भारत-श्रीलंका पहिली कसोटी आजपासून

0
134

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेस आजपासून प्रारंभ होत आहे. सुमारे अडीज महिन्यानंतर टीम इंडिया पुन्हवा एकदा श्रीलंकेला कसोटी मालिकेत धूळ चारण्यासाठी सज्ज आहे.
गत जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या तीन कसोटींच्या मालिकेत श्रीलंकेचा त्यांच्याच भूमीवर भारताने ३-० व्हाईटवॉश केला होता. आता युवा आक्रमक कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ज्याची सुरुवात आजपासून ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार्‍या पहिल्या कसोटीने होणार आहे.

भारतीय संघाची गेल्या काही कसोटी मालिकांत शानदार कामगिरी राहिलेली आहे. त्यातच त्यांनी जुलै-ऑगस्टमधील दौर्‍यात श्रीलंकेला तीनही प्रकारात नमविले आहे. तर श्रीलंकेला भारताकडूनच्या मानहानीकारक पराभानंतर पाकिस्तानविरुद्धही वन-डे आणि टी -२० मालिकांत पराभव स्वीकारावा लागलेला आहे. त्यामुळे विद्यमान फॉर्म पाहता टीम इंडियाचे पारडेच जास्त जड असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे श्रीलंकन संघ भारताता आतापर्यंत १७ कसोटी सामने खेळलेला आहे. परंतु त्यांना एकाही सामन्यात विजय मिळविता आलेला नाही.

भारताकडे खुद्द कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहोणे, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, वृद्धिमान साहा यांच्यासारखे शानदार फलंदाज आहेत. तर तळाला रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजासारखे फलंदाज महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. तर पाहुण्या संघाने सराव सामन्यात चांगली कामगिरी केलेली आहे. दिमुन करुणारत्ने, कुशल सिल्वा, सदिरा सरमाविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज यांना सूर गवसल्यास भारतासाठी ते डोकेदुखी ठरू शकतील.

गोलंदाजीचा विचार केल्यास भुवनेश्वर, उमेश यादव आणि मोहम्मद शमी त्रिकुट हे भारताच्या द्रुतगतीची जबाबदारी सांभाळतील. तर अश्विन आणि जडेजा हे विश्वस्तरीय फिरकीपटू आपल्या उपयुक्त योगदानासाठी तयार असतील. कुलदीप यादवलाही अंतिम अकरात संधी मिळू शकते.
संभाव्य संघ पुढील प्रमाणे ः भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि ईशांत शर्मा.
श्रीलंका : दिनेश चंदिमल (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, सदिरा समराविक्रम, लाहिरू थिरिमाने, निरोशन डिकवेल (यष्टिरक्षक), दिलरुवान परेरा, रंगना हेराथ, सुरंगा लकमल, लाहिरू गमागे, धनंजय डिसिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, लक्षण संदकना, विश्वा फर्नांडो, दसुन शनाका आणि रोशन सिल्वा.

 

मी रोबोट नाही आहे, पाहिजे असेल तर कापून बघा, माझ्यातूनही रक्त निघले आणि मलाही विश्रांतीची गरज असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा युवा कर्णधार विराट कोहलीने कसोटी सामनापूर्व घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार्‍या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली बोलत होता.

जेव्हा मला आवश्यकता वाटेल तेव्हा मी विश्रांती घेईन. हार्दिक पांड्याला विश्रांती दिली गेल्याचा मुद्दा सहजपणे हाताळताना कोहली म्हणाला की, हार्दिक बराच जास्त क्रिकेट खेळत होता आणि त्याच्यावर बराच जास्त भार पडत होता. प्रत्येक खेळाडू तंदुरुस्त राहणे अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे त्यांना विश्रांती मिळणे महत्त्वाचे आहे, असे कोहलीने सांगितले. यंदाच्या हंगामात मी देखील अविरतपणे क्रिकेट खेळत आलोय, त्यामुळे मलाही विश्रांतीची गरज असल्याचं विराट कोहली म्हणाला. माझा माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कठीण परिस्थितीत खेळू इच्छितो आणि खेळण्यासाठी तयार आहोत. हीच सर्वांत महत्त्वपूर्ण बाब आहे, असे कोहली म्हणाला.