भारतीय सण आणि आजची स्त्री

0
1535
  •  मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर

मंगळागौरीच्या फुगड्या आणि नवरात्रोत्सवातला गरबा खेळण्यात, सणांच्या नावाने दागिने-कपडे खरेदी करण्यात, मित्रमंडळींसोबत मौजमजा करण्यात… थोडक्यात सांगायचं तर धार्मिकता पाळण्यापेक्षा, स्वतःला आनंद मिळवून देण्यासाठीच आजच्या पिढीकडून सण साजरे केले जातात असंच चित्र आहे.

सर्वोत्कृष्ट संस्कृतीचा देश म्हणून संपूर्ण जगभरात भारताचा महिमा गायला जातो. त्यामुळे भारतीय संस्कृतीविषयी औत्सुक्य आणि आकर्षण असलेले जिज्ञासू परदेशी त्याचा अभ्यास आणि संशोधन तर करतातच शिवाय ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. कारण आपल्या संस्कृतीची जी मुख्य उद्दिष्टे आहेत, त्यात विश्‍वहित, बंधुत्व भाव आणि कौटुंबिक ऐक्य यांचा अतर्भाव आहे. अशी ही संस्कृती जपण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी समाजामध्ये ऐक्याची भावना असणे फार आवश्यक आहे आणि हे काम आपले पारंपरिक सण करत असतात. आपला भारत विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, पोशाख अशा विविधतेने नटलेला आहे. या विविधतेतूनही एकता साधणारा असा हा एकमेव देश आहे. देशांतर्गत असलेल्या भिन्नतेमुळे भारतवासियांच्या मनातला दुजाभाव दूर होणे एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे आणि हे महत्त्वाचे काम आपल्या सणांमुळे घडत असते.
भारतातील वेगवेगळ्या राज्यांची वेगळी भाषा. या भाषांनुसार राज्याची घटकराज्यात गणना केली गेलेली आहे. या प्रत्येक घटक राज्याचे सणही वेगवेगळे आहेत हे आपण जाणतोच. उदाहरणादाखल काही…..
गोवा-महाराष्ट्र ः गणेशोत्सव, दिवाळी; आसाम ः उरूची;
कर्नाटक ः दसरोत्सव; राजस्थान ः मारवाड फेस्टिव्हल;
केरळ ः ओनम्; तामिळनाडू ः पोंगल; बंगाल ः दुर्गापूजा;
उत्तर भारत ः होळी पौर्णिमा; गुजरात ः नवरात्रोत्सव.
भारतातील हिंदूंप्रमाणेच इतर धर्मियांचे सण …
ख्रिश्‍चन ः नाताळ; मुस्लिम ः रमजान, बकर ईद; जैन ः महावीर जयंती;
बौद्ध ः बुद्धजयंती, धम्मचक्र प्रवर्तन; पारसी ः नवरोज.
आता दिवाळी, रक्षाबंधन, नवरात्रोत्सव अशा काही मोजक्या सणांची खासियत त्या त्या राज्यांपुरतीच मर्यादित राहिली नसून भारतभर् ते मनवले जाताना दिसतात… ही भारतीयांच्या एकात्मतेचीच साक्ष नाही का?
भारतीय जनता देवभोळी आहे. धार्मिक वृत्तीची आहे. तेव्हा देशभर महाशिवरात्री, आषाढी एकादशी, श्रीकृष्णजयंती, दत्तजयंती हे सण मोठ्या भक्तिभावाने संपन्न होतात. त्याचप्रमाणे देशप्रेमाची ज्योत मनात तेवत राहण्यासाठी देशासाठी त्याग केलेल्या आणि स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची जयंतीही अभिमानपूर्वक साजरी केली जाते. स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिन, गांधी जयंती, आंबेडकर जयंती, बालदिन, शिक्षकदिन हे काही महत्त्वाचे राष्ट्रीय सण आहेत.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्या त्या भागातील हवामान, पीक आणि सण-उत्सव यांची सांगड घालून काही सण साजरे केले जातात. शेतातील कामं करण्यात उपयोगी पडणार्‍या बैलांची श्रावणातल्या कृष्ण अमावस्येला, त्यांना छान सजवून- रंगवून पूजा केली जाते. या सणाला ‘पोळा’ असं म्हणतात. आसाममध्ये कृषीशी संबंधित सणाच्या वेळी बिहू नावाचं लोकनृत्य केलं जातं. अशाप्रकारे सण आणि हवामान यांचा परस्परांशी संबंध कसा असतो, त्यामागचा सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कोणता हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. परंतु तो एक वेगळा विषय आहे.

