, चेहरा.. इ. आणखी बर्‍याच गोष्टी अनुवंशिकतेतून येत असतात. त्याचप्रमाणे सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी) हीसुद्धा येत असते. ती विकसित होण्यासाठी योग्य वातावरणाची घरात गरज असते.
अनुवंशिकता  वातावरण = व्यक्तिमत्त्व तयार होत असते.
तर बरे विचार व त्यातून निर्माण होणारी कृती यास आईवडिलांनी मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले तर त्या मुलाची सृजनशीलता वाढण्यामध्ये मदत होते. कित्येक वैज्ञानिक, जसे आमच्या देशातील नोबेल पारितोषिक विजेते. डॉ. सी. व्ही. रमण -यांनी प्रकाशाचे विकिरीकरण होते हे देशाला दाखवून दिले- स्कॅटरींग ऑफ लाइफ.
१) आर्यभट्ट – गणित तज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ यांनी इ.स. ६२९ एडीमध्ये ‘०’ शून्याची कल्पना देशाला दिली.
२) डॉ. जगदीशचंद्र बोस – १८९५ मध्ये मार्कोनीच्या प्रात्यक्षिकाच्या अगोदर रेडिओ वापरून वायरलेस कम्युनिकेशन होऊ शकते याचे प्रात्यक्षिक दिले होते.
३) डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यावेळेस लाइट प्रकाश किरण पारदर्शक माध्यमातून (पदार्थातून) जात असताना आपली (व्हेव लेन्ग्थ) तरंग लांबी बदलतात, हे त्यांनी शोधून काढले.
४) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आमच्या देशाचे ११ वे राष्ट्रपती यांनी ४० वर्षे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटल ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) व ईस्रो – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये काम केले.
असे कितीतरी भारतीय सुपुत्र आहेत ज्यांनी आपल्या डायव्हर्जंट थिंकिंग (क्रिएटिव्हिटी) व त्यांच्या संशोधनांनी संपूर्ण जगाला नवीन प्रेरणा दिली. हे विचार हे प्रत्येक मुलामध्ये असतात. त्यांच्या आवडीप्रमाणे व नाविन्यपूर्ण कृतीमधून सृजनता दिसून येते.
ही विचारशैली कोणी खेळामधून… नाविन्यपूर्वक खेळून दाखवतात. उदा. सचीन तेंडूलकर – क्रीकेटमध्ये त्याने आपली छवी उमटवली.
काही साहित्यातून व काव्यातून – श्री रवींद्रनाथ टागोर हे बंगाली कवी. यांच्या ‘गीतांजली’ला नोबेल पारितोषिक मिळाले.
आता आमच्या मुलांमध्ये सुप्त गुण असतात व त्यांना विशिष्ट आवड असते ती पालकांनी बारकाईने निरीक्षण करून ओळखावी व त्याला योग्य ते प्रोत्साहन आणि वातावरण निर्मिती घरात केल्यास मुलांची सृजनता वाढवण्यास मदत होते.
उदा. मुलांच्या वयोमानानुसार त्यांना प्रश्‍न विचारून त्यांच्या विचारांना चालना देणे. समजा मूल पाचव्या वर्गात आहे व त्याला चित्रकला व विज्ञानाची आवड आहे. त्याला सहजपणे काही प्रश्‍न पुन्हा विचारावेत.
उदा. आम्ही छत्री या दिवसात वापरतो की नाही… त्याचे आणखी पाच उपयोग सांग पाहू. जर त्यांनी बरीचशी उदाहरणं दिली तर आम्ही त्याच्या पर्यायी विचारसरणीस वाव दिल्याप्रमाणे होईल.
१) छत्रीचा उपयोग पावसात व उन्हामध्ये देहरक्षण करण्यासाठी होतो.
२) छत्री ही हॉकी स्टिक म्हणून वापरता येईल.
३) वयोवृद्धांना आधार म्हणून काठीप्रमाणे होईल.
४) आपले शिक्षक शैक्षणिक साधन म्हणून वापरतात. (आम्हाला त्यांनी गणित शिकवले, प्लॅनेटोरीयमची तारे लावून दाखवून कल्पना दिली.) वगैरे.
उदा. घरात किंवा ऑफिसमध्ये असणार्‍या खुर्चीचे जास्तीत जास्त उपयोग…
१. काही मुले सांगतील फक्त बसण्यासाठी.
२. संगीत खुर्चीसाठी (खेळासाठी)
३. भींतीवर तक्ते लावण्यासाठी स्टूल म्हणून
४. व्यायामाचे प्रकार खुर्चीवर बसून शिकवण्यासाठी
५. विविध खेळ खेळण्यासाठी खुर्चीचा उपयोग होतो.
येथे चेतक (स्टिम्युलस) खुर्ची व तिचे उपयोग अनेक सांगता येतील.
उदा. रद्दी वर्तमानपत्राच्या कागदाचे उपयोग –
१. त्यातील काही विचार, चित्रं, शैक्षणिक साधनं म्हणून शिक्षक वापरू शकतात.
२. काचेचे आरसे किंवा काचा पुसण्यासाठी
३. सहलीमध्ये बसण्यासाठी वापरू शकतो.
४. वेगवेगळ्या पिशव्या बनवून प्लॅस्टिकऐवजी वापरू शकतो.
५. पाण्यात भिजवून लगदा करून त्याचे पुन्हा होम मेड कागद बनवू शकतो.
६. वेगवेगळ्या प्रतिकृती (सायन्स मॉडेल्स) करू शकतो. दिवाळीच्या दिवसात मुलं नरकासूर करतात.
