भारत-वेस्ट इंडीज निर्णायक टी-२० आज

0
106

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील निर्णायक टी-२० लढत आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहेत.

दोन्ही संघांकडे तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी आहे. पहिल्या दोन लढतींपैकी प्रत्येकी एक जिंकत दोन्ही संघ मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद विस्फोटक खेळीमुळे भारताने हैदराबादेतील पहिली लढत जिंकली होती. तर तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या दुसर्‍या लढतीत लेंडल सिमेन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे विंडीजने माजी मारत मालिकेत बरोबरी साधत आले आव्हान जिवंत राखण्यात यश मिळविले होते.

भारताच्या दुसर्‍या लढतीतील पराभवाचे मुख्य कारण ठरले होते ते सुमार क्षेत्ररक्षण. या सामन्याच्या पाचव्या षट्‌कांत वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत यांनी झेल सोडले होते. त्याचा जोरदार फटका संघाला बसला. लेंडल सिमेन्सचा वॉशिंग्टन सुंदरने सोडलेला झेल तर बराच महागडा ठरला. सिमेन्सने नाबाद अर्धशतकी खेळी करीत विंडीजला मालिकेत बरोबरी साधून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे आज होणार्‍या निर्णायक लढतीत अशा तर्‍हेचे सुमार क्षेत्ररक्षण भारतीय संघासाठी धोक्याचे ठरू शकते. भारताचे भविष्य असलेल्या युवा खेळाडूंकडून तर सर्वांना सरस क्षेत्ररक्षणाची अपेक्षा असेल. गोलंदाजीही संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यांना प्रभावी मारा करण्यात अपयश येत आहे. मालिकेतील पहिल्या लढतीत विंडीजने दोनशेचा पल्ला पार केला होता. तर दुसर्‍या लढतीत विंडीच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर हल्ला केला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात गोलंदाजीत काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला या सामन्यात संधी मिळू शकते. जास्त करून दीपक चहरच्या जागी त्याची अंतिम अकरात वर्णी लागू शकते. भुवनेश्वर कुमारही तेवढा प्रभावी ठरलेला नाही आहे. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला दोन्ही सामन्यात अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी मिळालेली आहे. परंतु तिसर्‍या व निर्णायक लढतीत कुलदीप यादवचा वापर कोहली करू शकतो. कुलदीप आणि युजवेंद्र चहलची जोडी गेल्या दोन वर्षांत बरीच यशस्व ठरलेली आहे. ते दोघे बळी मिळविण्या बरोबरच प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यास सक्षम आहेत.

फलंदाजीत रोहित शर्माला अजून सूर गवसलेला नाही आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. लोकेश आणि कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा आपली लय कायम राखण्याच्या इराद्यानेच खेळपट्टीवर उतरतील. युवा डावखुरा फलंदाज शिवम दुबेला गेल्या सामन्यात तिसर्‍या स्थानी बढती देण्यात आली होती आणि त्याचे सोने करताना त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्याला पुन्हा एकदा कोहली तिसर्‍या स्थानी संधी देऊ शकतो.

ऋषभ पंतने गेल्या सामन्यात काहीशी आश्‍वासक फलंदाजी केली होती. परंतु पुन्हा एकदा तो चुकीचा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. श्रेयस अय्यर अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर या सामन्यात चांगली करण्याचे आव्हान असेल.
दरम्यान, विंडीजसाठीही ही लढत महत्त्वपूर्ण असेल. त्यांनी गेल्या सामन्यात भारतीय संघावर मात करीत सलग सात सामन्यांनंतर पहिला विजय मिळविला आहे. त्यामुळे ही संख्या वाढविण्यासाठी त्यांचा निश्‍चित प्रयत्न असेल. परंतु कर्णधार पोलार्डपुढे चिंतेची बाब असेल ती लुटलेल्या अवांतर धावांची. दोन्ही लढतीत संघाने बर्‍याच अवांतर धावा दिलेल्या आहेत. फलंदाजीत लेंडल सिमन्स, एव्हिन लेविसकडून पुन्हा एकदा दमदार सलामीची अपेक्षा असेल. शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन आणि स्वतः कर्णधार पोलार्डकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. यांच्या बॅटा तळपल्या तर ते भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यांचे गोलंदाज चांगला मारा करीत आहेत. त्यामुळे ते भारताला कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करतील.