भारताची हॉंगकॉंगवर मात

0
112

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूच्या धमाकेदार कामगिरीमुळे काल मंगळवारी भारताने आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हॉंगकॉंगवर ३-२ असा थरारक विजय मिळविला. सायनाने माघार घेतल्यामुळे सिंधूवरील जबाबदारी वाढली होती. सिंधूने सर्वप्रथम एकेरीतील सामना जिंकला व यानंतर एन.सिक्की रेड्डीसह दुहेरीतील सामना जिंकून भारताचा विजय साकारला. इंडिया ओपनच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरताना सिंधूने काल महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात यिप पुई यिन हिच्यावर २१-१२, २१-१८ असा पराभव केला. अश्‍विनी पोनप्पा व प्राजक्ता सावंत यांना यानंतर अटीतटीच्या लढतीत २२-२०, २०-२२, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. एनजी विंग युंग व यियूंग एनजी टिंग यांनी पोनप्पा-सावंत जोडीला हरविले.

यानंतर श्रीकृष्णप्रिया कुदरावल्ली हिला चियुंग यिंग मेई हिने १९-२१, २१-१८, २०-२२ असे हरवून हॉंगकॉंगला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सिंधूने यानंतर सिक्की रेड्डीसह उतरताना एनजी त्झे याव व युईन सिन यिंग यांना २१-१५, १५-२१, २१-१४ असे अस्मान दाखविले. तिसर्‍या एकेरीत रुत्विका शिवानी गड्डे हिने पहिला गेम गमावल्यानंतर यंग सुम यी हिला १६-२१, २१-१६, २१-१३ असे नमविले. भारताचा पुढील सामना गुरुवारी जपानशी होणार आहे. जपानच्या संघात अकाने यामागुची व नोझोमी ओकुहारा या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे.