भारतीय लोकशाही आणि घराणेशाही

0
250
  • देवेश कु. कडकडे

कोणताही पक्ष मोठा होतो तो कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर; परंतु जेव्हा सत्तेची गोड फळे चाखायची पाळी येते, तेव्हा घराण्याच्या वारसदारांची निवड होते. सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षापुरता मर्यादित राहतो. आज अनेक पक्ष अशा घराणेशाहीच्या दावणीला बांधले गेले आहेत…

आजचा राज्यकर्ता हा एखाद्या घराण्यातूनच निवडला जात नाही तर देशातील प्रत्येक मतदाराने केलेल्या मतदानाच्या माध्यमातून निवडला जातो. देशात प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही जाती, धर्माचा, पंथाचा, लिंगाचा असो, निवडणूक लढवू शकतो आणि कर्तृत्वाच्या बळावर निवडून येऊ शकतो. एखादा सर्वसामान्य माणूस देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो. हे पद केवळ कोणत्याही एका घराण्याची मक्तेदारी नसून यावर प्रत्येक नागरिक दावा करू शकतो हीच आपल्या लोकशाहीची किमया आहे.

आधी राजघराण्यातील व्यक्तीला राजाच्या मृत्यूनंतर राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार होता. जनता राजाला भगवान विष्णूचा अवतार मानत असे. मोगल साम्राज्याचा इतिहास हा सिंहासन मिळवण्याच्या संघर्षात रक्तरंजित बनला आहे. कट – कारस्थाने करून वारसदार एकमेकांचे खून पाडायचे. शहेनशहा औरंगजेबाने आपल्या दोन थोरल्या बंधूंची हत्या केली, बापाला कैदेत टाकले आणि दिल्लीची बादशाही मिळवली. सध्या अशा तर्‍हेची राजघराणी अस्तित्वात नसली तरी पक्षातल्या घराणेशाहीचीही सर्वत्र चलती आहे.

सध्या आपल्या देशात दोन तर्‍हेची घराणेशाही अस्तित्वात आहे. अनेकदा नेत्याची पत्नी, मुलगा, सून, कन्या, जावई हे परंपरेने राजकारणात सहभागी होतात, तर दुसरी घराणेशाही ही आकस्मिक असते. एखाद्या नेत्याचे आकस्मिक निधन झाले तर त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला – ज्याला राजकारणाचा कधी गंधही नसतो – त्याला उमेदवारीचा टिळा लावला जातो. राजकीय घराण्यातल्या वारसदारांनी राजकारणात येऊच नये असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. राजकारण हा सुद्धा एक धंदा बनला आहे. या धंद्यात पैशांबरोबर मान-सन्मान हे सुद्धा पायाशी लोळण घेतात. आज लक्षावधी धंदे अस्तित्वात असताना मुलांचा ओढा बहुतेकवेळा पित्याच्या धंद्याकडे असतो, कारण वडिलांकडून आयता वारसा मिळतो आणि धंद्याच्या बारकाईचे बाळकडू त्याला घराण्यातूनच मिळालेले असते. जर त्यांचे पक्षासाठी कार्य आणि सामाजिक कर्तृत्व लक्षणीय असेल तर त्याला पुरेपूर महत्त्व दिलेच पाहिजे.
दुसर्‍या उदाहरणातील घराणेशाही ही एखाद्या दिवंगत नेत्याच्या सहानूभुतीच्या आधारावर भावनिकरित्या जोडण्याचा प्रयत्न असतो. घराणेशाहीची लागण झाली नाही असा पक्ष आपल्या देशात शोधूनही सापडणार नाही, इतकी त्याची पाळेमुळे घट्ट रोवली गेली आहेत.

आज राजांची संस्थाने सरकारने भले खालसा केली असली तरीही त्यांचे अस्तित्व लोकशाहीच्या माध्यमातून टिकून आहे. महाराष्ट्रात अशा अनेक जिल्ह्यांत घराणेशाहीचे अजूनही प्राबल्य आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हे राजकारण पसरल्यामुळे घराणेशाही अपरिहार्य बनली आहे. साखर कारखाना, सुत गिरण्या, शिक्षण संस्था, दुग्ध संस्था, सहकारी बँका, पंचायत संस्था अशा विविध माध्यमांतून जिल्ह्याचे लाखो मतदार या घराणेशाहीशी जोडले गेले आहेत. उद्योगाचा मोठा भाग यांच्याकडे असल्यामुळे प्रचंड खर्च करण्याची ताकद असते. ही बहुतेक संस्थाने पूर्वी कॉंग्रेस पक्षाशी संबंधीत होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर ती त्या पक्षाशी जोडली गेली. सध्या महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची तीन मोठी राजकीय घराणी – नगरचे विखे पाटील, मावळचे मोहिते पाटील आणि साताराचे भोसले हे आता भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. शरद पवार आणि विखे पाटील घराणे यांच्यामधून विस्तव जात नाही. विखेंच्या वारसदाराला मावळमधून तिकीट मिळू नये म्हणून पवारांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावली; तेव्हा सुजय विखे पाटलांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाची उमेदवारी मिळवली.

