भाविकादेवी भजनी मंडळ प्रथम

0
307

>> कला अकादमी राज्य महिला भजन स्पर्धा

कला अकादमी गोवा आयोजित भजन सम्राट मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती राज्यस्तरीय महिला गटाच्या स्पधेंत भाविकादेवी महिला भजनी मंडळ, दिवाडी पथकाने पस्तीस हजार रुपयांचे रोख प्रथम पारितोषिक व स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती चषक पटकाविला.
तीस हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक देवगी पुरुष महिला भजनी मंडळ, पाटणे-कोळंब पथकाला तर पंचवीस हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक स्वरगंध संगीत संस्कृती संस्था, डिचोली या पथकाला प्राप्त झाले. श्री सातेरी महिला भजनी मंडळ, बोंडुमळ-मोले या पथकाला वीस हार रुपयाचे चौथे पारितोषिक देण्यात आले. तर प्रत्येकी दहा हजार रुपयाची उत्तेजनार्थ पारितोषिके अमरावती महिला भजनी मंडळ, आमोणा व श्री कुळाची माया तेजोमय महिला भजनी मंडळ, केरी-सत्तरी यांना प्राप्त झाली. स्पर्धेतील प्रत्येकी दोन हजार रुपयांची वैयक्तिक कलागुणांसाठीची पारितोषिके, उत्कृष्ट गायिका प्रज्ञा प्रकाश रावळ (भाविकादेवी महिला भजनी मंडळ, दिवाडी), उत्कृष्ट पखवाजसाथी- निशा गाड (श्री भुमिका महादेव कर्वेश्‍वर महिला मंडळ, साळ), उत्कृष्ट संवादिनी साथी- स्नेहल गोपाळ गावडे (शिवप्रसाद सातेरी महिला भजनी मंडळ, तुये), उत्कृष्ट गवळण गायन-हर्षा गणपुले (सातेरी महिला भजनी मंडळ, बोंडुमळ) यांनी पटकाविली.
विजेत्यांना प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ गायिका श्रृती सडोलीकर यांच्या हस्ते मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात स्पर्धेनंतर समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर परीक्षक मधुसुदन थळी, रघुनाथ पेडणेकर, सुमेधा देसाई तसेच कला अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर उपस्थित होते. या मान्यवरांहस्ते आधी विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
सडोलीकर यांनी शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत ही आपल्या संस्कृतीची अंगे असून त्यातून मिळणार्‍या संस्काराची जपणूक केली पाहिजे व हे संस्काराचे धन पुढच्या पिढीकडे पोचवायला हवे असे सांगितले. प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत केले. कार्यक्रम विकास अधिकारी संजीव झर्मेकर यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम आणि विकास अधिकारी डॉ. दत्तगुरु आमोणकर यानी ऋणनिर्देश केला.