भारताचे अव्वलस्थान अधिक भक्कम

0
100

>> आयसीसी कसोटी क्रमवारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसर्‍या तर ऑस्ट्रेलिया संघ तिसर्‍या स्थानी आहे.
कालची क्रमवारी जाहीर करताना २०१४-१५ वर्षातील कामगिरी विचारात घेण्यात आलेली नाही. २०१५-१६ व २०१६-१७ मधील कामगिरीला ५० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेवरील गुणांची आघाडी १३ पर्यंत वाढवली आहे. २०१४-१५ मोसमात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ०-२ असा व यानंतर इंग्लंडकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर भारताने ३ विजय (२०१५-१६), २ विजय (२०१६), १० विजय (२०१६-१७), ३ विजय (२०१७) व २ विजय (२०१७-१८) अशी कामगिरी केल्याने भारताचे गुण वाढणे अपेक्षित होते.

भारताचे १२५ गुण झाले असून पाच गुण गमवावे लागल्याने द. आफ्रिकेचा संघ ११२ गुणांवर आहे. चार गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाने आपली गुणसंख्या १०६ केली आहे. त्यांनी न्यूझीलंडला (१०२ गुण) मागे ढकलले आहे. एक अतिरिक्त गुण मिळवत इंग्लंडचा (९८ गुण) संघ पाचव्या स्थानी आहे. बांगलादेशने वेस्ट इंडीजला मागे टाकून आठवा क्रमांक मिळविला आहे. बांगलादेशच्या खात्यात ७५ गुण आहे. त्यांनी चार गुण कमावले आहेत. पाच गुणांचा तोटा सहन करावा लागलेल्या विंडीजच्या खात्यात ६७ गुण आहेत. दहाव्या स्थानी असलेल्या झिंबाब्वेने १ गुण कमावून आपली गुणसंख्या २ केली आहे. एक गुण गमवावा लागलेल्या श्रीलंकेचा संघ ९४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा संघ भारताविरुद्ध बंगळुरू येथे १४ ते १८ जून या कालावधीत तसेच आयर्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध ११ ते १५ मे या कालावधीत कसोटी सामना खेळल्यानंतर या यादीत स्थान मिळविणार आहे.