भारत, कतार एकाच गटात

0
110

‘फिफा २०२२ विश्‍वचषक’ स्पर्धेच्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारताचा समावेश आशियाई चॅम्पियन कतारसोबत करण्यात आला आहे. कतारव्यतिरिक्त ओमान, अफगाणिस्तान व बांगलादेश यांचा या ‘ई’ गटात समावेश आहे. या किचकट गटातून कतार संघाची आगेकूच निश्‍चित असून दुसर्‍या स्थानासाठी भारताला गल्फ कप विजेता ओमान व अफगाणिस्तान यांच्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. २०१८ विश्‍वचषक पात्रता स्पर्धेतही भारताला ओमानविरुद्ध झुंजावे लागले होते. त्यावेळी या अरब देशाने भारताचा २-१ (बंगळुरू) व ३-० (मस्कत) असा पराभव केला होता.

परंतु, २०१९च्या आशिया चषकात या दोन संघात झालेला सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. मागीलवेळी भारताला गुआम व तुर्कमेनिस्ताकडून पराभव स्वीकारावा लागल्याने गटात शेवटच्या स्थानी रहावे लागले होते. यावेळी भारताकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा आहे. ४० आशियाई देशांची ८ गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटात पाच देशांचा समावेश आहे. ५ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेत प्रत्येक संघ होम-अवे पद्धतीने राऊंड रॉबिन सामने खेळणार आहे. ८ गटांचे विजेते व सर्वाधिक गुण मिळविलेले चार उपविजेते ‘फिफा २०२२ विश्‍वचषक’ स्पर्धेच्या शेवटच्या पात्रता फेरीसाठी तसेच चीनमध्ये होणार्‍या ‘२०२३ एएफसी आशिया चषक फायनल्स’साठी पात्र ठरणार आहेत. उर्वरित २४ संघ वेगळ्या स्पर्धेत खेळणार असून यातील १२ संघ २४ संघांच्या एएफसी आशिया चषक स्पर्धेसाठी पात्रठरतील.

भारताचे सामने ः ५ सप्टेंबर वि. ओमान (होम), १० सप्टेंबर ः कतार (अवे), १५ ऑक्टोबर ः बांगलादेश (होम), १४ नोव्हेंबर ः अफगाणिस्तान (अवे), १९ नोव्हेंबर ः ओमान(अवे), २६ मार्च ः कतार (होम), ४ जून ः बांगलादेश (अवे), ९ जून ः अफगाणिस्तान (होम).