भारताचे इंग्लंडसमोर १४९ धावांचे लक्ष्य

0
115

कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने कार्डिफमध्ये खेळविण्यात येत असलेल्या दुसर्‍या टी-२० लढतीत ५ गडी गमावत इंग्लंडसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठवेले आहेे.

भारतीय संघाने या सामन्यासाठी कोणताही बदल केला नाही. तर इंग्लंडने गेल्या सामन्यात काहीसा महागडा ठरलेल्या मोईन अलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णधार ईयॉन मॉर्गेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरविता टिच्चून मारा करीत प्रारंभीच यश मिळविले. भारताची सुरुवातही एकदम खराब झाली. काहीसा अडखळत सुरुवात केलेला रोहित शर्मा (५) जेक बॉलचा एक आखुड टप्प्याचा चेंडू उचलून मारण्याच्या प्रयत्नात जोस बटलरकडे झेल देऊन परतला. डावखुरा फलंदाज शिखर धवन (१०) एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इयॉन मॉर्गेनच्या अचूक फेकीवर धावचित होऊन परतला. तर पहिल्या सामन्यातील शतकवीर लोकेश राहुल आज अपयशी ठरला. केवळ ७ धावा जोडून तो लियाम प्लंकेटच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होऊन तंबूत परतल्याने भारताची स्थिती पाच षटकांतच ३ बाद २२ अशी झाली होती.

परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार विराट कोहलीने डावखुर्‍या सुरेश रैनाच्या साथीत डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची अर्धशतकी भागीदारी करीत संघाला सुस्थितीत नेले. ही जोडी जमलेली असताना सुरेश रैना (२७) आदिल रशिदला पुढे येऊन मारण्याच्या नादात फसला आणि यष्टिचित होऊन परतला. विराट कोहलीने २ चौकार व १ षट्‌कारांसह सर्वाधिक ४७ धावा जोडल्या. कोहली परतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी व हार्दिक पंड्याने सहाव्या विकेटसाठी ३७ धावांची अविभक्त भागीदारी करीत संघाला ५ बाद १४८ अशी धावसंख्या उभारून दिली. धोनी ५ चौकारांच्या सहाय्याने २४ चेंडूत ३२ तर पंड्या १२ धावा करून नाबाद राहिला. धोनीचा हा ५००वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ४६४ तर राहुल द्रविडने ५०९ सामने खेळले आहेत.