भारत ८ गड्यांनी विजयी

0
121

>> रोहित शर्माच्या ४३ चेंडूंत ८५ धावा

रोहित शर्’ाच्या ४३ चेंडूंत तुफानी ८५ धावांच्या कप्तानी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात बांगलादेशचा ८ गडी व २६ चेंडू राखून फडशा पाडत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने १५.४ षटकांत केवळ २ गडी गमावून गाठले. पावसाच्या शक्यता लक्षात घेऊन भारताने गोलंदाजी स्वीकारली. लिटन दास व मोहम्मद नईम या नवीन सलामी जोडीने बांगलादेशला ७.२ षटकांत ६० धावांची खणखणीत सलामी दिली. या दोघांव्यतिरिक्त तिसर्‍या स्थानावर आलेल्या सौम्य सरकारने तसेच कर्णधार महमुदुल्लाने उपयुक्त योगदान दिले. परंतु, पहिल्या दहा षटकांत १ बाद ७८ अशा भक्कम स्थितीनंतरही त्यांना १७५च्या आसपास जाता आले नाही. शेवटच्या दहा षटकांत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना हात मोकळे करण्याची क्वचितच संधी दिली. शेवटच्या दहा षटकांत ७५ धावांत त्यांनी ५ गडी गमावले.

भारताकडून युजवेंद्र चहल सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत २८ धावांत २ गडी बाद केले. सुंदर व दीपक यांनी प्रत्येकी २५ धावा मोजून १ गडी बाद केला. खलीलने एका गड्यासाठी ४४ धावा दिल्या. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा बांगलादेशी गोलंदाजांवर तुटून पडला. पहिल्या सामन्यातील अपयश धुवून काढताना त्याने ६ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी करत शिखर धवनसह ११८ धावांची सलामी दिली. शिखरने दुय्यम भूमिका घेत २७ चेंडूंत ३१ धावा केल्या. रोहित व शिखरचा बळी लेगस्पिनर अमिनूल इस्लाम याने मिळविला. अय्यर २४ व राहुल ८ धावांवर नाबाद राहिला.