भारताची श्रीलंकेवर ७ गड्यांनी मात

0
111

बांगलादेशविरुद्धच्या धक्कादायक पराभवातून स्वतःला सावरत भारताच्या महिला टीम इंंडियाने काल गुरुवारी श्रीलंकेचा ७ गडी व ७ चेंडू राखून पराभव केला. आशिया चषक टी-२० स्पर्धेतील हा सामना रॉयल सेलेंगर क्लब मैदानावर खेळविण्यात आला. श्रीलंकेचा डाव ७ बाद १०७ धावांवर रोखल्यानंतर भारताने १८.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा परंतु सलामीवीर यशोदा मेंडीस (२७) व हसिनी परेरा (नाबाद ४६) यांचा अपवाद वगळता लंकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. चेंडू वाया घालविण्याबरोबरच स्वतःची विकेट फेकण्याचे काम लंकेच्या उर्वरित फलंदाजांनी केले. भारताकडून बिश्तने दोन तर झुलन, अनुजा व पूनम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मिताली व स्मृती यांनी संथ सुरुवात केली.

स्मृती पहिल्या गड्याच्या रुपात बाद झाली. मिताली व हरमनप्रीत यांनी यानंतर दुसर्‍या गड्यासाठी ३४ धावा जोडल्या. बाराव्या षटकात मिताली व चौदाव्या षटकात हरमनप्रीत तंबूत परतली. हरमनप्रीत परतली त्यावेळी भारताला ३९ चेंडूंत ३८ धावांची आवश्यकता होती. वेदा व अनुजा यांनी अधिक पडझड होऊ न देता भारताचा विजय साकार केला.
शनिवारी भारताचा पुढील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

धावफलक
श्रीलंका ः यशोदा मेंडीस यष्टिचीत भाटिया गो. पूनम २७, निपुणी हंसिका यष्टिचीत भाटिया गो. बिश्त २, हसिनी परेरा नाबाद ४६, निलाक्षी डीसिल्वा पायचीत गो. बिश्त ७, मलशा शेहानी धावबाद १, शशिकला सिरीवर्धने धावबाद २, रेबेका वेंडॉर्ट झे. भाटिया गो. गोस्वामी ३, अनुष्का संजीवनी त्रि. गो. पाटील ५, ओशादी रणसिंघे नाबाद ६, अवांतर ८, एकूण २० षटकांत ७ बाद १०७
गोलंदाजी ः झुलन गोस्वामी ४-०-२०-१, एकता बिश्त ४-०-२०-२, अनुजा पाटील ४-०-१९-१, पूनम यादव ४-०-२३-१, शिखा पांडे १-०-७-०, दीप्ती शर्मा ३-०-१५-०

भारत ः मिताली राज झे. प्रबोधिनी गो. डीसिल्वा २३, स्मृती मंधाना झे. प्रबोधिनी गो. रणसिंगे १२, हरमनप्रीत कौर झे. रणसिंगे गो. प्रबोधिनी २४, वेदा कृष्णमूर्ती नाबाद २९, अनुजा पाटील नाबाद १९, अवांतर ३, एकूण १८.५ षटकांत ३ बाद ११०
गोलंदाजी ः उदेशिका प्रबोधिनी ३.५-०-२५-१, सुगंधिका कुमारी ४-०-२१-०, ओशादी रणसिंघे ३-०-१५-१, शशिकला सिरीवर्धने ३-०-१६-० मलशा शेहानी ३-०-२०-०, निलाक्षी डीसिल्वा २-०-१२-१

दोन हजारी मिताली राज
भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करणारी भारताची पहिली खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. क्वालालंपूर येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत काल गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने हा मैलाचा दगड पार केला. मितालीच्या नावावर ७४ टी-२० सामन्यांत २०१५ धावांची नोंद झाली आहे. ३८.०१च्या सरासरीने व १४ अर्धशतकांसह मितालीने या धावा केल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये शार्लट एडवडर्‌‌स (२,६०५), स्टेफनी टेलर (२,५८२) व सुझी बेट्‌स (२,५१५) यांनी तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये मार्टिन गप्टिल (२,२१७) व ब्रेंडन मॅक्कलम (२,१४०) यांनी आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये दोन हजारांहून जास्त धावा केल्या आहेत. दोन हजारी बनण्यासाठी विराटला अजून १७ धावांनी आवश्यकता आहे.