भारतीय संस्कृतीची महती

0
159

– अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रुझ, बांबोळी)

कोरोनाच्या संकटामुळे एक गोष्ट मात्र अभिमानास्पद घडते आहे… आपल्या भारतीय संस्कृतीकडे आपल्या देशातील लोकच नव्हे तर इतर देशवासीही आदराने बघू लागले आहेत. नुसतेच बघत नाहीयेत तर हळूहळू आपल्या संस्कृतीचे अनुकरण करण्याकडे लोकांचा कल वाढतोय.

३१ डिसेंबरची धामधूम संपवून नवीन वर्षाच्या स्वागताला सगळे सज्ज झालेले. २०२०ची सुरुवात आपण सगळ्यांनीच एकमेकांना ‘हॅपी न्यू इयर’ म्हणत शुभेच्छा देऊन केली. टीव्हीवर चांगले कार्यक्रम झालेत. पार्ट्या झाल्या आणि जेमतेम दोन महिने झाले असतील नसतील तोच त्सुनामी आली. एक जीवाणु झंझावातासारखा सगळ्या जगभर पसरला. त्या जिवाणूने बघता बघता अख्ख्या जगाला.. समस्त मानव जातीला कधी आपल्या कवेत घेतलं कळलंच नाही. माणसाला नुसतं माकड बनवून टाकलं. नवीन वर्षाची सुरुवात हॅपी झालीच नाही. आता त्याला कोणी काही म्हणू देत… कोणी म्हणतात निसर्गाचा कोप.. शेवटी धरतीतरी किती माणसांचा भार सहन करणार? लोकसंख्या कमी करण्याचा विचार माणसं करतच नाहीत.

शेवटी निसर्गाने म्हणा किंवा शंकराने म्हणा, ‘तिसरा डोळा’ उघडलाच. माणसांची संख्या कमी होऊ लागली. कोणी म्हणतात- हे तिसरं महायुद्धच, पण जैविक महायुद्ध. यात जो तरेल तो तरेल. कोणी म्हणतात हे संकट मानवानेच निर्माण केलंय. कोणी म्हणतात सत्तापिपासू लोकांनी हा विषाणु सार्‍या जगभर पसरवलाय. कोणाची काहीही मतं असू देत, त्या वादात आम्हाला पडायचं नाही. पण याचा प्रभाव किती काळ पडणार? याचा शेवट कधी होणार? कोण जिंकणार? कोण हरणार? .. माहीत नाही. पण सध्या तरी ‘मी’ ‘मी’ म्हणणारा माणूस हवालदिल झालाय एवढं मात्र खरं! टींव टींव करणार्‍या माणसाला स्वतःच्या घरातच नजरकैद केलंय.
पण हीच माणसाच्या कसोटीची खरी वेळ आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करणारी माणसं याला संकट मानतच नाहीये. त्यांच्या मते आयुष्याला कलाटणी देणारी ही एक संधी आहे आळशीपणा झटकून स्वावलंबी होण्याची, आत्मनिर्भर होण्याची, मनावर संयम ठेवण्याची, नवनवीन शिकण्याची, माणसं ओळखण्याची ही संधी चालून आलीय, त्याचा फायदा करून घ्या. खरंच आहे ते.

