भारताचे विंडीजसमोर २८० धावांचे आव्हान

0
108

>> श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी

>> विराट कोहलीने ठोकले ४२वे एकदिवसीय शतक

विराट कोहलीने लगावलेले ४२वे एकदिवसीय शतक तसेच श्रेयस अय्यरच्या समयोचित अर्धशतकाच्या बळावर भारताने दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी विंडीजसमोर २८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनाची अपयशाची मालिका या सामन्यातही सुरूच राहिली. केवळ दोन धावा करून त्याने तंबूची वाट धरली. वेस्ट इंडीजने चतुराईने ‘डीआरएस’चा वापर करत पंचांना आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले. रोहित शर्मा चाचपडत खेळला. डावातील सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पहिली धाव घेतलेल्या रोहितला खेळपट्टीशी जुळवून घेता आले नाही. धावा जमविण्यासाठी संघर्ष केल्यानंतर ३४ चेंडूंत १८ धावा करत त्याने आपली विकेट ऑफस्पिनर चेजला बहाल केली. ऋषभ पंतला आपल्या अननुभवीपणाची झलक पुन्हा एकदा दाखवली. विंडीजच्या गोलंदाजांनी शरीरवेधी गोलंदाजी करत त्याची कमकुवत बाजू हेरली. सातत्याने निर्धाव चेंडू खेळल्यानंतर दबाव वाढल्याने ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याचा त्रिफळा उडाला. विराट व श्रेयस यांनी चौथ्या गड्यासाठी १२५ धावांची भागीदारी केली. आपला सहावा वनडे डाव खेळताना अय्यरने तिसर्‍यांदा अर्धशतकी वेस ओलांडताना विंडीज गोलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. दुसर्‍या टोकाने कर्णधार कोहलीने एकेरी-दुहेरी धावांबरोबरच १४ चौकार ठोकत आपली शतकी खेळी सजवली. डावातील ४३वे षटक सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने काहीवेळ खेळ थांबविण्यात आला. परंतु, लगेचच कडक उन पडल्याने जास्त वेळ वाया गेला नाही. हाणामारीच्या षटकांत वेगाने धावा जमविण्याच्या नादात अय्यर, कोहली, जाधव बाद झाले.

रवींद्र जडेजा १६ व मोहम्मद शमी ३ धावा करून नाबाद राहिला. वेस्ट इंडीजकडून कार्लोस ब्रेथवेट सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ५३ धावा मोजून ३ गडी बाद केले. कामचलाऊ फिरकीपटू चेज याने आपल्या १० षटकांत केवळ ३७ धावा देत रोहित शर्माच्या रुपात महत्त्वाचा बळी घेतला. केवळ मध्यमगती गोलंदाजांच्या फौज घेऊन उतरलेल्या विंडीजला या सामन्यात दर्जेदार फिरकीपटूची उणीव जाणवली.
अर्ध्यावरच रद्द करावा लागलेल्या पहिल्या सामन्यात खेळविलेला संघच भारताने या सामन्यातही खेळविला तर विंडीजने डावखुरा फिरकीपटू फॅबियन एलनच्या जागी वेगवान गोलंदाज ओशेन थॉमस याला संधी दिली. परंतु, भारतीय फलंदाजांनी त्याला लक्ष्य केल्याने केवळ चार षटकानंतर त्याची गोलंदाजी बंद करावी लागली.

ख्रिस गेलचे त्रिशतक
वेस्ट इंडीजचा सलमीवीर ख्रिस गेल याचा हा ३००वा एकदिवसीय सामना ठरला. वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांचा विक्रम यापूर्वी ब्रायन लारा याच्या नावावर होता. लाराने २९९ सामने खेळले आहेत.

धावफलक
भारत ः शिखर धवन पायचीत गो. कॉटरेल २, रोहित शर्मा झे. पूरन गो. चेज १८, विराट कोहली झे. रोच गो. ब्रेथवेट १२०, ऋषभ पंत त्रि. गो. ब्रेथवेट २०, श्रेयस अय्यर त्रि. गो. होल्डर ७१, केदार जाधव धावबाद १६, रवींद्र जडेजा नाबाद १६, भुवनेश्‍वर कुमार झे. रोच गो. ब्रेथवेट १, मोहम्मद शमी नाबाद ३, अवांतर १२, एकूण ५० षटकांत ७ बाद २७९
गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल १०-०-४९-१, किमार रोच ७-०-५४-०, जेसन होल्डर ९-०-५३-१, ओशेन थॉमस ४-०-३२-०, रॉस्टन चेज १०-१-३७-१, कार्लोस ब्रेथवेट १०-०-५३-३

दोन हजारी कोहली
भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यांत दोन हजारांहून जास्त धावा करणारा कोहली हा पहिला खेळाडू ठरला. कोहलीच्या नावावर ३५ सामन्यांत २०३२ धावांची नोंद आहे. १५७३ धावांसह सचिन तेंडुलकर दुसर्‍या तर १३५७ धावांसह डेस्मंड हेन्स तिसर्‍या क्रमांकावर आहे.

२६ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम
वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पाकिस्तानच्या जावेद मियांदाद याचा २६ वर्षांपूर्वीचा विक्रम काल विराटने मोडला. मियांदाद याने ६४ डावांत १९३० धावा केल्या होत्या. कोहलीने केवळ ३० डावांत हा विक्रम मोडला.

विराटने टाकले गांगुलीला मागे
विराटने काल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकत एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा दुसरा सर्वांत यशस्वी फलंदाज होण्याचा मान मिळविला. विंडीजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातील ३२व्या षटकात जेसन होल्डरला चौकार ठोकत विराटने गांगुलीला तिसर्‍या क्रमांकावर ढकलले. कोहलीच्या नावावर २३८ सामन्यांतील २२९ डावांत ११४०६ धावा झाल्या आहेत. गांगुलीने ३११ सामन्यांत ११३६३ धावा केल्या आहेत. जॅक कॅलिस (११५७९) याला मागे टाकणे हे कोहलीचे पुढील लक्ष्य असेल.