भारतीय मुसलमानांच्या अंतरंगाचा शोध

0
105
  •  परेश प्रभू

(एडिटर्स चॉइस)

जरासे खुट्ट झाले तरी भावना दुखावल्याचा कोलाहल माजवला जातो आणि ईप्सिते साधली जातात. या पार्श्वभूमीवर नुकतीच दोन वेगळ्या धाटणीची, परंतु एकाच विषयाची चर्चा करणारी नवी पुस्तके वाचनात आली. दोन्हींमध्ये चर्चिला गेलेला विषय आहे धर्म आणि तोही इस्लाम! भारतीय मुसलमानांच्या अंतरंगाचा शोध घेणार्‍या या लक्षवेधी पुस्तकांविषयी –

 

धर्म हा आजच्या काळात अतिशय संवेदनशील विषय बनला आहे. त्यामुळे त्या विषयी मोकळेपणाने चर्चा करणे तर केव्हाच इतिहासजमा झाले आहे. आजकाल भावना एवढ्या टोकदार बनत चालल्या आहेत किंवा स्वार्थी हेतूंसाठी तशा बनवल्या जात आहेत की, जरासे खुट्ट झाले तरी भावना दुखावल्याचा कोलाहल माजवला जातो आणि ईप्सिते साधली जातात. परंतु या बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच दोन वेगळ्या धाटणीची, परंतु एकाच विषयाची चर्चा करणारी नवी पुस्तके या आठवड्यात वाचनात आली. दोन्हींमध्ये चर्चिला गेलेला विषय आहे धर्म आणि तोही इस्लाम! दोन्ही पुस्तके देशातील दोन आघाडीच्या प्रकाशनसंस्थांनी प्रकाशित केलेली आहेत आणि

वेगळ्या धाटणीची आहेत, परंतु दोन्हींमागे भारतीय मुसलमान समुदायाच्या अंतरंगांचे दर्शन घडवण्याचा उद्देश असल्याने येथे एकत्र चर्चेसाठी घेतली आहेत. यातले पहिले पुस्तक आहे कॉंग्रेसी विचारवंत व देशाचे माजी कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांचे ‘व्हिजिबल मुस्लीम, इनव्हिजिबल सिटीझन’ आणि दुसरे पुस्तक आहे. ऊर्दू

साहित्याच्या नामांकित अभ्यासक रक्षंदा जलील यांचे, ज्याचे लक्षवेधी नाव आहे, ‘बट यू डोन्ट लूक लाइक अ मु

स्लीम’!

सलमान खुर्शीद यांचे पुस्तक वैचारिक स्वरूपाचे आहे, तर रक्षंदा जलील यांचे पुस्तक हा त्यांच्या वाङ्‌मयीन शैलीतील लघुनिबंधांचा संग्रह आहे. परंतु दोन्ही पुस्तके लक्षवेधी व वाचनीय आहेत. सलमान खुर्शीद हे माजी कायदामंत्री व कॉंग्रेसचे नेते तर आहेतच, परंतु माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचे ते नातू. बर्‍याच वर्षांपूर्वी खुर्शीद यांनी ‘ऍट होम इन इंडिया’ हे भारतीय मुसलमानांवरील पुस्तक लिहिले होते. परंतु शशी थरूर यांचे ‘व्हाय आय ऍम अ हिंदू’ हे पुस्तक वाचून आपल्याला नव्याने हे लेखन करायची प्रेरणा मिळाली, पण ‘व्हाय आय ऍम अ मुस्लीम’ हे सांगण्याचा नव्हे, तर ‘व्हॉट ऍम आय ऍज अ मुस्लीम’ हे सांगण्याचा आपला हा प्रयत्न असल्याचे ते सांगतात.

भारतीयत्व

 

, भारतीय लोकशाही, आजची आधुनिकता यामध्ये मुसलमान समाज नेमका कुठे आहे हे या पुस्तकाचे खरे सूत्र आहे. देशातील ‘लिबरल’ मुसलमानांची व्यथा ते मांडतात. त्यासाठी इस्लामशी निगडित इतिहासाचा मौलिक धांदोळा घेतात आणि आजच्या परिस्थितीचीही धीट मांडणी करतात. आज भारतामध्ये मुसलमान म्हणजे यूपी बिहारमधला मुसलमान, टोपी किंवा दाढीधारी पुरूष आणि बुरखाधारी स्त्रिया असेच सरसकट चित्र डोळ्यांसमोर रंगवले जाते, परंतु केरळचा, आसामचा मुसलमान यूपी बिहारपेक्षा कितीतरी वेगळा असतो, त्याची भाषा वेगळी असते, जडणघडण वेगळी असते हे ते आवर्जून नमूद करतात. सातव्या शतकात अरब व्यापारी पश्‍चिमी

