भारत पहिल्याच दिवशी भक्कम स्थितीत

0
135

>> पुजारा, रहाणेची नाबाद शतके

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार नाबाद शतकांसह चौथ्या विकेटसाठी केलेल्या २११ धावांच्या अविभक्त भागिदारीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ गड्यांच्या मोबदल्यात ३४४ अशी धावसंख्या उभारत आपली बाजू भक्कम केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे दमदार शतकांसह नाबाद खेळत होते. तीन कसोटीच्या या मालिकेत भारताने पहिली कसोटी जिंकत १-० अशी आघाडी मिळविलेली आहे.
नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिनव मुकंदच्या जागी संघात परतलेल्या लोकेश राहुल आणि डावखुरा फलंदाज शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी केली. दिलरुवान परेराने धवनला पायचीतच्या जाळ्यात अडकवित लंकेला पहिले यश मिळवून दिले. गॉल कसोटीत १९० धावांची विस्फोटक खेळी केलेला धवन ३५ धावा जोडून तंबूत परतला. त्यानंतर लोकेश राहुलने चेतेश्वर पुजाराच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. लंचनंतर लगेच एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सलामीवीर लोकेश राहुल अर्धशतक झळकावून धावचित होऊन परतला. बाद होण्यापूर्वी लोकेशने ८२ चेंडूत ७ चौकारांच्या सहाय्याने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. सलग सहा सामन्यांमध्ये लोकेश राहुलची अर्धशतकी खेळी ठरली. याआधी राहुल द्रविड आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावे असा विक्रम आहे. कर्णधार विराट कोहली (१३) जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावला नाही. रंगना हेरथचा एक चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात तो स्लिममध्ये अँजेलो मॅथ्यूजकडे झेल देऊन बाद झाला.
३ बाद १३३ अशा स्थितीनंतर पुजाराने अजिंक्य रहाणेच्या साथीत संघाचा डाव सावरताना चौफेर फटकेबाजी करीत चौथ्या विकेटसाठी २११ धावांची अविभक्त भागिदारी केली. दोघांनीही श्रीलंकन गोलंदाजांना आणखी संधी न देता दमदार अर्धशतके नोंदविली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा १० चौकार व १ षट्‌कारानिशी २२५ चेंडूत १२८ धावांवर तर रहाणे १२ चौकारांच्या सहाय्याने १६८ चेंडूत १०३ धावांवर नाबाद खेळत होते. लंकेतर्फे दिलरुवान परेरा व रंगना हेराथ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक,
भारत, पहिला डाव ः शिखर धवन पायचीत दिलरुवान परेरा ३५, लोकेश राहुल धावचीत दिनेश चांदिमल ५७, चेतेश्वर पुजारा नाबाद १२८, विराट कोहली झेल अँजेलो मॅथ्युज गो. रंगना हेराथ १३, अजिंक्य रहाणे नाबाद १०३.
अवांतर ः ८. एकूण ९० षट्‌कांत ३ बाद ३४४ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १/५६ (शिखर धवन, १०.१), २/१०९ (लोकेश राहुल, ३०.४), ३/१३३ (विराट कोहली, ३८.५)
गोलंदाजी ः नुवान प्रदीप १७.४/२/६३/०, रंगना हेराथ २४/३/८३/१, दिमुथ करुणारत्ने ३/०/१०/०, दिलरुवान परेरा १८/२/६८/१, मलिंदा पुष्पकुमारा १९.२/०/८२/०, धनंजया डिसिल्वा ८/०/३१/०.

पुजारासाठी त्रिवेणी संगम
१२८ धावांची नाबाद शतकी खेळी केलेल्या चेतेश्वर पुजारासाठी दुसर्‍या कसोटीचा कालचा पहिला दिवस त्रिवेणी संगम ठरला. पुजारा ही आपली ५०वी कसोटी खेळत आहे आणि त्याने नाबाद शतकी खेळी साकरली. त्यातच त्याची काल अर्जुन पुरस्कारसाठी निवड झाली आहे.
त्याच बरोबरत तो दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला मागे टाकत २०१७ या वर्षात कसोटीत सर्वाधीक धावा करणारा फलंदाज बनला आहे. पहिल्या दिवशी शतकी खेळी साकारत भारतासाठी सर्वात जलद ४ हजार धावा काढणारा तो संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला. त्याबरोबर श्रीलंकेत सलग ३ कसोटींमध्ये ३ शतक करण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदविला.