भिकू पै आंगले ः एक कृतार्थ प्रवास

0
152
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

प्राचार्य भिकू पै आंगले यांचे काल पहाटे ९४ व्या वर्षी निधन झाले. दीर्घायुषी माणसे अनेक असतात, पण आपले जीवन सदैव समाजसन्मुख राहून अर्थपूर्णरीत्या जगणारी माणसे दुर्मीळ असतात. अशा असामान्य व्यक्तिमत्त्वांपैकी भिकुबाब होते. त्यांच्या जाण्याने गोव्याच्या सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झालेली आहे. गोमंतकाच्या मराठी परंपरेचा सार्थ अभिमान त्यांना होता. त्याला त्यांनी डोळस अभ्यासाची व परिशीलनाची जोड दिली होती. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे हे मानणार्‍यांपैकी ते होते. अध्यापन हे त्यांच्या अत्यंत आवडीचे क्षेत्र होते. मराठी नाटक आणि रंगभूमी हा त्यांचा बहिश्चर प्राण होता. वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमीच्या प्रेमाखातर त्यांनी तोंडाला रंग लावला तो नव्वदीपर्यंत टिकवून ठेवला. याला म्हणतात निस्सीम निष्ठा!

त्यांचे साहित्यव्यवहाराविषयीचे आकलन सूक्ष्म होते. या बाबतीतही ‘आमच्या काळातील सर्व काही आदर्श होते’ असा सूर त्यांनी कधी लावला नाही. नव्या प्रवाहांचे आणि प्रवृत्तींचे स्वागत करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळे त्यांचे समकालीन त्यांच्याभोवती गोळा होत, त्याचप्रमाणे तरुणांचा वर्गही ममत्वाने त्यांच्याकडे आकृष्ट होई. सगळीकडून ‘भिकुबाब’ ही प्रेमळ हाक ऐकू येई. सार्वजनिक ठिकाणी माणसांचा कितीही जमाव असो, त्यांच्या आवडत्या गडद निळ्या सुटात आणि ‘मरुन’ रंगाच्या टायमध्ये ते हसतमुखाने वावरायचे. अशावेळी केंद्रबिंदू ‘भिकुबाब’च असायचे.

त्यांच्याकडे वृत्तिगांभीर्य होते, करडी शिस्त होती, स्पष्टवक्तेपणा होता, पण त्याचबरोबर प्रेमळ वृत्ती होती. बोलणे नर्मविनोदी होते, त्यामुळे व्यासपीठ गाजवणे किंवा अनौपचारिक गप्पागोष्टींत लोकांची मने जिंकून घेणे त्यांना सहजतेने शक्य होई. केवळ अध्यापन आणि रंगभूमीविषयक कार्य नव्हे, जीवनाच्या विविध क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्वाने तेजस्वी मुद्रा उमटवणारी असामान्य बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. हाती घेतलेले कार्य परिपूर्णतेने पार पाडायचे हा त्यांचा परिपाठ होता. त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या आवडत्या टेबलावर कागदपत्रांची चळत असली तरी त्यात व्यवस्थितपणा असायचा. काळाच्या मुशीतून त्यांच्यामधील अभ्यासक घडला. कुशल शिक्षक घडला. शिक्षणक्षेत्रातील नामवंत प्रशासक म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. बालपणी झालेल्या संस्कारांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून रंगभूमीचा निस्सीम उपासक घडला. नाशिकजवळच्या ओझर या गावी आपल्या कल्पक नेतृत्वातून त्यांनी ओसाड, खडकाळ भूमीत आदर्श शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यांचे त्यावेळचे विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रांत चमकू लागले. आश्चर्याची आणि नमूद करण्यासारखी बाब म्हणजे अर्धशतकापूर्वीच्या तेथील एस. एस. सी. बॅचमधील विद्यार्थ्यांनी बेताळभाटी येथे त्यांच्या ९३ व्या वाढदिवशी त्यांचा गौरव केला. सच्च्या गुरूला याहून कोणती मौलिक गुरुदक्षिणा हवी?