पिझ्झा, केक, बिस्किटं, चिवडा, लाडू, शेव हे सगळं विकत आणायची सवय झालेले आम्ही.. आज… ‘विकत कशाला आणायचं रे, घरी करुया की..’ म्हणू लागलो आहोत. पापड, पापड्या, लोणची कोण घरी करत बसतंय म्हणणारे आम्ही लवकर उठून उन्हं वर यायच्या आधी पापड्या घालायला लागलो आहोत, लोणची घरी करतोय आणि वर समाधानाची ढेकर देत म्हणतोय, ‘बाकी काही म्हणा हं, घरचं ते शेवटी घरचंच. त्याला तोड नाही!’ हा विचार कधी फारसा सुचलेला नव्हता आणि रुचलेलाही नव्हता. घराघरातून मुलांना काटकसरीचे धडे मिळू लागले आहेत. कारण १ तारखेला वेळेवर पगार होतोय का नाही? त्यात काटछाट तर नाही ना होणार, अशी काळजी सुरू झालीय. इतके दिवस घरीच असणार्‍या गृहिणीलासुद्धा वरवरच्या कामाला मदतीचे आणखी दोन हात हवे असायचे. अगदी छोटं कुटुंब असलं तरी! अगदी तरण्या- ताठ्या गृहिणींनासुद्धा- नाही होत हो सगळी कामं … म्हणायची सवय लागली होती. आता मात्र कामवालीची मदत सोडाच पण उलट तिचीही कामं स्वतःलाच करावी लागतायत. अगदी भांडी घासणं, केर काढणं, पुसणं सगळं सगळं. सकाळी ८ वाजले की आपणच दाराबाहेर जायचं. बेल वाजवायची आणि घरात येऊन कामाला लागायचं. परत जरा म्हणायचं, ‘आज जरा उशीरच झाला का हो वहिनी?’ मालकीणही आपण आणि मोलकरीणही आपणच… अशी अवस्था. आज आत्ता मला माझ्या आजीची आठवण येतेय. आजी रोज सकाळी ५ वाजता उठायची. उठता उठता स्वतःलाच म्हणायची, जिवा ऊठ. किती कामं पडलीयत… एक ना दोन आणि मग उठून स्वतःच कामाला लागायची.

लॉकडाऊनने ही अवस्था फक्त स्त्रियांचीच केली नाहीये तर कधी स्वतःचा चहासुद्धा करून न घेणारा, कधी स्वतःचा एक कपसुद्धा न धुणारा समस्त पुरुषवर्ग घरातली सगळी काम करू लागलाय. घर दोघांचं आहे मग दोघांनी मिळून नको का करायला घरातली सगळी कामं! हा विचार नव्यानेच मूळ धरू लागलाय. असो. हेही नसे थोडके. एकूण वाट चांगली आहे. आत्मनिर्भरतेच्या दिशेने पावलं पडायला हळुहळू सुरुवात होतेय. कोरोनाचं संकट गेल्यावरसुद्धा लोक असेच राहिले तर देश आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

एखाद्या गोष्टीशिवाय, वस्तुशिवाय आमचं चालणारंच नाही.. असा एक वर्ग आहे. खरोखरच ती गोष्ट त्यांच्या गरजेची असतेच असं नाही. पण काही लोकांचा तो अट्टाहास असतो. त्यांच्या मनाची तशी धारणाही असते आणि ती वस्तू ते मिळवतातच. पण दुसर्‍या कोणालातरी त्या वस्तूंची अत्यंत गरजही असू शकते, त्याला ती मिळत नाही. अशा लोकांकडून स्वावलंबनाबरोबरच संयमाचीही अपेक्षा आहे. या काळात हे पण शिकण्यासारखं आहे.

या सगळ्याचा आर्थिक फटका तर खूपच मोठा आहे. कित्येक वर्षे काम केलेल्यांच्यासुद्धा नोकर्‍या गेल्या आहेत. बर्‍याच लोकांचे पगार वेळेवर मिळत नाहीयेत. मजुरवर्गाचे हाल तर विचारूच नका. कितीतरी मजूर रस्त्यावर आलेत. कष्ट करायची तयारी आहे पण काम नाही. काम नाही म्हणून पैसा नाही. कारण उद्योगधंदे बंद आहेत. आर्थिक जगतात फार मोठी उलथापालथ सुरू आहे. सगळ्या जगावरच हे संकट आलंय… तिथे कोण कोणाला मदत करणार? हा प्रश्‍नच आहे. आकाशच फाटलंय तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार? तरीही ही घडी बसवण्याचा प्रयत्न आपलं सरकार कसोशीनं करीत आहे. त्यामुळे यातून मार्ग निघेलच पण त्याला वेळ लागेल. आपल्या संयमाची ही कसोटीच आहे. लॉकडाऊनची मुदत मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतेच आहे. पण त्यामुळे सामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय, हे मात्र खरं.

