भारतीय महिला अंतिम फेरीत

0
226

>> आशिया चषक हॉकी

ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर भारतीय हॉकी महिला संघाने आपली विजयी घोडदौड चालू ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. काल झालेल्या उपांत्य लढतीत भारतीय महिलांनी गतविजेत्या जपानवर ४-२ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
आता अंतिम फेरीत भारतीय महिलांची गाठ चीनशी पडणार आहे. चीनने दक्षिण कोरियाला ३-२ असे पराभूत करीत अंतिम फेरीत गाठली आहे. भारताकडे आता चीनकडून २००९ साली मिळालेल्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी आहे. २००९साली बँकॉकमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात चीनने भारतीय महिलांना ५-३ असा पराभूत करीत जेतेपद प्राप्त केले होते. भारतीय महिला चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. तर २००४मध्ये जपनानचाच १-० असा निसटता पराभव करीत जेतेपद मिळविले होते. या स्पर्धेतील हे भारताचे एकमेव जेतेपद होय.

कझाकस्तानविरुद्धच्या उपांत्य लढतीत हॅट्‌ट्रिक नोंदविलेल्या गुरजीत कौरने आपली लय कायम राखताना पहिल्या क्वॉर्टरमध्ये ७व्याच मिनिटा गोल नोंदवित भारताचे खाते खोलले (१-०). लगेच ९व्या मिनिटाला आघाडीपटू नवजोत कौरने वंदना कटारियाकडून मिळालेल्या पासवर शानदार मैदानी गोल नांेंदवित भारताची आघाडी २-० अशी केली. लगेच गुरजीतने स्वतःचा दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवित भारताला ३-० अशा आघाडीवर नेले.

दुसर्‍या क्वार्टरमध्ये जपानने दमदार पुनरागमन करताना दोन गोल नोंदविले. १७व्या मिनिटाला शिहो सुजीने भारतीय गोलरक्षक सविताला चकवित पिछाडी ३-१ अशी भरून काढली. तर २८व्या मिनिटाला युई इशिबाशीने आणखी एक गोल करीत पिछाडी ३-२ अशी भरून काढत सामन्यात रंगत आणली. परंतु
सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला लालरेमसियमने भारताकडून चौथा गोल नोंदवत भारताच्या ४-२ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.