भारतीयांकडे संपत्ती किती?

0
763

– शशांक मो. गुळगुळे
आपण नेहमी भारत देशाच्या आकडेवारीचा विचार करतो. अर्थात, भारत देशाच्या आकडेवारीत भारतीय नागरिकांची संपत्ती समाविष्ट असतेच. पण या लेखात आपण फक्त भारताचे जे १२० ते १२५ कोटी नागरिक आहेत त्यांची एकूण मिळून वैयक्तिक संपत्ती किती आहे ते पाहणार आहोत.
भारतीयांकडे वित्तीय मालमत्ता १३४.७१ लाख कोटी रुपयांची आहे, तर फिजिकल मालमत्ता (म्हणजे स्थिर संपत्ती घर वगैरे, सोने, हिरे, चांदी, प्लॅटिनम इत्यादी इत्यादी) १२२.७० लाख कोटी रुपयांची आहे. म्हणजे २०१४ मध्ये भारतात एकूण वैयक्तिक संपत्ती २५७.४२ लाख कोटी रुपयांची आहे व २०१३ वर्षाच्या तुलनेत त्यात २७.४७ टक्के वाढ झाली आहे. भारतीय नागरिकांकडे एकूण संपत्तीच्या ५३.३३ टक्के वित्तीय मालमत्ता आहे, तर ४७.६७ टक्के फिजिकल मालमत्ता आहे.भारतीय नागरिकांकडे वित्तीय मालमत्ता स्वरूपात असलेल्या संपत्तीत गेल्या ५ वर्षांत ८४ टक्के वाढ झाली आहे. भारतीयांची व्यक्तिगत संपत्ती वार्षिक १४.९ दराने वाढण्याची व येत्या ५ वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज ‘कार्वी प्रायव्हेट वेल्थ’ने त्यांच्या ‘इंडिया वेल्थ रिपोर्ट २०१४’मध्ये वर्तविली आहे. भारतीय व्यक्तींकडील वित्तीय मालमत्तांमधील संपत्ती येत्या ४ वर्षांत दुप्पट होणार व यात वार्षिक १८.३ टक्के दराने वाढ होणार असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भौतिक मालमत्तांमधील संपत्ती येत्या ५ वर्षांत वार्षिक १० टक्के वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी व ही जगातील झपाट्याने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्यासाठी विद्यमान केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. परिणामी २०१८ पर्यंत अर्थव्यवस्था ७.५ टक्के जीडीपी दरापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०१५ मध्ये मुदतठेवींना मागे टाकत इक्विटी हा भारतातील व्यक्तिगत संपत्तीमध्ये योगदान देणारा सर्वात मोठा संपत्तीवर्ग बनेल व त्याचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. इक्विटी मार्केटमध्ये वार्षिक २५ टक्के वाढ अपेक्षित आहे व २०२० पर्यंत सेन्सेक्स १ लाख अंशांच्या पातळीपर्यंत झेप घेण्याचा अंदाज आहे.
भारतीयांकडे जी १३४.७१ लाख कोटी रुपयांची वित्तीय मालमत्ता आहे तिचे वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांत असणारे प्रमाण खालीलप्रमाणे आहे-
वित्तीय मालमत्तेचा एकूण रक्कम गुंतवणुकीची एकूण
प्रकार (कोटी रुपयांत) गुंतवणुकीशी टक्केवारी
मुदत ठेवी व बॉण्ड्‌स २९,३९,७०२ २१.८२ टक्के
शेअरमध्ये थेट २६,६६,२०२ १९.७९ टक्के
गुंतवणूक
विमा २२,५२,६५४ १६.४३ टक्के
बचत ठेवी १६,२८,६२८ १२.०९ टक्के
रोख रक्कम १३,००,९०० ०९.६६ टक्के
भविष्य निर्वाह निधी ७,३६,०९६ ०७.४६ टक्के
एनआरआय ठेवी ६,२२,३३७ ०४.६२ टक्के
छोट्या ठेवी ५,७८,८५१ ०४.३० टक्के
म्युच्युअल फंड ३,९३,१४० ०२.९२ टक्के
योजना
चालू ठेवी ३,०८,१२५ ०२.२९ टक्के
पेन्शन फन्ड्‌स ४८,१३६ ०.३६ टक्के
पर्यायी मालमत्ता २३,७२७ ०.१८ टक्के
आंतरराष्ट्रीय १२,६५९ ०.०९ टक्के
वित्तीय मालमत्ता
एकूण १,३४,७१,१६० १०० टक्के
या तक्त्यावरून लक्षात येते की भारतीयांना मुदत ठेवींत आपली संपत्ती गुंतविण्यात अधिक स्वारस्य आहे.