आता आपल्या हिंदू धर्माबद्दलच बोलायचं झालं तर इंग्रजी वर्षारंभाला म्हणजे जानेवारीमध्ये होणार्‍या मकर संक्रमणाच्या निमित्ताने मकर संक्रांतीचा सण पाळला जातो. प्रत्येक सण पाळण्यामागे एक पारंपरिक कथा कारणीभूत असते. उदा. रावणाचा पराभव करून राम अयोध्येत परतला तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. तेव्हा गुढी उभारून हा सण साजरा करण्याची प्रथा शिवाजी महाराजांनी पाडली. महाशिवरात्री (माघ कृ. त्रयोदशी), होळी (फाल्गुन शु. पौर्णिमा), श्रीरामनवमी (चैत्र शुद्ध नवमी), हनुमान जयंती (चैत्र शु. पौर्णिमा), अक्षय्य तृतीया (वैशाख शु. तृतिया), वटपौर्णिमा (ज्येष्ठ शु. पौर्णिमा), आषाढी एकादशी (आषाढ शु. एकादशी)… असे हे जवळजवळ प्रत्येक मासाला एक असे सण येतात. श्रावण महिना हा तर सणांचाच महिना असतो. या महिन्यात सर्वाधिक सण येतात. नागपंचमी (श्रावण शु. पंचमी), नारळी पैर्णिमा (श्रा. शु. पौ.), गोकुळाष्टमी (श्री. कृ. अष्टमी), पोळा (श्रा. अमावस्या) असे हे सण भाविक मोठ्या उमेदीने साजरे करतात. या महिन्यात मांसाहार वर्ज्य करून शुचिर्भूत राहून पावित्र्य राखले जाते. त्यानंतरच्या पुढील सार्‍या महिन्यात गणेशचतुर्थी (भाद्रपद शु. चतुर्थी), घटस्थापना (आश्‍विन शु. प्रतिपदा), दसरा (अश्‍वीन शु. दशमी), दिवाळी (आश्‍वीन कृ. चतुर्दशी), भाऊबीज (आश्‍वीन शु. द्वितीया), तुळशीविवाह (कार्तिक शु. द्वादशी) आणि शेवटी श्रीदत्तजयंती (मार्गशीर्ष शु. पौर्णिमा) अशा क्रमाने हे सर्व पारंपरिक सण लोक भक्तिभावाने संपन्न करतात.

सण साजरे करण्यात स्त्री-पुरुष, लहान-थोर सर्वचजण अग्रेसर असतात हे खरे. परंतु सण साजरीकरणाचा मुख्य कणा हा स्त्रीच असते. कारण सणाच्या मुळाशी असलेली सर्व कामे अर्थात देवकृत्याची सर्व तयारी, नैवेद्य, भोजन इ. स्त्रियांकडून केली जाते. परंतु सध्याच्या बदलत्या जीवनप्रवाहात पूर्वीप्रमाणेच सण मनवले जातात का?… याचं उत्तर प्रामाणिकपणे नकारार्थीच द्यावं लागेल. कारण सर्वांनाच माहीत आहे की आजची स्त्री पूर्वीच्या स्त्रियांप्रमाणे केवळ चूल आणि मुलीपुरतीच मर्यादित राहिलेली नसून तिचं विश्व विस्तारलेलं आहे. पूर्वीच्या आणि आजच्या स्त्रीच्या वागण्यात, वर्तनात, विचारात, कृतीत, ज्ञानात, बुद्धिमत्तेत एवढंच नाही तर देवाबद्दलच्या श्रद्धेत आणि भक्तीतही जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. चूल-मूल आणि देव यांतच गुरफटून पडलेल्या जुन्या पिढीतील गृहिणींसाठी सण म्हणजे पर्वणीच असायची. भक्तीने ओथंबलेल्या मनाने त्या विधीपूर्वक सण पार पाडण्यात आनंद मानत. सण जवळ येऊन ठेपले की त्यांच्या स्वागतासाठी लागणार्‍या पूर्वतयारीत त्या स्वतःला जुंपून घेत. देवासाठी कापसाच्या वाती वळण्यापासून सुरुवात! कोठारात धुळ खात पडलेले मोठाले पितळी टोप-तपेली, ताटं-पेले, समया-तबकं, आरत्या-निरांजनं हे सारे चिंचेने लखलखीत करणे, नेवर्‍यांसाठी खोबरं किसून वाळवून ठेवणे, वेलचीची पावडर करून ठेवणे, भुईमुग भाजून ठेवणे, घराची-बागेची झाडलोट करणे, मुलांचे नवीन कपडे-लक्ते तयार ठेवणे अशा कामात ती गुंतून जाई!
आजची स्त्री – मग ती शहरी असो वा ग्रामीण – महागाईशी झगडत, आपलं राहणीमन उंचावण्यासाठी अर्थार्जन करण्यास घराबाहेर पडलेली आहे. तिची कसरत वेगळं रंगरूप घेऊन आलीय. त्याचीच पुनरुक्ती करावी तर – स्वैपाकपाणी, नोकरी, मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, आजारपणं, पै-पाहुणा, बाजारहाट, बँकेची कामं आणि त्यात स्वतःचे छंद जोपासणं- हा सारा व्याप एकटीने सांभाळून ताठ कण्याने संसाराचा गाडा ती हाकत असते. हे सारं अंगावर घेण्याइतपत ताकद, शारीरिक बळ अधिक असलेल्या पुरुषांकडे नसते. हे सहनशक्तीने सांभाळण्याची किमया फक्त स्त्रीच करू शकते. मुद्दा हा की हे व्याप सांभाळून, उत्सव शास्त्रशुद्धपणे संपन्न करणे तिच्या आवाक्याबाहेरचे आहे. तेव्हा ‘जमेल तसं’, ‘झेपेल तेवढं’ या सूत्रांना पकडून ती सर्व ‘उरकून’ घेते, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरू नये.