असे बरेचसे उपयोग सांगता येतात पण हे मुलांना विचारून, त्यांच्या भिन्न विचारसरणीला उत्तेजन देणे गरजेचे आहे.
आमच्या मुलांमध्ये बरेचशे नवीन व काल्पनिक विचार येत असतात. ते आम्हाला काही वेळेस समजत नाही. आपण घरी कोणतेही काम करीत असताना मूलगा/मुलगी जर आपल्या बाजूला (बरोबर) असेल तर सहजपणे त्याला कल्पना द्या (त्या कामाची), तो मुलगा व मुलगी काहीतरी नाविन्यपूर्ण विचार सांगण्याची शक्यता असते व त्याच्याही विचारशक्तीस चालना मिळते. आमचा मुख्य उद्देश त्यांच्या काल्पनिक विचारांना गती देणे व काहीतरी नाविन्य व आवड शोधून काढणे, हा आहे.
असे खालील गंमतीदार प्रश्‍न विचारूनसुद्धा त्यांना मनोरंजित करू शकता…..
जसे – १. बंड्या तुमच्या शाळेला चाके लावलीत तर काय होईल?
उत्तर तो सांगेल- अरे व्वाऽऽ, आता कोरोना आलाय, तर डायरेक्ट शाळेलाच घराकडे आणता येईल.
– आम्हाला पिकनिकसाठी कोठेही जाता येईल(मोटार गाडी म्हणून)
त्यांच्याकडून आणखी काढून घ्या.
२) असा गमतीदार एक प्रश्‍न विचारा….
जर तुला पक्षासारखे पंख असतील तर तुम्ही काय कराल? काही अपेक्षित..
– काही मुले – गाडीची गरज भासणार नाही.
– मोठ्या वयोगटाची मुले – गाडीसाठी लागणार्या इंधनाचा खर्च वाचेल. पर्यावरणाचे रक्षण होईल.
– आम्ही इतर देश फिरून येऊ.
या प्रश्‍नाच्या उत्तरातून काही नाविन्यपूर्ण उत्तर मिळते का पहा.
आणखी असाही प्रश्‍न तुम्ही विचारू शकता….
जर तुम्हाला प्राण्याबरोबर बोलता आले व त्यांची भाषा तुम्हाला समजली तर तुम्ही काय कराल?
– अपेक्षित उत्तरे… १) आम्ही त्यांच्याशी मैत्री करू
२) आमची सुख-दुःखे त्यांच्याशी शेअर करू.
३)‘पोपट’ म्हणेल, मीपण तुमच्याबरोबर शाळेला येईन.
४) हत्ती म्हणेल, मी पण इलेक्शनला थांबलो, मला निवडून द्या.
अशी बरीच उत्तरे, प्रतिक्रिया आम्हाला मिळेल. यामध्ये वास्तवता असणार नाही. पण त्यांच्या विचारप्रक्रियेला एक चालना मिळेल.
 चित्रकलेमध्ये (त्रिकोण) हा चेतक (आकृती) घेऊन त्यांना ही आकृती वापरून नवीन आकृती काढायला सांगा.
काही मुलं – जोकरची टोपी –
काही मुलं – आईसक्रीमचा कोन –
काही – प्रिझम म्हणून वापरतील –
तर काही – मोठी सुंदरशी रांगोळी काढतील.
येथे (त्रिकोण) ही आकृती वापरून दुसर्‍या प्रतिकृतीची निर्मिती.
अशा बर्‍याचशा गोष्टी/वस्तू वापरून मुलांच्या भिन्न विचारसरणीस वाव देऊ शकतो.
घरातील कोणतीही वस्तु किंवा परिसरातील कोणतीही वस्तू दाखवून त्यांचे अनेक उपयोग, साम्य ओळखण्यास सांगणे, फरक सांगण्यास लावावे.
उदा. झाड व घर. यामधील साम्य व फरक सांगा असे विचारले तर ती मुले विचार करू लागतील.
साम्य ः घरापासून आश्रय मिळतो.
झाडापासूनही आश्रय मिळतो
ः घर व झाड दोघेही सावली देतात.
ः झाडांवर पक्षी राहतात
घरामध्ये माणसं राहतात.
ः घरातील माणसं श्‍वासोच्छ्वास करतात
त्याप्रमाणे झाडंसुद्धा श्‍वासोच्छ्वास करतात.
अशाचप्रकारे आपली मुलं फरकही सांगतील. येथे ‘घर’ व ‘झाड’ हे मुलांना चेतक म्हणून कार्य करते.
काही भाषेचे खेळ खेळा.
* एखादा शब्द घेऊन तो जास्तीत जास्त उपयोगात कसा आणता येईल?
* शब्दावरून किंवा हावभावावरून वस्तु ओळखणे, गाणे ओळखणे किंवा एखादी गोष्ट तयार करणे. अशा बर्‍याचशा गोष्टी पालक मुलांबरोबर सुसंवाद साधून त्यांच्या भिन्न विचारक्षमतेस वाव देऊ शकतात.
सध्या कोरोनामुळे मुलं आपल्या घरी असतील. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांच्या विचारांना चालना द्या, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा व प्रश्‍न विचारा म्हणजे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून नवीन विचारांना चालना मिळेल व त्यात ती आपल्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनतील. यातूनच काही थोर वैज्ञानिक बनतील, चांगले नागरिक बनतील. त्यांच्यातील नैराश्य नाहीसे होईल व प्रत्येक गोष्ट/घटना/वस्तुंकडे अनेक पर्यायांनी पाहतील. यामध्येच मोठे यश दडलेले आहे.