फिजिकल मालमत्ता जी भारतीयांकडे १२२.७० लाख कोटी रुपयांची आहे, तिचे पृथःक्करण खालीलप्रमाणे-
मालमत्तेचा मालमत्ता रुपयांत एकूण संपत्तीशी
प्रकार (करोड रुपये) टक्केवारी
सोने ६२,५२,२६३ ५०,९६ टक्के
स्थिर संपत्ती ५०,३८,९७८ ४१.०० टक्के
हिरे ७,७७,०८४ ६.३३ टक्के
चांदी १,०५,४९८ १.५९ टक्के
प्लॅटिनम ५,६७८ ०.०५ टक्के
एकूण १,२२,७०,५०१ १०० टक्के
वरील तक्त्यावरून हे दिसून येते की, भारतीयांकडे वैयक्तिकरीत्या ६२ लाख ५३ हजार २६३ लाख कोटी रुपयांचे सोने आहे. भारतीयांना सोन्याबद्दल किती आसक्ती आहे हे यावरून सिद्ध होते.
भारतीयांकडे ३३ लाख ७६ हजार २१६ लाख कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. यामुळे मुंबई शेअर बाजार आज जगातील एक मोठा शेअर बाजार समजला जातो. डेटमध्ये यात रोख रक्कमही समाविष्ट आहे. भारतीय नागरिकांकडे १ कोटी ५८ लाख ७७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोने व हिरे यांची ७२ लाख ६७ हजार ९१० कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर रिअल इस्टेटमध्ये ५० लाख ३८ हजार ९७७ कोटी रुपयांची संपत्ती भारतीयांकडे आहे.
या अफाट भारत देशात भारतीय सार्वत्रिक बँकांच्या ठेवींत आपली संपत्ती ठेवण्यास प्राधान्य देतात. सर्व शेड्युल्ड बँकांत भारतीयांची ठेवींच्या स्वरूपात ७९.५३ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १४.५८ टक्के वाढ झाली आहे. शेड्युल्ड कमर्शियल बँकांत ७७.३९ लाख कोटी रुपयांची संपत्ती असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १४.६५ टक्के वाढ झाली आहे. फक्त मुदतठेवींची भारतीयांकडे २७.९१ लाख कोटी रुपयांची संपत्ती असून, यात २०१३ या वर्षाच्या तुलनेत १७.१४ टक्के वाढ झाली आहे. कंपन्यांच्या मुदत ठेवींत भारतीयांची ६७ हजार ६७६ कोटी रुपयांची गुंतवणूक असून या संपत्तीत २०१३ च्या तुलनेत २८.२ टक्के घट झाली आहे. नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या ठेवींत भारतीयांची १२,८३१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. २०१४ मध्ये भांडवली बाजारपेठेत ३५ पब्लिक इश्यू आले होते, तर २०१३ मध्ये यांचे प्रमाण २० इतके होते. त्यामुळे भारतीयांना इथेही आपली संपत्ती वळविण्याची संधी मिळाली.
बॉण्ड्‌स व कर्जरोख्यांत भारतीय नागरिकांची ६७ हजार ९३८ कोटी रुपयांची संपत्ती असून २०१३ च्या तुलनेत या संपत्तीत ६६.४१ टक्के वाढ झाली आहे. सार्वजनिक उद्योगातील बॉण्ड्‌समध्ये वैयक्तिक भारतीयांचे ६४ हजार ३०० कोटी रुपये आहेत, तर कॉर्पोरेट बॉण्ड्‌समध्ये १३ हजार, ६३७ कोटी रुपये आहेत. अनिवासी भारतीयांची शेअर बाजारात ४५ हजार १२९ कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती असून भारतीयांची १२ लाख ७० हजार ९६९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. जीवन विम्यात भारतीयांची २० लाख ६ हजार ८६७ कोटी रुपयांची संपत्ती असून कर्मचारी पेन्शन निधीत १ लाख ९२ हजार १०२ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, तर कर्मचारी ठेव संलग्नित इन्शुरन्स फंडात वैयक्तिक भारतीयांची १२ हजार ६८४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ३१ मार्च २०१४ रोजी बँकांच्या बचत खात्यात भारतीयांचे १६.२८ लाख कोटी रुपये होते, तर चालू खात्यात ३.०८ लाख कोटी रुपये होते.
