भारताची सात पदके निश्‍चित

0
86

‘एआयबीए’ महिलांच्या युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत काल बुधवारी भारताने अजून पाच पदके निश्‍चित केली. मंगळवारी दोघा भारतीयांचे पदक पक्के झाले होते. त्यामुळे एकूण सात पदकांसह भारताने या स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंद केली आहे. ज्योती गुलिया (५१ किलो), साशी चोप्रा (५७ किलो), अंकुशिता बोरो (६४ किलो), नीतू (४८ किलो) व साक्षी चौधरी (५४ किलो) यांनी काल उपांत्यपूर्व फेरीचा बाऊट जिंकत उपांत्य फेरी गाठली. तत्पूर्वी, नेहा यादव (८१ किलोंवरील) व अनुपमा (८१ किलो) यांनी खेळाडूंची संख्या कमी असल्याने आपापल्या वजनी गटातून उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. निहारिका गोनेला (७५ किलो) हिला मात्र पदकाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले. इंग्लंडच्या जॉर्जिया ओकॉनर हिने तिला हरविले.

बुधवारी सर्वप्रथम गुलिया हिचा बाऊट होता. हरयाणाच्या या आक्रमक शैली असलेल्या बॉक्सिंगपटूने इटलीच्या जियोवाना मार्चेस हिचा घाम गाठताना ५-० अशा एकतर्फी फरकाने सामना जिंकला. यानंतर चोप्राचा सामना दहावे मानांकन लाभलेल्या कझाकस्तानच्या आबिलखान हिच्याशी झाला. सामन्याची पहिली तीन मिनिटे आबिलखानने चोप्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर चोप्राने जोरदार खेळ दाखवत ५-० असा सामना जिंकला. बोरो व इटलीच्या रेबेका निकोली यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. निकोलीने संपूर्ण सामन्यात आपली आक्रमकता कमी केली नाही. दुसरीकडे बोरोने उत्कृष्ट बचाव व वेगवान हालचालींच्या जोडीला भक्कम ‘गार्ड’ चा उपयोग केल्याने निकोलीला पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेच्या मागील सत्रात भारताला केवळ २ कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले होते. २०११ सालानंतर तर भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे. भारतात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत ३८ देशांचे १५० बॉक्सिंगपटू सहभागी झाले आहेत.