भारतीय चित्रपटसृष्टीच्या महानायकाची चरित्रकथा

0
196

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

पन्नास वर्षे जनमानसावर अधिराज्य करणे ही सोपी गोष्ट नाही. प्रेक्षक बदलला, त्याच्या आवडीनिवडी बदलल्या, चित्रपटांचे आशय व कथावस्तूही बदलत गेल्या, परंतु अमिताभने ही स्थित्यंतरेही पचवली आणि आजही त्याचा दरारा, त्याचा लौकीक कायम आहे. अमिताभ नावाची ही जी जादू आहे, तिच्यामागची गुपिते विश्वसनीयरीत्या जाणून घ्यायची असलील तर हे पुस्तक वाचण्याजोगे आणि त्याहून अधिक त्यातील दुर्मीळ छायाचित्रांमुळे पाहण्याजोगे आहे!

हिंदी चित्रपटसृष्टीमधील महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच त्यांच्या पन्नास वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत असताना उपस्थितांना, तुम्ही मला हा पुरस्कार देत आहात म्हणजे तुम्हाला मला निवृत्त तर करायचे नाही ना? असा मिश्कील सवाल खास आपल्या अलाहाबादी अस्सल ढंगदार हिंदीमध्ये करीत अमिताभ यांनी नेहमीप्रमाणे आपल्या नर्मविनोदाने रसिकांना जिंकले. अमिताभ या नावाचे गारुड भारतीय जनमानसावर गेली पन्नास वर्षे राहिले त्याला त्याच्यातील अभिनयगुणांबरोबरच त्याच्यातील ही तरल विनोदबुद्धी आणि त्याचे माणूसपणही नक्कीच योगदान देत राहिले आहे. गोव्यातील आपल्या पहिल्यावहिल्या फॅनशी मैत्रीचे नाते आजतागायत कायम राखलेला अमिताभ म्हणूनच आज या वयातही महानायकच राहिला आहे.

त्याच्या चित्रपट कारकिर्दीत चढउतार नक्कीच आले. कमालीचे अपयश, गंभीर आजारपण, जवळजवळ दिवाळखोरीकडे झालेली वाटचाल हे सगळे आघात पचवूनही राखेतून हा फिनिक्स पुन्हा उभा राहिला आणि कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून पुन्हा शिखरावरच्या आपल्या जागी पुन्हा जाऊन पोहोचला. अशा भारतातील घरोघरी परिचित असलेल्या आणि त्या सर्वांना आपला वाटणार्‍या अमिताभचे एक चरित्र नियोगी बुक्स या अतिशय दर्जेदार पुस्तके प्रकाशित करीत आलेल्या प्रकाशनसंस्थेने नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘अमिताभ बच्चन ः अ कॅलिडोस्कोप’ नावाचे हे चरित्र प्रदीप चंद्र आणि विकास चंद्र सिन्हा यांनी लिहिले आहे. या चरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे नुसते शाब्दिक चरित्र नाही. त्यामध्ये अमिताभच्या गेल्या पन्नास वर्षांतील चित्रपट कारकिर्दीचे टप्पे अधोरेखित करणारी असंख्य दुर्मीळ छायाचित्रेही आहेत. त्यामुळे एकीकडे शब्दांद्वारे अमिताभच्या कारकिर्दीचा वेध घेतानाच छायाचित्रे आणि ग्राफिक्सद्वारेही ती आपल्यासमोर उलगडण्याचा हा प्रयत्न अनोखा आहे.

अमिताभ या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ३६० अंशांनी घडविण्याचा हा प्रयत्न आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यासाठी त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार, चित्रपट समीक्षक, पत्रकार, चाहते अशा नानाविध व्यक्तींनी त्याच्याविषयी व्यक्त केलेल्या विचारांचेही संकलन यात लेखकांनी केलेले आहे. त्यामुळे त्यातून एक अभिनेता, सुपरस्टार, व्यावसायिक, राजकारणी, गायक, क्विझमास्टर व कुटुंबप्रमुख अशा विविध रूपांतील अमिताभ आपल्यापुढे जसाच्या तसा अवतरतो.

कॅलिडोस्कोप हा त्यातील कचकड्यांचे नाना दिशांनी नाना विभ्रम दाखवत असतो. जसे पहाल तसे एक नवेच रुप प्रत्ययाला येते. तसेच अमिताभचेही आहे. पिता हरिवंश राय बच्चन हे हिंदीतील प्रख्यात कवी. त्यांच्याकडून उत्तम भाषेचा वारसा आलेला, हरिवंश रायांचा आंतरजातीय विवाह. आई तेजी बच्चन एकेकाळची हौशी अभिनेत्री. तिच्याकडून अभिनयगुण उचललेले. त्यामुळे अमिताभ नावाचे एक परिपक्व रसायन घडले आणि त्याने भारतीयांना पाच दशके तासन्‌तास जागीच खिळवून ठेवले.
अमिताभचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ चा. त्याचे अमिताभ हे नावही वडिलांचे मित्र व प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांनी ठेवले. त्यांचे खरे आडनाव राय, परंतु हरिवंशराय यांनी कविता लिहिताना ‘बच्चन’ हे टोपणनाव लावायला सुरूवात केली आणि पुढे तेच कायम झाले, अशीही माहिती लेखक देतात.