दक्षिण भारतीयांची बँकांत २४ टक्के संपत्ती आहे, उत्तर भारतीयांची २२ टक्के, मध्य विभागात राहणार्‍या भारतीयांची १५ टक्के, पूर्व भारतात राहणार्‍यांची १४ टक्के, पश्‍चिम भारतात राहणार्‍यांची २३ टक्के तर ईशान्य भारतात राहणार्‍यांची फक्त २ टक्के संपत्ती आहे. यावरून हे लक्षात येते की ईशान्य भारतात जी सात राज्ये आहेत, त्यांच्या विकासाकरिता किंवा तेथील नागरिकांच्या विकासाकरिता आतापर्यंत आपल्या सरकारने हवे तेवढे लक्ष दिलेले नाही. विद्यमान सरकारने मात्र ईशान्य भारत विकसित करण्याचे ध्येय बाळगलेले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येणे गरजेचे आहे. भारतीयांकडे वैयक्तिक १३ लाख ९०० कोटी रुपयांची रोकड संपत्तीच्या स्वरूपात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत ४ लाख ७४ हजार ४४६ कोटी रुपये, पोस्ट ऑफिसमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत ४७ हजार ६३३ कोटी रुपये, तर बँकांकडील भविष्य निर्वाह निधी योजनेत २ लाख १४ हजार १७ कोटी रुपये इतकी भारतीयांची संपत्ती आहे. अनिवासी भारतीयांची भारतीय बँकांत ६ लाख २२ हजार ३३७ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
छोट्या ठेवी
छोट्या ठेवीचा प्रकार यात असलेली संपत्ती भारतीयांची वैयक्तिक मार्च २०१४ अखेर (कोटी रुपयांत)
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना २,०४,५४०
किसान विकास पत्र १,०८,२६६
पोस्ट ऑफिस रिकरिंग ठेव योजना ८२,६६३
एनएससी ७४,३९६
पोस्ट ऑफिस मुदत ठेवी ३९,७३९
पोस्ट ऑफिस बचत खाती ३९,११२
वरिष्ठ नागरिक बचत योजना १९,४५२
इतर प्रमाणपत्रे ५,२५७
राष्ट्रीय बचत योजना ८७, ९२ ४,५३३
इंदिरा विकास पत्र ८९५
एकूण ५,७८,८५१
म्युच्युअल फंड योजनांत भारतीयांची वैयक्तिक ३ लाख ९३ हजार १४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या पेन्शन फंड योजनांत ५८.५९ लाख भारतीयांची ४८ हजार १३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पर्यायी मालमत्तेत भारतीयांची २३ हजार ७२७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. रिअल इस्टेटमध्ये ६,१६२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. हा आकडा तसा फसवा असू शकतो, कारण रिअल इस्टेट व सिनेमा निर्मितीत फार मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांचे व्यवहार चालतात असे भारतातील बर्‍याच अर्थतज्ज्ञांचे मत आहे. खाजगी इक्विटी फंडात भारतीयांची ५,२७९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात २८.२२ टक्के वाढ झाली आहे. गोल्ड ईटीएफमध्ये ४,४४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात २०१३ च्या तुलनेत १६ टक्के घट झाली त्यावेळी यातील संपत्तीचे प्रमाण ५,२८९ कोटी रुपये होते. रिअल इस्टेट फंड्‌समध्ये वैयक्तिक भारतीयांची ३,७९० कोटी रुपयांची संपत्ती आहे. पायाभूत फंड्‌स योजनांत भारतीयांच्या संपत्तीचे प्रमाण १२१ कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
परदेशांत वैयक्तिक भारतीयांची १२ हजार ६५९ कोटी रुपयांची अधिकृत संपत्ती आहे. स्विस बँकेबाबत गेले काही महिने जो नुसता शाब्दिक गदारोळ चालू आहे, ती अंदाजित रक्कम यात समाविष्ट नाही. भारतीयांच्या घरोघरी मार्च २०१४ पर्यंत २०,९६३ टन सोने होते. याचे मूल्य सुमारे ६२.५ लाख कोटी रुपये होते. भारतीयांची परदेशातील स्थिर संपत्तीत म्हणजे रिअल इस्टेटमध्ये २,५०७ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. भारतात ५० लाख ३६ हजार ४७० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. कार्वी प्रायव्हेट वेल्थचा इंडिया वेल्थ रिपोर्ट २०१४ भारतीयांकडे बर्‍यापैकी संपत्ती असून, भारतीय चांगले जीवन जगत आहेत हे दर्शविणारा आहे. पण देशात जर नजर टाकली तर गरिबीचे चटके झेलणारे व काहीच संपत्ती नसलेलेही बरेच भारतीय आहेत.