माणूस आत्मनिर्भर होताना, देश आत्मनिर्भरतेची स्वप्न बघताना, ज्यांच्या हातात आपण आपला ‘उद्या’ सोपवणार आहोत, जे आपल्या देशाचं भवितव्य घडवणार आहेत ती पिढी म्हणजे किशोरवयीन किंवा तरुण पिढी मात्र उदासीन वाटतेय. सगळे घरात असताना कोणी आजी-आजोबा आपल्या नातवंडांना गोष्टी सांगतील की जेणेकरून त्यांतून काही बोध घेता येईल. मुलं आपल्या पालकांबरोबर मोकळेपणानं संवाद साधतील. त्यांतून काही शिकतील, त्याचा अभ्यास करतील, जो त्यांचं स्वतःचं भविष्य घडवायला, देशाचं भविष्य घडवायला उपयुक्त ठरेल. पण असं होताना दिसत नाही. मोबाईलवरच्या गेममधून ही मुलं डोकं वर काढतंच नाहीयेत. शिवाय त्यांना वाटतंय लॉकडाऊन म्हणजे मौजमस्तीचा काळ. अजूनही आमच्या घराजवळच्या कोपर्‍यावर रात्री एक टोळकं मस्त खाण-पिणं-गप्पा यात रात्री ९ वाजल्यानंतर रमलेलं असतं.

पण तरीही आशेचे किरण अजून आहेत. या संकटामुळे एक गोष्ट मात्र अभिमानास्पद आहे… आपल्या भारतीय संस्कृतीकडे आपल्या देशातील लोकच नव्हे तर इतर देशवासीही आदराने बघू लागले आहेत. नुसतेच बघत नाहीयेत तर हळूहळू आपल्या संस्कृतीचे अनुकरण करण्याकडे कल वाढतोय. बर्‍याच घरातून बंद पडलेल्या रामरक्षेचे आणि मारुतीस्तोत्राचे आवाज ऐकू येऊ लागलेत. नित्यनेमाने तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावला जातोय. अश्रद्ध, नास्तिक लोक हळुहळू देवापुढे हात जोडू लागले आहेत. या संकटामुळे परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली आहे. कारण या संकटातून तोच तारणार आहे याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली आहे.

बाहेरून आल्यावर हातपायतोंड स्वच्छ धुणे हे आम्हाला आमच्या संस्कृतीने लहानपणापासूनच शिकवले आहे. कोणी ओळखीचा माणूस भेटला तर त्याला शेकहँड न करता किंवा मिठी न मारता थोड्या अंतरावर उभे राहून हात जोडून त्याला अभिवादन करण्याची आमची संस्कृती. हे सोशल डिस्टन्सिंगच नव्हे काय! होम-हवन, मंत्रपठण, शांती पाठ ही आमचीच संस्कृती आहे. आज अमेरिकेतील व्हाईटहाऊसमध्ये ट्रम्प साहेबांनी हिंदू पंडितांना बोलावून यजुर्वेदावर आधारित शांतीपठण करून घेतले हे कशाचे द्योतक आहे. अंधार पडायच्या वेळी देवघरात दिवा लावणे ही आमची संस्कृती आहे. शिवाय आमचा शाकाहार. या सगळ्या गोष्टी आज अनेक देश आधारभूत मानू लागले आहेत. हा आमच्या संस्कृतीचा गौरवच नव्हे का? हेच सगळं कुठेतरी आपण विसरत चाललो होतो याची आठवण कोरोनाच्या या संकटाने आम्हाला करून दिलेली आहे.
देश हा धर्म आहे असं मानलं तर, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी अवतार घेईन… असं श्रीकृष्णानं आपल्याला सांगितलंच आहे. तेव्हा तो नक्कीच येईल. पण त्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं, हो ना!