भारत-न्यूझीलंड लढत स्थगित

0
87

>> पावसाचा व्यत्यय; उर्वरित सामना आज खेळविला जाणार

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी थांबवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला त्यावेळी न्यूझीलंडने ४६.१ षटकांत ५ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली होती. आयसीसीच्या नियमानुसार आज बुधवारी उर्वरित सामना खेळविला जाणार आहे.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. भारत व न्यूझीलंड यांनी या सामन्यासाठी प्रत्येकी एक बदल केला. भारताने कुलदीप यादवला बाहेर बसवून युजवेंद्र चहलच्या लेगस्पिनला पसंती दिली तर न्यूझीलंडने टिम साऊथीला बाहेर बसवून लॉकी फर्ग्युसनचा समावेश केला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर भारताने गप्टिलविरुद्ध पायचीतचे जोरदार अपील केले. पंचांनी अपील फेटाळल्यानंतर भारताने रिव्ह्यूचा वापर केला. परंतु, चेंडू यष्ट्यांचा वेध घेत नसल्याचे ‘बॉल ट्रॅकर’ मध्ये दिसल्याने भारताला रिव्ह्यू गमवावा लागला. गप्टिलला याचा लाभ घेता आला नाही. बुमराहने वैयक्तिक एका धावेवर त्याला बाद केले. निकोल्स व विल्यमसन (६७) यांनी खेळपट्टीशी जुळवून घेताना एकेरी-दुहेरी धावांवर भर देत अनेक निर्धाव चेंडू खेळले. जडेजाने निकोल्सचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली.

टेलरने यानंतर खेळपट्टीवर नांगर टाकला. विल्यमसनने या दरम्यान आपले ३९वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर विल्यमसनने काही आक्रमक फटके खेळले परंतु, चहलच्या एका वळलेल्या चेंडूवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात सोपा झेल देऊन तो बाद झाला. रॉस टेलर (नाबाद ६७) याने यानंतर चहलवर हल्ला करताना वेगाने धावा जमवल्या. भारताने दुसर्‍या टोकाने गडी बाद करत न्यूझीलंडवरील दबाव कायम ठेवला.