भारत-न्यूझीलंड उपांत्य लढत आज

0
112

भारत व न्यूझीलंड यांच्यात आज मंगळवारी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळविला जाणार आहे. साखळी फेरीत पावसामुळे या संघांत सामना झाला नव्हता. त्यामुळे या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या विश्‍वचषकात प्रथमच लढत होणार आहे. साखळीत भारताने अव्वल राहून तर न्यूझीलंडने चौथ्या स्थानासह उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. परंतु, या इतिहासाला बाद फेरीत फारसे महत्त्व उरलेले नाही. इंग्लंडविरुद्धचा धक्का वगळता भारताने या विश्‍वचषकात ‘उतार’ पाहिलेला नाही. दुसरीकडे न्यूझीलंडने स्पर्धेला दमदार सुरुवात केल्यानंतर शेवटच्या काही सामन्यांत अडखळती कामगिरी केलेली आहे.

न्यूझीलंड संघाचा विचार केल्यास त्यांना सलामीवीरांनी अपेक्षित सुरूवात करून दिलेली नाही. मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, कॉलिन मन्रो यांनी निराश केल्याने न्यूझीलंडला केन विल्यमसनवर अधिक विसंबून रहावे लागले आहे. दुसरीकडे भारताला रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल यांनी बहुतांशी लढतीत भक्कम सलामी दिल्याने विराटचे काम तुलनेने सोपे झाले आहे. मधल्या फळीची समस्या दोन्ही संघांना आहे. रॉस टेलर, टॉम लेथम यांनी अपेक्षापूर्ती करता आलेली नाही. अष्टपैलू जिमी नीशम व कॉलिन डी ग्रँडहोम यांनी साखळी लढतींतील काही लढतींत संघाला उभारी देण्याचे काम केले आहे. याच कामगिरीची पुनरावृत्ती त्यांच्याकडून आज अपेक्षित असेल. भारताने हार्दिक पंड्याला चौथ्या स्थानावर बढती देण्याचा प्रयोग काही लढतींत केला. परंतु, काही अपवांद वगळता हा प्रयोग फारसा लाभदायी ठरू शकला नाही. महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर (जायबंदी), ऋषभ पंत, दिनेश कार्तिक यांनी आघाडीफळीला निराश करण्याचे काम केले आहे. धोनीची ‘स्ट्राईक रोटेट’ करण्याची कमी झालेली क्षमता, पंतचा आततायीपणा, शंकरचा अननुभवीपणा भारतासाठी मारक ठरला आहे. फलंदाजी विभागात नसलेली खोलीदेखील भारताला उपांत्य फेरीत कोंडीत पकडू शकते. भुवनेश्‍वर, कुलदीप, चहल, शमी, बुमराह यांचा न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर फलंदाजीत निभाव लागणे कठीणच आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या मधल्या फळीची कामगिरी आज निर्णायक ठरू शकते. आघाडीफळीत फलंदाजी करून किमान चारपाच षटके गोलंदाजी करणारा खेळाडूदेखील भारताकडे नाही. न्यूझीलंडला केन विल्यमसनच्या रुपात किमान दोन-चार षटके बदल म्हणून टाकणारा गोलंदाज तरी लाभला आहे. त्यामुळे भारताला पाच स्पेशलिस्ट गोलंदाज खेळविण्याच्या रणनीतीवर पुनर्विचार करावा लागणार आहे. त्यामुळे दिनेश कार्तिकऐवजी केदार जाधव किंवा तिसरा फिरकीपटू व उपयुक्त फलंदाज म्हणून रवींद्र जडेजाला खेळविणे सोयीचे ठरू शकते. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह भारतासाठी ‘एक्स’ फॅक्टर ठरू शकतो. खेळपट्टीकडून मदत मिळाल्यास भारताचा भुवनेश्‍वर कुमार व न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट यांना खेळणे कठीण होणार आहे.
भारत संभाव्य ः लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड संभाव्य ः मार्टिन गप्टिल, कॉलिन मन्रो, केन विल्यमसन, रॉस टेलर, जिमी नीशम, टॉम लेथम, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सेंटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन व ट्रेंट बोल्ट.

इतिहास न्यूझीलंडच्या बाजूने
विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासाकडे नजर टाकली असता आतापर्यंत दोन्ही संघ ७ वेळा भिडले असून यात न्यूझीलंडने ४ वेळा, तर भारताने ३ वेळा विजय मिळवला आहे. उभय संघातील अखेरचा विश्‍वचषक सामना २००३ ला सेंच्युरियनला खेळला गेला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या लढतीत न्यूझीलंडवर ७ गड्यांनी विजय संपादन केला होता. याहून अधिक मागे जाऊन पाहिले असता पहिला वर्ल्डकप सामना दोन्ही संघात १२ जून १९७५ ला रंगला होता. या लढतीत टीम इंडियाने ६० षटकात २३० धावा केल्या होत्या. हे लक्ष्य ५८.५ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात गाठत न्यूझीलंडने विजय मिळवला होता.

पाऊस ठरू शकतो खलनायक
हवामान खात्याने मँचेस्टरमध्ये आज मंगळवार व उद्या बुधवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना न झाल्यास हा सामना राखीव दिवशी (बुधवारी) होऊ शकतो. पावसामुळे दोन्ही दिवस सामना झाला नाही तर आयसीसीच्या नियमांनुसार भारतीय संघ अंतिम फेरीत धडक मारेल. साखळी फेरीत भारताचे जास्त गुण असल्याने न्यूझीलंडला स्पर्धेबाहेर व्हावे लागेल.