किनार्‍यावर आले व मलबार, कोकण व कच्छच्या किनार्‍यावर स्थायिक झाले, तेव्हापासून त्यांची वस्ती या भागांत निर्माण झाल्याचे खुर्शीद यांनी नमूद केले आहे. भारतातील सर्वात जुनी चेरामन जुमा मशीद केरळमध्ये इ. स. ७२९ मध्ये बांधली गेल्याचा दाखलाही ते देतात. इस्मायली शिया इस्लाम गुजरातमध्ये अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात आले. तुर्की, अफगाण, मुघल अशी आक्रमणे भारतावर होत गेली, परंतु त्याच बरोबर मुसलमान समाजाचे भारतीय महसुली व्यवस्था, वास्तुशास्त्र, व्यापारउदिम, पाककला अशा अनेक क्षेत्रांमध्ये मौलिक योगदान आहे याकडेही ते लक्ष वेधतात.

फाळणीचा ठपका भारतातील मुसलमानांवर ठेवला जातो, परंतु हे ते लोक आहेत, ज्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला व भारतासोबत राहिले हे विसरू नका असे खुर्शीद यांचे सांगणे आहे. धर्मावर आधारित देश टिकू शकतो या दाव्याचा फुगा बांगलादेश निर्मितीनंतर फुटला. फाळणीच्या वेळी भारतातील मुसलमानांचे नेतृत्व पाकिस्तानमध्ये गेले. येथे नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. मुसलमानांतून उभे राहणारे नेतृत्व जातीयवादी ठरते. या समाजाप्रती सरसकट भेदभाव, उपेक्षा व संस्थात्मक/वैचारिक भेदभाव केला गेल्याने मुसलमान दिवसेंदिवस कोशात जात आहेत असे खुर्शीद यांचे एकंदर प्रतिपादन आहे. इस्लाम बाबतच्या अनेक गैरसमजांचे निराकरण करण्याचा प्रयासही त्यांनी या लेखनातून केला आहे. उदाहरणार्थ – ‘फतवा’ हा खरे तर मुफ्तीने दिलेला कायदेशीर सल्ला असतो. त्याच्या शैक्षणिक, वैचारिक कुवतीनुसार तो दिलेला असतो. ‘फतवा’ बंधनकारक नसतो. तो पटला नाही तर दुसर्‍या मुफ्तीकडे जाता येते, अशी माहितीही इस्लामचा दांडगा व्यासंग असलेल्या खुर्शीद यांनी दिली आहे.

भारतामध्ये अधिकृत आकडेवारीनुसार १४.२ टक्के मुसलमान आहेत व भारत हा जगातील तीन मुस्लीमबहुल देशांपैकी एक आहे. बांगलादेश व इंडोनेशिया नंतर भारताचा क्रमांक लागतो अशी माहिती खुर्शीद यांनी दिली आहे. मध्य पूर्वेचे देश व उत्तर आफ्रिकेमध्ये मुसलमानांचे सर्वाधिक एकत्रीकरण झालेले आहे याकडेही ते लक्ष वेधतात. प्रेषित, कुराण, मुसलमानांतील सुन्नी, शिया भेद, सुन्नींमधील हनाफी, मलिकी, शैफी आदी पोटभेद, शिया, बोहरा, खोजा, अहमदिया वगैरे पंथ, सुफी परंपरा, भारता

तील संस्थात्मक इस्लाम या सगळ्याविषयी अतिशय मौलिक माहिती लेखकाने दिली आहे, ती ह्या पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढविते.

मात्र, त्यांच्या या सार्‍या लेखनामागे एक कॉंग्रेसी राजकीय नजर दिसते ही या लेखनाची मर्यादा म्हणता येईल. तिहेरी तलाकचा विषय मांडताना त्यांना त्या आडून सरकार समान नागरी कायदा आणू पाहात असल्याचे वाटते. मुसलमान समाजाने ‘धर्मनिरपेक्ष’ नेतृत्वाच्या मागे उभे राहिले पाहिजे असाही आग्रह ते धरतात, परंतु कॉंग्रेसच्या गेल्या निवडणुकीतील ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या पार्श्वभूमीवर ‘मुसलमानांच्या पाठबळाचे राजकीय भांडवल करीत आलेले राजकीय पक्षही आता त्यापासून ‘टॅक्टीकल रिट्रीट’ करीत आहेत असा टोला त्यांनी कॉंग्रेसचे नाव न घेता दणकून लगावलेला आहे!

