भारत-ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी झुंजणार

0
112

>> अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषकाचा अंतिम सामना आज खेळविला जाणार आहे. भारताचा पृथ्वी शॉ व ऑस्ट्रेलियाचा जेसन संघा या कर्णधारांच्या नेतृत्वगुणांचा कस या ‘ग्रँड फिनाले’मध्ये लागणार आहे.
भारताने आत्तापर्यंत तीनवेळा वर्ल्डकपला गवसणी घातली असून २०१२ साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली अखेरच्या वेळी भारताने विश्‍वचषक आपल्या नावे केला होता. मागील वेळी भारताला अंतिम फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले होते. गट साखळी गाजवल्यानंतर भारताला शेवटचा अडथळा पार करण्यात अपयश आले होते. ऑस्ट्रेलियाने सुद्धा तीनवेळा या स्पर्धेत धवल यश प्राप्त केले आहे. १९९८, २००२ नंतर २०१० साली त्यांनी मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जेतेपदाची चव चाखली आहे.

अंतिम सामना होणार्‍या तौरंगा या भागात मोठ्या प्रमाणात पंजाबी लोक राहत असून ८ हजार क्षमतेच्या मैदानात दोन ते तीन हजार पंजाबी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला हा पाठिंबा जड जाऊ शकतो. ख्रिस रॉजर्स व रायन हॅरिस या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ तयार झाला असून राहुल द्रविडसारख्या चाणाक्ष गुरुने टीम इंडियाला धडे दिले आहेत. त्यामुळे उभय संघांसोबत या माजी दिग्गजांच्या प्रशिक्षकपदाची कसोटी आज लागणार आहे. भारताची सलामी जोडी फॉर्ममध्ये असून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्स ब्रायंट धावा जमवण्यासाठी झगडताना दिसून येत आहे. त्यामुळे त्याच्या जागी मॅकस्विनी याला संधी मिळू शकते. अनुकूल रॉय व कमलेश रॉय यांच्या रुपात दोन स्पेशलिस्ट अष्टपैलू भारतीय संघाकडे आहे. तर ऑस्ट्रेलियाकडे विल सदरलँडच्या रुपात केवळ एकच ऑलराऊंडर आहे. स्पर्धेदरम्यान जेसन राल्सटन जायबंदी झाल्यानंतर त्याच्या जागी निवडण्यात आलेला ऍरोन हार्डीदेखील दुखापतीने त्रस्त आहे. ईशान पोरेल वगळता भारतासाठी चिंतेची बाब नाही.

फलंदाजी विभागात मात्र मध्यफळीत रियान पराग याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. हार्विक देसाईदेखील धावा जमवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे आघाडीफळीवरील दबाव वाढत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला होती. केवळ लॉईड पोपच्या इंग्लंडविरुद्धच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांचे आव्हान टिकून आहे. ‘त्या’ सामन्यात फलंदाजांच्या गाफिलतेमुळे त्यांना पराभवाच्या दारात जावे लागले होते. अंतिम सामन्यात मात्र एखादा सुटलेला झेल किंवा धावबाद करण्याची गमावलेली संधी विजेता व उपविजेता ठरवण्यास पुरेशी ठरू शकते.

भारत (संभाव्य)
पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुभमन गिल, हार्विक देसाई, रियान पराग, अभिषेक शर्मा, अनुकूल रॉय, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, ईशान पोरेल व शिवा सिंग.

ऑस्ट्रेलिया (संभाव्य)
जॅक एडवडर्‌‌स, मॅक्स ब्रायंट, जेसन संघा, परम उप्पल, नाथन मॅकस्विनी, जोनाथन मर्लो, विल सदरलँड, बॅक्सटर होल्ट, झॅकक इव्हान्स, रायन हॅडली व लॉईड पोप.