भारताचे चीनवर चार गोल

0
108

भारतीय महिला संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेतील काल सोमवारी झालेल्या लढतीत चीन संघाला ४-१ असे लोळविले. भारताकडून गुरजीत कौर (१९वे मिनिट), नवज्योत कौर (३२वे मिनिट), नेहा गोयल (४९वे मिनिट) व कर्णधार राणी रामपाल (५८वे मिनिट) यांनी गोल केले. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात भारताने सिंगापूरचा १०-० असा फडशा पाडला होता. पहिल्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नर लाभला. परंतु, या संधीचा लाभ उठविण्यात भारतीय संघ कमी पडला. दुसर्‍या सत्राच्या पहिल्या चार मिनिटातच भारताचे आपले खातेउघडले. ड्रॅगफ्लिक स्पेशलिस्ट गुरजीत कौरने हा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने ही आघाडी टिकवून ठेवली. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी नवज्योत कौरने सुरेख मैदानी गोल लगावत आघाडी दुप्पट केली. ३८व्या मिनिटाला सर्कलमध्ये बचावफळीकडून झालेल्या चुकीमुळे चीन संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा फायदा घेत क्विझिया कुई हिने गोल नोंदविला. भारतीय आघाडीपटूंनी चीनच्या बचावफळीला भेदताना तिसरा गोल केला. शेवटच्या दहा मिनिटांत भारताला दोन व चीनला एक पेनल्टी कॉर्नरचा लाभ झाला. परंतु, उभय संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. या दरम्यान ५८व्या मिनिटाला राणीने भारताचा चौथा गोल झळकावला. आज भारत आपला शेवटचा गट सामना मलेशियाविरुद्ध खेळणार आहे.