काही मोजक्याच जुन्या अविभक्त घराण्यांचे अपवाद वगळता, इतर जण आपल्या ‘इन-मिन-तीन’च्या विभक्त कुटुंबातील संसारात जागेच्या अभावी सण थोडक्यातच आटोपताना दिसतात. याचं मुख्य कारण वेळेचा अभाव. थकून-भागून घरी आल्यावर ही अतिरिक्त कार्य घेऊन बसण्यास तेवढे त्राण अंगात उरत नाहीत. थोडक्यात वेळ आणि बळ या दोहोंचीही उणीव त्यांना सणांचा सरंजाम शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यापासून परावृत्त करतात. या स्त्रियांच्या अडचणी लक्षात घेऊन, सणासाठी लागणार्‍या वातीपासून खाद्यपदार्थापर्यंतच नाही तर शाकाहारी सुग्रास थाळ्याही उपलब्ध झालेल्या आहेत. हा स्त्रियांसाठी फार मोठा आधार आणि दिलासा ठरलाय. मग ही महागडी आयती सामग्री आणण्यासाठी स्वतःचा आणि नवर्‍याचा खुळखुळणारा खिसा खालसा करण्यास ती मागे-पुढे पाहत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे.

सर्वांच्याच घरी सण करायचे असतात. त्यामुळे हाताखालच्या मदतनीसांना सुट्टी द्यावी लागते. घरातील इतर स्त्रियांच्या मासिक पाळ्यांची अडचण येते. छोट्या जागेत मुलांच्या गोतावळ्यात सोवळ्यात अन्न शिजवणे अवघड जाते. या सार्‍या अडचणींना सामोरं जात सण उरकावे लागतात आणि खरं सांगायचं तर, कितीही अडचणी असल्या तरी ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे भक्तीपूर्वक, रितीभाती पाळून सण साजरा करण्याची मनापासून इच्छा असेल तर तिथे ‘वेळ, स्थळ, काळ, बळ’ यांच्या कमतरतेच्या सबबी फोल ठरतील.

पण… खरी अडचण तर इथेच आहे. देवाच्या अस्तित्वावरचा विश्वास शिक्षणामुळे, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांच्या प्रभावामुळे डळमळीत होऊ लागलेला आहे. स्त्रियांच्या विचारात प्रचंड परिवर्तन झालेले आहे. धर्मावरचा पगडा काळासोबत कमी कमी होत गेलेला आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक मतप्रणालीच्या स्त्रिया देव-देव करण्यापेक्षा आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून वाचन करतील, जॉगिंगला जातील, जीमला जातील, पार्लर्सचे उंबरठे झिजवतील, स्विमिंग-बॅडमिंटन खेळतील, क्लब-भिशीला जातील, मध्यरात्र उलटेपर्यंत व्हॉट्‌सऍप- फेसबुकवर असतील, छोट्या पडद्यासमोर ठाण मांडतील. हा वेळ तिने मनावर घेतल्यास सणाच्या पूर्वतयारीसाठी ती वापरू शकतेही. पण घोडा अडतो तो श्रद्धेच्या ठिकाणी. सण साजरे केले जातात ते केवळ घराण्याची चालत आलेली परंपरा म्हणून! मंगळागौरीच्या फुगड्या आणि नवरात्रोत्सवातला गरबा खेळण्यात, सणांच्या नावाने दागिने-कपडे खरेदी करण्यात, मित्रमंडळींसोबत मौजमजा करण्यात… थोडक्यात सांगायचं तर धार्मिकता पाळण्यापेक्षा, स्वतःला आनंद मिळवून देण्यासाठीच आजच्या पिढीकडून सण साजरे केले जातात असंच चित्र आहे.