अमिताभच्या कारकिर्दीची विविध पर्वे त्याच्याच चित्रपटांची अत्यंत समर्पक नावे देऊन लेखकांनी आपल्यापुढे उभी केलेली आहेत. अलाहाबादेच जन्मलेला, नैनिताल आणि दिल्लीत शिकलेला आणि कोलकत्त्याला कॉर्पोरेट जगतात नोकरीसाठी गेलेला अमिताभ चित्रपटसृष्टीचा महानायक बनेल असे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल, परंतु त्याचा बंधू अजिताभ याने त्याची छायाचित्रे निर्माते के. ए. अब्बास यांना पाठवली आणि त्यातूनच अमिताभला ‘सात हिंदुस्थानी’ मध्ये घेण्यात आले असे लेखक सांगतो.
‘सात हिंदुस्थानी’ ह्या गोवा मुक्तिसंग्रामावरील चित्रपटामध्ये पत्रकाराच्या भूमिकेतील सत्याग्रहीच्या रूपात हा लंबुटांग अभिनेता आपल्यासमोर आला आणि ७३ सालच्या प्रकाश मेहरांच्या ‘जंजीर’ पासून त्याची अँग्री यंग मॅनची प्रतिमा घडत गेली. बघता बघता राजेश खन्नाला पिछाडीला टाकत अमिताभ ऐंशीच्या दशकात शिखरावर जाऊन पोहोचला. मात्र ८२ साली ‘कुली’च्या सेटवर पुनीत इस्सारची लाथ पोटात बसलेल्या अमिताभला प्राणांतिक जखमा झाल्या. चित्रपट कारकिर्दच काय, आयुष्याचाच अंत होतो की काय अशी परिस्थिती उभी राहिली. बरे झाल्यावर मित्र राजीव गांधींच्या आग्रहास्तव अमिताभ राजकारणातही उतरला, परंतु बोफोर्स प्रकरणात त्याचे नाव गोवले गेले आणि राजकारण हा आपला प्रांत नव्हे याची जाणीव झालेल्या अमिताभने त्यातून माघारही घेतली. पत्नी जया बच्चन मात्र आजही समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राज्यसभा सदस्य आहेत. त्या जबलपूरच्या. मूळच्या जया भादुरी. भोपाळमध्ये शिक्षण झालेल्या जयांना ह्रषिकेश मुखर्जींच्या ‘गुड्डी’ मध्ये अमिताभ सोबत काम करायची संधी मिळाली, परंतु त्या चित्रपटातून नंतर अमिताभला वगळले गेले, परंतु दोघांतील भावबंध कायम राहिले. ‘गुड्डी’चे चित्रीकरण संपले त्याच्या दुसर्‍याच दिवशी दोघांचा विवाह झाला. अमिताभ त्या चित्रपटासाठी शिवलेल्या शेरवानीतच लग्नाला उभा राहिला अशीही आठवण लेखकाने सांगितली आहे.

अमिताभच्या आयुष्यात मध्यंतरी आलेल्या रेखा नावाच्या वादळाविषयीही लेखकाने सविस्तर लिहिले आहे. ‘दुनिया का मेला’ चित्रपटाच्या सेटवर रेखा आणि अमिताभची पहिली भेट झाली. नंतर अमिताभ ऐवजी त्या चित्रपटात संजय खानला घेतले गेले. ‘नमकहराम’ मध्ये रेखा राजेश खन्नाची नायिका होती, परंतु नंतरच्या ‘दो अंजाने’ मध्ये अमिताभची नायिका म्हणून तिला स्थान मिळाले. तेव्हापासून अमिताभशी तिचे नाव जोडलेले राहिले आहे.

‘कुली’चा अपघात घडला तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते, परंतु पत्नी जयाने त्याच्या पायातली हालचाल पाहून डॉक्टरांना सतर्क केले आणि त्याचा पुनर्जन्म झाला असे लेखक नमूद करतो.
९० च्या दशकात अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. दिवाळखोरीत गेले. त्यानंतर जवळजवळ खंक झालेल्या अमिताभला ‘कौन बनेगा करोडपती’ चा दोर मिळाला आणि त्याने बघता बघता आपण गमावलेली कीर्ती पुन्हा प्रस्थापित केली. पुनरागमनानंतर आलेले त्याचे वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या विषयांवरचे चित्रपट त्याच्यातील अस्सल अभिनयगुणांवर शिक्कामोर्तब करून गेले. अमिताभचा आवाज देखील आज घरोघरी परिचयाचा आहे. एकेकाळी त्याच्यावर कॉमिक बुक देखील निघाले. अनेक संकटे आली, तरी ‘देशाचा सर्वांत विश्वसनीय चेहरा’ अशी स्वतःची ओळख अमिताभने बनवली आहे.

पन्नास वर्षे जनमानसावर अधिराज्य करणे ही सोपी गोष्ट नाही. प्रेक्षक बदलला, त्याच्या आवडीनिवडी बदलल्या, चित्रपटांचे आशय व कथावस्तूही बदलत गेल्या, परंतु अमिताभने ही स्थित्यंतरेही पचवली आणि आजही त्याचा दरारा, त्याचा लौकीक कायम आहे. अमिताभ नावाची ही जी जादू आहे, तिच्यामागची गुपिते विश्वसनीयरीत्या जाणून घ्यायची असलील तर हे पुस्तक वाचण्याजोगे आणि त्याहून अधिक त्यातील दुर्मीळ छायाचित्रांमुळे पाहण्याजोगे आहे!