त्यांच्या कोशात ‘गुरू’ ह्या संज्ञेला अनन्यसाधारण महत्त्व होेते. आयुष्याच्या भ्रमंतीत त्यांना अनेक गुरू भेटले. त्यांना ते विसरलेले नाहीत. हे सारे त्यांच्या अंगच्या कृतज्ञताबुद्धीतून आलेले आहे. त्यांचा जन्म बोरीला आजोळी झाला. बालपणातला अल्प काळ मडगावमध्ये गेला, पण खर्‍या अर्थाने नेरूलला आत्याकडे आनंदमय वातावरणात त्यांचे बालपण गेले. शिक्षणाविषयी विलक्षण आस्था असलेले शिक्षक भेटले. आत्याच्या सहवासात श्रमसंस्कार झाले. भाजीपाला वाढवण्यात देखील त्यांना रस वाटू लागला. भजन – कीर्तन ऐकून कान तयार झाले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकळत्या वयात देखील नाटकाची संथा मिळाली. वाया गेलेल्या पोरांनी नाटकाकडे वळावे असा समज असलेल्या समाजात वडिलांकडून प्रोत्साहन मिळाले. त्यांनी पणजीला जाऊन माळ आणावी.

‘‘राजासारखा वाग, राजासारखं काम कर. रुद्राक्षांची माळ अशा वेळी काय कामाची?’’ असे म्हणावे. केवढी प्रोत्साहक बाब होती ती. इथे वडीलच त्यांचे गुरू झाले होते. गोपाळकृष्ण भोब्यांसारखा रसज्ञ, कलाभिरुची असलेला मित्र भेटला. त्या मंतरलेल्या दिवसांत चांगल्या विचारांची, भावभावनांची आणि रसिकत्वाची देवाणघेवाण झाली. आयुष्यात प्रतिकूलता चोरपावलांनी येते तसेच शुभयोगही येतात. कमी – जास्त प्रमाणात भिकुबाब आंगले यांना दोन्ही प्रकारच्या अनुभवांतून जावे लागले. वडिलांच्या गोवा – मुंबई येथील सतत भ्रमंतीत त्यांना आसरा असा मिळायचा नाही. पण भिकुबाबांचे पुढील शिक्षणासाठी झालेले प्रयाण म्हणजे आयुष्यात लाभलेले वरदानच म्हणायला हवे. त्यांनी लिहिलेल्या ‘स्पर्श होता परिसाचा’ या शैक्षणिक संस्मरणात्मक पुस्तकातून व ‘वळुनि बघता मागे’ या नाट्यविषयक आत्मकथनातून आपल्या जीवनप्रवासातील अनेक वळणे आणि वाकणे अतिशय प्रांजळपणे आणि पारदर्शी शैलीत रंगवली आहेत. मुंबईतील राममोहन स्कूलमध्ये गुरुवर्य ग. ल. चंदावरकर यांनी केलेले संस्कार भिकुबाब पै आंगले विसरू शकले नाहीत. आपल्या कुमारवयीन जडणघडणीचे, झालेल्या सुसंस्कारांचे सारे श्रेय त्यांनी गुरुवर्यांना देऊन टाकलेले आहे. ‘उपासनेसी दृढ चालवावे’ हे प्रार्थना समाजाचे ब्रीद. गुरुवर्य ग. ल. चंदावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वात ते तंतोतंत उतरलेले. देणारे खूप देतात, घेणारेही तेवढेच पात्र असावे लागतात. चंदावरकरांची प्रेमळ पाखर त्यांना लाभली. ते त्यांच्या गळ्यातील ताईत बनले. व्यं. ना. नाईक या कुशल शिक्षकाचे ऋण हे तेवढेच महत्त्वाचे असे भिकुबाब यांना वाटे. अध्यापनाचे पहिले धडे भिकुबाबनी गुरुवर्य ग. ल. चंदावरकर यांच्या छत्रछायेखाली गिरविले.