दुसरे पुस्तक या आठवड्यात एक – दोन बैठकांत वाचून संपवले ते आहे रक्षंदा जलील यांचे ‘बट यू डोन्ट लूक लाइक अ मुस्लीम.’ आकर्षक नावासारखीच आकर्षक सहजसुंदर प्रसन्न शैली हे या पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्य. लघुनिबंध म्हणा वा वृत्तपत्रीय लेख म्हणा, ते छोटे छोटे आहेत, परंतु आपल्याकडे ‘कपियाळे’ शिवले जाते, तसे या सार्‍या लेखांच्या एकत्रीकरणातून भारतीय मुसलमानांचे अंतरंग दर्शन फार सुंदररीत्या लेखिकेने घडवलेले आहे. आपल्याला जे कोणी भेटते ते ‘तू मुसलमान वाटत नाहीस!’ हा शेरा लगावते; एखाद्या ‘कॉम्प्लीमेंट’ प्रमाणे हे वाक्य फेकले जाते असे लेखिका म्हणते. धर्माच्या बाबतीत अंतरातील श्रद्धेपेक्षा बाह्य गोष्टींना अधिक महत्व दिले जाते अशी लेखिकेची तक्रार आहे. बहुसंख्य हिंदू समाजाने मुसलमानांप्रतीची आपली नजर बदलण्याची गरज आहे आणि मुसलमान समुदायानेही कोशात न जाता अधिक एकात्म होण्याची व आधुनिक बनण्याची गरज आहे असे तिचे आग्रही प्रतिपादन आहे. काही लेख तर अतिशय धीटपणे आणि परखडपणे लिहिलेले आहेत. शाही इमामांच्या ‘फतवा पॉलिटिक्स’चा पंचनामा करायला त्या डरत नाहीत.

भारतीय मुसलमानांमधील भारतीयत्वाचे पैलू लेखिकेने सुंदररीत्या मांडले आहेत. त्यासाठी ती कधी लखनौच्या रामलीलेतील ऊर्दू संवादांच्या आठवणी जागवते, ‘राम ए हिंद’ बद्दल सांगताना ऊर्दू रामायणाचा, ऊर्दू भगवद्गीतेचा परिचय घडवते, अकबराच्या नवरत्नांपैकी अब्दुर रहीम खान ए खानमविषयी सांगते, अली अहमद सुरूर यांच्या फाळणीवरील कवितांमधली व्यथा मांडते, लोक, जागा, प्रसंग, घटना यांच्यावरील हे लेख एका उदात्त संमिश्र सांस्कृतिक वारशाचा मोठा पट आपल्यापुढे उलगडत जातात. हे पुस्तक म्हणजे ‘माझ्या घरी या. मी कोण आहे हे समजून घ्या, माझ्यासमवेत सण साजरे करा, घरच्या मेजवान्यांमध्ये सामील व्हा, माझ्यासोबत गतकाळाच्या आठवणी जागवत गप्पा मारा, प्रवास करा, माझ्या व्यथा वेदना जाणून घ्या, ह्या सगळ्यांतून माझ्याकडे चालत आलेला माझा सांस्कृतिक वारसा जाणून घ्या आणि हे करीत असतानाच माझ्या देशातील ही वैविध्यपूर्ण वारशाची रजई भेदभावकारक, जातीयवादी शक्तींकडून टराटरा फाडली जाताना दिसते तेव्हा अश्रूही ढाळा’ असे मर्मभेदी भावपूर्ण आवाहन लेखिका करते! हे पुस्तक वाचायला हवे ते यासाठीच.
हिंदू असोत वा मुसलमान, या दोन्ही पुस्तकांचे सार शायर सरशर सैलानीच्या शब्दांत सांगायचे तर –
‘‘चमन मे इख्तिलत ए रंगो बूसे बात बनती है |
हमही हम है तो क्या हम है, तुमही तूम हो तो क्या तुम हो!’’
– म्हणजे तुझ्या माझ्या रंग आणि गंधांनी मिळून तर ही बाग बनली आहे. तू वेगळा आणि मी वेगळा राहिलो तर तिला काय अर्थ राहील?