आज महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ६०% उमेदवार हे घराणेशाहीशी जोडले गेले आहेत. म्हणजे त्यांच्या आजोबा, वडील, काका, मामा यांनी कधी तरी आमदारकी, खासदारकी भूषविली आहे. जेव्हा एखाद्या नेत्याला आपले अस्तित्व काही वर्षांत संपणार याची कुणकुण लागते तेव्हा आपल्या घराण्याची परंपरा निरंतर चालावी म्हणून आपला पुत्र-कन्या. पुतण्या- पुतणी याला राजकीय पटलावर पुढे आणले जाते. शरद पवार स्वतः पक्षाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार, कन्या लोकसभा खासदार, पुतण्या आमदार आणि आता नातवाला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ हे राज्यात मंत्री होते. तेव्हा पुत्र आमदार, तर पुतणे खासदार होते. तसेच राष्ट्रवादीचे गणेश नाईक राज्यात मंत्री असताना एक पुत्र आमदार, दुसरा खासदार तर पुतण्या नवी मुंबईचे महापौर होते. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची एक कन्या मंत्री, दुसरी खासदार तर त्यांची मामेबहीण प्रमोद महाजनांच्या कन्या खासदार आहेत. कॉंग्रेस आणि शिवसेनेतही अशी घराणेशाही आहे. लालुप्रसाद यादवांनी तर घराणेशाहीच्या उदात्तीकरणाचा कहर केला. भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागताच राजकारणाचा गंधही नसणार्‍या आपल्या पत्नीला मुख्यमंत्री बनवले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एन.टी. रामारावचे जावई. चंद्राबाबूंनी आपल्या सासर्‍याच्या तेलगु देसम पक्षाचे विभाजन करून मुख्यमंत्रिपद मिळवले होते. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादवांचे घराणे, चरणसिंगांचे घराणे, मध्य प्रदेशचे शिंदे घराणे, कर्नाटकात देवेगौडा पिता-पुत्र एकाचवेळी मंत्रिपदी होते. गोव्यातही अशी उदाहरणे आहेत.

कोणताही पक्ष मोठा होतो तो कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर. परंतु जेव्हा सत्तेची गोड फळे चाखायची पाळी येते, तेव्हा अशा घराण्याच्या वारसदारांची निवड होते. सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षापुरता मर्यादित राहतो. आज अनेक पक्ष अशा घराणेशाहीच्या दावणीला बांधले गेले आहेत. नेत्यांची मुले अशावेळी आयत्या बिळात नागोबा बनतात. नैतिकता, आदर्शवाद हे सगळे पोकळ असून माझ्या घराण्यातील वारसदार हेच पक्षाचे खरेखुरे मालक आहेत असा भाव वाढीला लागतो. पक्षात कार्यकर्ते दोन प्रकारचे असतात. एक ज्यांची निष्ठा केवळ पक्षाच्या कामाशी असते. त्यांना भविष्यात तिकीट मिळाले नाही तरी दुःख नसते. दुसरा कधी ना कधी आपला पक्षात सन्मान होऊन तिकीट मिळेल ही इच्छा बाळगून असतो. नाही तर त्याचा मुखभंग होऊन तो एकतर मुग गिळून गप्प राहतो किंवा बंडाचे निशाण फडकावतो.
स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक सामान्य कार्यकर्ते आमदार-खासदार झाले. मात्र पुढे कालांतराने यातून राजकीय घराणी अस्तित्वात आली. राष्ट्रीय पक्ष आणि विविध प्रादेशिक पक्षांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री-पंतप्रधानपदी बसवले. मात्र सत्तासुंदरीचा मोह वाढू लागताच घराणेशाहीचा विळखा सर्वच पक्षांना बसू लागला. शेवटी या घराण्यांचे अस्तित्व टिकवणे हे मतदारांच्या मर्जीवर अवलंबून असते. या घराण्यातील अनेक व्यक्ती आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने राजकीय क्षेत्रात चमकल्या आहेत. लोकशाहीत अशा अनेक अयोग्य वृत्तींनी शिरकाव केला आहे. तशी घराणेशाही ही सुद्धा नेत्यांनी प्रस्थापित केलेली आणि मतदारांनी खतपाणी घातलेली वृत्ती आहे.