ते भारताच्या पारतंत्र्यातील दिवस होते. राष्ट्रीय संग्रामपर्वाच्या काळात वातावरणात अस्थिरता होती, पण सुदैवाची बाब अशी की, उदारमतवादी विचारांची दीर्घ परंपरा असलेल्या विल्सन कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. अनेक विषयांचे निष्णात प्राध्यापक त्यांना मिळाले. त्यात मराठीचे नामवंत प्राध्यापक आणि व्यासंगी समीक्षक वा. ल. कुलकर्णी होते. मराठीच्या व्यासंगाबरोबरच त्यांनी इंग्रजी वाङ्‌मयाचे सूक्ष्मतेने परिशीलन केले होते. त्यांच्या समर्थ मार्गदर्शनामुळे भिकू पै आंगले यांनी मराठीबरोबरच इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवले. विश्वसाहित्यातील उत्तमोत्तम साहित्यकृतींचे वाचन त्यांनी या काळात केले. पाश्‍चात्त्य नाटककार वाचले. त्यामुळे नाटक आणि रंगभूमीविषयक त्यांची समज वाढली. रंगकर्मी म्हणून वावरताना त्यांनी पुढे अभिनयापुरते आपले कार्यक्षेत्र सीमित ठेवले नाही. दिग्दर्शक म्हणूनही ते यशस्वी झाले ते यामुळेच. वाङ्‌मयीन क्षेत्रात जे काही थोडे फार करता आले, ते केवळ प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळेच. त्यांचे हस्ताक्षरही देखणे होते. त्याचादेखील आपल्यावर परिणाम झाला असे त्यांनी मला सांगितले होते. पाच कवी या पुस्तकाला असलेली प्रा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांची विवेचक प्रस्तावना त्यांना आवडायची. अध्ययनकाळात मंगेश पाडगावकर त्यांना सहाध्यायी म्हणून भेटले. मुंबईच्या वास्तव्यात पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या सव्यसाची साहित्यिकाचा सहवास लाभला.

गोखले एज्युकेशन इन्स्टिट्यूटने सुरू केलेली ओझर येथील शिक्षणसंस्था नावारूपाला आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भिकुबाब पै आंगले यांच्याकडून घडले. त्यांच्या कल्पकतेला येथे नवीन धुमारे फुटले. ध्येयवादी वृत्तीला नवीन कार्यक्षेत्र लाभले. आपल्यासारख्या निष्ठावंत शिक्षकांची मांदियाळी त्यांनी निर्माण केली. त्यांच्यावर जरब न बसवता प्रेमरज्जूंनी बांधून ठेवले. ‘स्पर्श होता परिसाचा’ या त्यांच्या संस्मरणात्मक पुस्तकात त्यांच्या स्मृतितरंगांचे विलोभनीय दर्शन घडते. प्रत्येक विद्यार्थ्याची जन्मतारीख ते टिपून ठेवत. त्यांच्या वाढदिनी शुभेच्छापत्र व गुलाबपुष्प देत. साधी पण किती मोलाची गोष्ट ही. अशा गुरूला विद्यार्थी कसे विसरतील? उपक्रमशीलता हा तर आंगले सरांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा गुण होता. ‘हंसिनी’ नावाचे शाळेचे नियतकालिक ते प्रसिद्ध करायचे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सृजनात्मकतेला प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्या अध्यापनक्षेत्रातील कर्तृत्वामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कारही लाभला.

साहित्यातील आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे अनेक थोरामोठ्यांशी त्यांचा परिचय झाला. नाशिकमधील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि प्रथितयश नाटककार वसंतराव कानेटकर ही रसतीर्थे त्यांच्या नित्य सहवासातील झाली. नाट्यक्षेत्रातील मा. दत्ताराम तर त्यांना पित्यासमान वाटायचे.

गेल्या ३५ वर्षांचा त्यांचा माझा सहवास. कोणत्या आठवणी सांगायच्या? कोणत्या गाळायच्या? आजची वेळच निराळी आहे. बहुशाखांनी आसमंतात पसरलेला आणि ज्याच्या पारंब्यांचा विस्तार झालेला आहे असा हा विराट वटवृक्ष आज एकाएकी उन्मळून पडलेला आहे…