भारतीय वीरांगना

0
388

हरिष भनोत हे ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तसंस्थेत काम करणारे एक हुशार पत्रकार. त्यांना एक मुलगी होती, तिचे नाव नीरजा. नीरजा लहानपणापासूनच खूप शूर होती. अभ्यासातही हुशार अन् चतुर. नीरजाला लहानपणापासूनच आकाशात उडणार्‍या विमानांचे आकर्षण होते. तिला मोठेपणी एअर लाईन्समध्येच काम करायचे होते. ते तिचे स्वप्न होते.
ते तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पालकांनी तिला खूप प्रोत्साहन दिले. मेहनत घेतली. शेवटी तिचं स्वप्न साकार झालं. तिला पॅन- ७३ या एअर लाईन्स कंपनीत नोकरी मिळाली. ती तिथे सिनिअर पर्सर म्हणून काम करत होती.
५ सप्टेंबर १९८६ चा दिवस. पाकिस्तानातील कराची विमानतळावर मुंबई ते अमेरिका अशा जाणार्‍या पॅन एम ७३ या एअर लाईन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी वेठीस धरले. त्या विमानात एकूण ४०० प्रवासी होते. नीरजादेखील त्याच विमानात कार्यरत होती. अतिरेक्यांना ते विमान इस्रायलमधील कोणत्या तरी इमारतीला धडकवायचे होते. विमानात पायलट नव्हता. त्यामुळे अतिरेकी विमान पळवून घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेकी कारवाया सुरूच होत्या. त्यांनी पाकिस्तान सरकारकडे पायलटची मागणी केली. त्यानी ती मागणी साफ फेटाळून लावली.
अतिरेकी जास्तच आक्रमक बनले. त्यांनी प्रवाशांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी नीरजाला सगळ्या प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करण्यास सांगितले. अमेरिकन प्रवाशांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांनी अमेरिकेवरदेखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला. नीरजा सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करत होती, पण तिने शिताफीने अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून ठेवले. अतिरेक्यांनी सर्व पासपोर्टची मागणी केली तेव्हा नीरजाने अमेरिकन प्रवासी सोडून इतर प्रवाशांचेच पासपोर्ट त्यांना दिले. मग अतिरेक्यांनी दुसरी चाल खेळायला सुरुवात केली. आता त्यांनी ब्रिटिश प्रवाशांना ठार मारण्याची धमकी दिली. नीरजाने त्या अतिरेक्यांना खूप समजावले, मग त्यांनी ब्रिटिशांना मारणार नाही असे कबूल केले.
नीरजा खूप चाणाक्ष होती. तिच्या लक्षात आले की, थोड्याच वेळात विमानातील इंधन संपेल आणि विमानात अंधार पसरेल. या अंधाराचा फायदा उठवायचा. तिच्या मनात काय करायचे याचे विचार घोळू लागले. तिने एक प्लॅन आखला. प्रवाशांना जेवण द्यायचे आहे असे सांगून प्रत्येकाजवळ जेवण द्यायच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा दाखवला. त्याची सर्व माहिती प्रवाशांना दिली.
नीरजाला पूर्ण कल्पना होती, इंधन संपून अंधार होणार. थोड्या वेळाने खरंच अंधार झाला. नीरजाने आपत्कालीन दरवाजा उघडला. प्रवाशांनी पटापट बाहेर उड्या मारल्या. अतिरेक्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला.
सर्व प्रवासी बाहेर सहीसलामत जाईपर्यंत नीरजा दरवाजात उभी राहिली होती. ती बाहेर पडणार तोच तिला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. नीरजा त्या दिशेने धावत गेली. त्या लहान मुलाला घेऊन बाहेर जात असतानाच एका अतिरेक्याने गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या आपल्या अंगावर घेत असतानाच तिने त्या मुलाला बाहेर फेकले. पण गोळी लागून तिचा अंत झाला.
पाकिस्तानी कमांडोजनी तीन अतिरेक्यांना ठार मारले होते, पण चौथ्या अतिरेक्याच्या गोळीने नीरजाचा बळी घेतला होता. नीरजा सतरा तास सलग त्या अतिरेक्यांशी झुंजत होती. चारशे प्रवाशांना वाचविण्यात मात्र तिला यश आले होते. अखेर ज्या मुलाला वाचवताना ती मृत्युुमुखी पडली होती तो लहानगा पुढे वैमानिक झाला. तो म्हणतो, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.
भारत सरकारने नीरजाला मरणोत्तर ‘अशोकचक्र’ बहाल केले. पाकिस्तानने पण ‘तमगा-ए-इन्सानियत’ या पुरस्काराने, तर अमेरिकेने ‘जस्टिज ऑर विक्टन ऑफ क्राईम’ या पुरस्काराने सन्मानीत केले.