भारतासाठी सोपा ‘ड्रॉ’

0
230

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन संघाला सोपा ‘ड्रॉ’ लाभला आहे. काल मंगळवारी जाहीर ‘ड्रॉ’नुसार भारताचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात पाकिस्तान, स्कॉटलंड व श्रीलंका हे देश आहेत.
या ड्रॉमुळे भारताचा बाद फेरीतील प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. मागील वेळी भारताने बॅडमिंटनमध्ये १ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्यपदकांसह एकूण ४ पदके पटकावली होती. पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप विजेता ठरला होता.

स्पर्धेसाठी १६ देशांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक देश आपल्या गटातील इतर तीन देशांविरुद्ध पहिल्या दोन दिवसांत खेळणार आहे. कॅरारा स्पोटर्‌‌स व लिजर सेंटर या केंद्रांवर हे सामने होतील. पदकाचा प्रबळ दावेदार असलेला मलेशिया, कॅनडा, सिशिलिस व घाना यांना ‘ड’ गटात ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व युगांडा हे देश ‘क’ गटात आहेत तर ‘ब’ गटात सिंगापूर, मॉरिशियस, झांबिया व जमैका यांचा समावेश आहे. मिश्र सांघिक प्रकारात पुरुष व महिला दुहेरीचा प्रत्येकी एक सामना तसेच पुरुष, महिला व मिश्र दुहेरीचा प्रत्येकी एक सामना होणार आहे. प्रत्येक गटातील दोन आघाडीचे संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. ५ एप्रिल रोजी स्पर्धेला सुरुवात होणार असून ९ रोजी पदकांसाठीचे सामने होतील. यानंतर पुढील सहा दिवस वैयक्तिक प्रकारातील सामने होतील व १४ व १५ रोजी पदके निश्‍चित होतील.