भारतीय महिलांनी थायलंडला तुडवले

0
73

>> ६६ धावांनी केली मात

>> हरमनप्रीत कौर सामनावीर

महिलांच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत काल सोमवारी भारताने थायलंडचा ६६ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने रविवारी मलेशियाला हरवून विजयी सलामी दिली होती. प्रथम फलंदाजी करताना १३२ धावा केलेल्या भारताने थायलंडचा डाव ८ बाद ६६ धावांवर रोखला.

भारताने काल सलामीवीर मिताली राजला विश्रांती दिली. मोना मेश्राम व स्मृती मंधाना यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. सलामीला बढती मिळाल्याचा फायदा मोनाला उठवता आला नाही. तिने कुर्मगती फलंदाजी करत ४५ चेंडूंत ३२ धावा जमवल्या. स्मृतीने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळताना २२ चेंडूंत २९ धावा कुटल्या. या द्वयीने पहिल्या गड्यासाठी ५३ धावा जोडल्या. वेदा कृष्णमूर्तीची अपयशी मालिका या सामन्यातही कायम राहिली. मागील आठ डावांतील केवळ दुसर्‍यांदा दोनअंकी धावा करताना तिने १४ चेंडूंत ११ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने १७ चेंडूंत नाबाद २७ धावा जमवताना अनुजा पाटीलसह ४९ धावांची भागीदारी रचली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडने चौथ्या षटकात आपला पहिला गडी गमावला.

नेरुएमोल चायवाय (१४) व नाताचा बूचाथाम (२१) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ३१ धावा करत भारतीय गोलंदांजाना काही षटके सतावले. दुसर्‍या गड्याच्या पतनानंतर मात्र थायलंडच्या उर्वरित खेळाडूंनी केवळ षटके खेळून काढण्यावर भर दिला. या बचावात्मक पवित्र्यानंतरही त्यांना गडी गमवावे लागले. भारताकडून हरमनप्रीत कौरने ३, दीप्ती शर्माने २ तर पूजा वस्राकर व पूनम यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला. भारताचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.