भारताचे तैवानवर पाच गोल

0
93

इंटरकॉंटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेत काल भारतीय फुटबॉल संघाने मोठा विडय साकारताना तैवानचा (चायनीज तैपेई) ५-० असा पराभव केला. मुंबई फुटबॉल एरिनावर शुक्रवारी हा सामना खेळविण्यात आला.
भारताकडून कर्णधार सुनील छेत्री याने १४व्या, ३४व्या व ६२व्या मिनिटाला गोल नोंदविले. उदांता सिंग याने ४८व्या व प्रणॉय हल्दर याने ७८व्या मिनिटाला गोलजाळीचा वेध घेतला. भारतीय संघ कालच्या सामन्यात ४-२-३-१ व्यूहरचनेसह उतरला.

प्रशिक्षक स्टीफन कॉसस्टंटाईन यांनी सुभाशिष बोस याला पदार्पणाची संधी दिली. भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले. जेजे लालपेखलुआ याने मधल्या फळीतून दिलेल्या पासवर विंगर उदांता सिंग याने उजव्या बगलेतून जोरदार चढाई करत कर्णधार सुनील छेत्रीला चेंडू पास दिला. परंतु, छेत्राचा फटका दिशाहीन ठरला. १४व्या मिनिटाला छेत्रीने याची भरपाई केली. चेन्नईनचा स्ट्रायकर जेजेच्या पासवर भारतीय कर्णधाराने तैवानचा गोलरक्षक वेन चिए याला हुलकावणी देत भारताला आघाडीवर नेले. यानंतर सहा मिनिटांनी छेत्रीला आघाडी दुप्पट करण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. १८ यार्ड बॉक्समध्ये जेजेने सुरेख पास दिल्यानंतर छेत्रीचा गोल थोडक्यात हुकला.

छेत्री व जेजे यांच्या जोडीने संयुक्तपणे रचलेल्या चालीवर भारताला दुसरा गोल नोंदविता आला. चेन्नईन एफसीच्या थापा व जेजे यांनी बॉक्सच्या कोपर्‍यावरून छेत्रीला पास दिल्यानंतर छेत्रीने एकदम कठीण कोनातून चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली. दुसर्‍या सत्रात उदांता सिंगने सुरेख पदलालित्याचे दर्शन घडवत भारताचा तिसरा गोल झळकावला. एका तासाचा खेळ पूर्ण झालेला असताना शॉर्ट कॉर्नरवर थापा याने दिलेल्या पासवर छेत्रीने भारताचा चौथा व स्वतःचा तिसरा गोल केला. ७८व्या मिनिटाला हल्दरने आपल्या वेगवान फटक्याच्या बळावर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला सहज चकवा देत भारताचा विशाल विजय साकार केला. चार देशांच्या या स्पर्धेत ४ जून रोजी भारत आपला पुढील सामना केनियाविरुद्ध खेळणार आहे.